सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात असाच पावसाळा सरून थंडीचे दिवस सुरू झालेले, त्यावेळी एकेदिवशी पहाटेच्या सुमारास सूर्य अजून उगवलेला नव्हता पण त्याच्या किरणांनी अंधाराला नमवून शीतल प्रकाश पाडला होता, अशा वेळी हत्तीच्या कळपात हत्तीनीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. जंगलात आपल्या परिवारात तो वाढला, मोठा झाला. जंगलात राहण्याचे सर्व नियम तो बारकाईने आपल्या वडीलधाऱ्याकडून शिकत होता. अतिशय हुशार, प्रामाणिक आणि बलाढ्य असल्यामुळे तो पुढे कळपाचा प्रमुख झाला. कळपाला मार्ग दाखवणे, रक्षण करणे, कळपाची काळजी घेणे ही कामं तो चोख पार पाडत होता. कळपात त्याची प्रियता खूप होती. त्याने अनेक हत्तींचे स्वतःच्या जीवावर खेळून शिकाऱ्यापासून संरक्षण केले. तो एक महान नेता ठरला. त्यानं त्याचं काम अनेक वर्षे चालूच ठेवलं.

कळपाच्या रक्षणार्थ झालेल्या एका चकमकीत तो जखमी झाला आणि त्यात त्याचा पाय गेला. त्याचं वय पण झालं होतं आणि त्याच्या डोळ्याला पण थोडी दुखापत झाली होती. वेदना असह्य होत्या म्हणून काही दिवस वाट बघून, आपली या वेदनेतून सुटका होणार नाही, आपला अंत आता जवळ आला आहे हे जाणून आणि आपण आता प्रमुख म्हणून असमर्थ ठरतोय, आपल्याला व्यवस्थित दिसत नाही, कळपाच संरक्षण, मार्गदर्शन आपण करू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यानं त्याच्या कळपातल्या एकाला प्रमुख म्हणून नेमून कळप सोडून दिला. कळप त्याला सोडायला तयार होईना मग प्रमुख म्हणून शेवटचा हुकूम त्यांना निघून जायला सांगितलं. ते कळपाला ऐकायला भाग पडलं. तो एकटा एका नदी काठी राहू लागला. काही महिने त्यानं त्या नदी काठी काढले. नदीकाठी चालत असताना त्याला थोड्या अंतरावर एक उंच कपार दिसली. त्याला त्या कपारीवर जाण्याची इच्छा झाली. दिड दिवस मेहनत घेऊन चालल्यानंतर अखेर तो संध्याकाळी कपारीवर पोहचला. रात्रभर आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यानं त्या कपारीचा मुआयना केला. कपारीवर खायला भरपूर होतं. त्यादिवशी संध्याकाळी कपारीवरून, जणू सूर्यानं पृथ्वीला केसरी शाल पांघरु घातली असावं असं सुंदर दृश्य तो बघत होता. तो कपारीच्या काठावर आला. आपल्या आवाजात त्यानं एकापाठोपाठ एक अशा मोठंमोठ्यानं दोन आरोळ्या फोडल्या आणि त्यानं त्या उंच कपारीवरून उडी घेतली आणि आपलं आयुष्य संपवलं.

टीप : हत्ती आपल्या शेवटच्या दिवसात कधीच मरणाची वाट बघत पडून राहत नाहीत. ते आपल्या शेवटच्या दिवसात अशीच आत्महत्या करतात. तुम्हाला एखादा हत्ती वृद्धापकाळाने जंगलात मरण पावला आहे असं कुठंच आढळणार नाही. असं अपवादात्मक घडू शकत. आणि त्या अपवादात्मक काळी त्याच्या कळपातले सर्व हत्ती त्या मेलेल्या हत्तीच्या पार्थिवाला उचलून एक तर तळ्यातल्या पाण्यात टाकतात किंवा नदी पात्रात टाकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here