पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झालेले इम्रान खान यांचा १४ ऑगस्ट रोजी शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी इम्रान खान यांनी अभिनेता आमीर खानला निमंत्रण दिलं आहे. आमीर खानसोबत त्यांनी माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर, कपिल देव आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनाही निमंत्रण दिलं आहे.

याआधी इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्ष सार्क देशाच्या प्रमुखांना शपथविधीसाठी निमंत्रण देणार असल्याचं वृत्त होतं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही नावाचा समावेश होता. मात्र नंतर हे वृत्त फेटाळण्यात आलं.

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाने सर्वाधिक जागा मिळविल्या असल्या तरी हा पक्ष बहुमतापासून अद्यापि दूर आहे. इम्रान खान यांनी पाच जागांवर निवडणूक लढविली आणि ते निवडूनही आले आहेत. त्यामुळे त्यांना चार जागा सोडाव्या लागणार असल्याने त्यांच्या पक्षाच्या अडचणींमध्ये भरच पडणार आहे.

पक्षाला पूर्ण बहुमत नसल्याने लहान पक्षांच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार स्थापन होणार असून अपक्ष व लहान पक्ष यांच्याशी वाटाघाटी सुरू आहेत. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ हा नॅशनल असेंब्लीत सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांना ११६ जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे नेते नइनउल हक यांनी सांगितले की, बहुमत मिळवण्यासाठी अपक्ष व लहान पक्ष यांच्याशी वाटाघाटी सुरू आहेत.

पाकिस्तान निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाला ११६ जागा मिळाल्या असून बहुमतासाठी १२ जागा कमी पडल्या आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाला ६४ तर पाकिस्तान पीपल्स पार्टीला ४३ जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत एकूण ३४२ जागा असून त्यात २७२ जागांची थेट निवडणूक होते. बहुमतासाठी १७२ जागा मिळवणे आवश्यक असते. पाकिस्तानात राजकीय घडामोडींना निकालानंतर वेग आला असून काही खुल्या तर काही गुप्त बैठका सुरू आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टी व पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ यांच्या बैठका दोन दिवसात होण्याची शक्यता असून त्यात संसदेत पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाला घेरण्याची रणनीती निश्चित केली जाईल.