देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा वयानं लहान असलेल्या निक जोनाससोबतच्या तिच्या बोल जात असलेल्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आली आहे. खरं तर दोघांनी गुपचूप गेल्याच महिन्यात साखरपुडा उरकल्याच्या वृत्तानं सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. मात्र प्रियांकाच काय पण निकनही त्यांच्या नात्याविषयी प्रसिद्ध होणाऱ्या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा दिला नाही. आपल्या खासगी आयुष्यात लक्ष घातलेलं प्रियांकालाही फारसं आवडलं नाही.

साखरपुड्याबद्दल तिला नुकतेच काही प्रश्न विचारण्यात आले मात्र याविषयी उत्तर देण्यास मी बांधील नाही असं सडेतोड उत्तर तिनं दिलं. माझं खासगी आयुष्य आहे आणि ते मला सार्वजनिक करायचं नाही. माझ्या आयुष्यातील ९०% गोष्टी या सार्वजनिक आहेत पण १० % गोष्टी माझ्या स्वत:च्या आहेत. माझी मैत्री, कुटुंब, माझी नाती इतरांसमोर उघड करावीशी मला वाटत नाहीत. मी कार्यालय चालवत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण किंवा उत्तर देण्यास मी बांधील नाही’ असं प्रियांका पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अली अब्बास जफारनं एक सूचक ट्विट केलं होतं. त्यानंतर काहीच तासात प्रियांकानं तिच्या वाढदिवशीच साखरपुडा केल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. अनेक परदेशी माध्यमांनी याला होकार दिला. ‘भारत’च्या निर्मात्यांनी देखील निकशी साखरपुडा केल्याच्या वृत्ताला होकार दिला. मात्र प्रियांका अद्यापही या गोष्टी उघड न करण्याच्या मतावर ठाम आहे.