जर निक – प्रियांका लग्नबंधनात अडकणार असतील तर मला आनंदच होईल.

कायम प्रवाहाविरुद्ध जाऊन बोलणारी अभिनेत्री कंगना रणौत कायम तिच्या सडेतोड उत्तरांसाठी ओळखली जाते. मात्र तिच्या याच बोलण्यामुळे तिने अनेकांशी दुश्मनी पत्करली आहे.असं असलं तरीदेखील ती खुलेपणाने बॉलिवूडमधल्या अनेक विषयांवर बोलते. त्यामुळे तिने अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं आहे.

प्रियांका आणि कंगना तसं बघायला गेलं तर एकमेकांच्या मैत्रीणी आहेत. मधुर भंडारकर यांच्या ‘फॅशन’ चित्रपटातून त्याला दोघी एकत्र झळकल्या होत्या. त्यामुळे प्रियांकाविषयी बोलताना कंगना विचारपूर्वक बोलत असते. काही दिवसापूर्वी कंगनाला एका मुलाखतीमध्ये प्रियांकाच्या साखरपुड्याविषयी विचारण्यात आलं होतं. मात्र यावर कंगनाने उत्तर देण्याचं चतुराईने टाळलं. प्रियांका-निकने साखरपुडा केल्यावर मला बोलवायला हवं होतं,असं तीने स्पष्टपणे सांगितलं होतं.

दरम्यान, प्रियांकाने कंगनाला साखरपुड्याला बोलावलं नसलं तरीदेखील ‘Vogue ब्युटी अॅवॉर्ड २०१८’ च्या सोहळ्याप्रसंगी कंगनाने या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच निक- प्रियांकाने साखरपुडा केला आहे असं जाहीरपणेदेखील सांगितलं. निक-प्रियांकाच्या साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी मी प्रियांकाला फोन केला होता. त्यावेळी ती प्रचंड खुश आणि उत्साहीत असल्याचं दिसून आलं.

पुढे ती असंही म्हणाली, ‘जर ते लग्नबंधनात अडकणार असतील तर मला आनंदच होईल. प्रियांका एक व्यक्ती म्हणून खूप छान आहे. त्यामुळेच ती माझी जवळची मैत्रीण आहे. तसंच कोणाचंही लग्न किंवा साखरपुडा झाला तर मला आनंदच होतो. त्यामुळे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ असं माझं होतं’.

दरम्यान, कंगनाने प्रियांकाच्या साखरपुड्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे प्रियांका लवकरच निकबरोबर लग्न करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.