‘दिलबर दिलबर’ या गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन बऱ्या दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. सत्यमेव जयते या चित्रपटातील हे गाणं आणि त्या गाण्यावर थिरकणारी नोरा फतेही ही अभिनेत्री त्यामागचं खास कारण ठरत आहे. ‘दिलबर’ची चाल तर या गाण्याला खास टच देत आहेच पण, त्यासोबतच नोरा फतेहीने ज्या सुरेखपणे या गाण्यावर नृत्य सादर केलं आहे, ते पाहता अनेकजण तिच्यावर प्रेमात आहेत.

एका गाण्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या नोराला आता बॉलिवूडमधून काही तगड्या प्रोजेक्ट्ससाठी विचारणाही केली जाऊ लागली आहे. आपल्या वाट्याला आलेलं यश आणि चित्रपटांचे प्रस्ताव पाहता नोराने तिच्या मानधनाचा आकडा वाढवल्याचं कळत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा यशाची सुत्र उलगडल्यानंतर सेलिब्रिटी कशा प्रकारे त्यांच्या मानधनाचे आकडे वाढवतात याचं उदाहरण पाहायला मिळत आहे.

नोरा येत्या काळात राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘स्त्री’ आणि सैफ अली खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘बाजार’ या चित्रपटातूनही काही गाण्यांवर ताल धरताना दिसणार आहे. अली अब्बास जफर यांच्या ‘भारत’ या चित्रपटातही तिची भूमिका असण्याची चर्चा आहेत.ज्यानिमित्ताने ती सलमान खान आणि सुनील ग्रोवरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘भारत’मध्ये ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळत असून, नोरासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे हे नाकारता येणार नाही.