‘त्यांच्या चांगल्या कामाबद्दल भरभरून स्तुती आणि काही न पटल्यास ते हक्काने त्यांना सांगत होतो.’

श्रीदेवी ही एक अशी कविता आहे, जिचा अंत कधीच व्हायला पाहिजे नव्हता. त्यांच्या जीवनाला वेळेआधीच पूर्णविराम लागला, अशा शब्दांत अभिनेते कमल हसन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘विश्वरुपम २’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

श्रीदेवी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीविषयी ते सांगतात की, ‘मी आणि श्रीदेवी बाल कलाकार होतो. आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखत होतो, पण जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तेव्हा मी १९ वर्षांचा आणि त्या १५ वर्षांच्या होत्या. त्यावेळी आमच्या ग्रुपमध्ये माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या कलाकारांची जबाबदारी माझ्यावर होती. श्रीदेवी यांचीही जबाबदारी माझ्यावर होती. त्या मला नेहमी सर म्हणूनच हाक मारायच्या. एकाच कुटुंबातील असल्यासारखं आम्ही वागत होतो. मी त्यांच्या चांगल्या कामाबद्दल भरभरून स्तुती आणि काही न पटल्यास ते हक्काने त्यांना सांगत होतो.’

श्रीदेवी यांच्यासोबतच्या शेवटच्या आठवणीबद्दल सांगताना ते भावूक झाले. ‘आम्ही दोघांनी जवळपास २७ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यांच्यासोबतचा शेवटचा संवाद अजूनही लक्षात आहे. विशेष म्हणजे त्या राजकारणाविषयी बोलत होत्या. त्याआधी आम्ही कधीच राजकारण या विषयावर बोललो नव्हतो. त्यांना राजकारणात अजिबात रस नाही असंच मला वाटायचं आणि त्या कळकळीने मला विचारत होत्या की तामिळनाडूमध्ये असं का होत आहे? हे काय घडत आहे? तुम्ही याकडे कसं पाहता? तुम्ही चिडला आहात का? असे प्रश्न त्या मला विचारत होत्या आणि मी थक्क झालो होतो. त्यांची थट्टामस्करी करण्यासाठी मी म्हटलं की, अरे तुम्ही तर आता फार मोठे झाला आहात.

खरंतर त्यांना मी बालपणा पासून पाहत आलो होतो आणि त्यांनी कधीच असं बोलताना ऐकलं नव्हतं. म्हणून मी त्यांची थट्टा करत होतो. आम्हाला पुन्हा एकत्र काम करण्याची इच्छा होती आणि याविषयी बोनी कपूर यांच्याशी आम्ही बोललोसुद्धा होतो,’ असं त्यांनी सांगितलं.