भारताचे टॉप गुप्तहेर सूर्यकांत भांडेपाटील यांची कथा लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिनेता इम्रान हाश्मी या चित्रपटात सूर्यकांत भांडेपाटील यांची व्यक्तिरेखा साकारणार असून ‘फादर्स डे’ असं चित्रपटाचं नाव असणार आहे. १२० मुलांच्या अपहरणाची प्रकरणं सूर्यकांत यांनी मोफत सोडवली होती.

शांतनू बागची या बायोपिकचं दिग्दर्शन करणार असून दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर ‘एअरलिफ्ट’, ‘पिंक’ आणि ‘रेड’ यांसारख्या दमदार चित्रपटांचे संवाद लिहिणारे रितेश शाह या चित्रपटाचं संवादलेखन करणार आहेत. इम्रान हाश्मी, प्रिया गुप्ता आणि कल्पना उद्यवार यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

‘१२० मुलांच्या अपहरणाची प्रकरणं मोफत सोडवणारे भारताचे टॉप गुप्तहेर सूर्यकांत भांडेपाटील यांच्या आयुष्यावर फादर्स डे या चित्रपटाची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे,’ असं ट्विट इम्रानने केलं आहे.

कोण आहेत सूर्यकांत भांडेपाटील?

सूर्यकांत भांडेपाटील पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक. पुण्यातील शिरवळ इथं त्यांचं कुटुंब सुखात नांदत होतं. मात्र २९ नोव्हेंबर १९९९ हा दिवस त्यांच्या सुखावर दुःखाचं सावट घेऊन उगवला. सूर्यकांत यांचा लहान मुलगा संकेत याचं अपहरण झालं होतं. अपहरणकर्ता भांडे पाटलांकडे पैश्याची मागणी करु लागला. भांडेपाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस तपास सुरु झाला. महिन्यांवर महिने पुढे सरकत होते. मात्र पोलिसांकडून आश्वासनांवर आश्वासने मिळण्याव्यतिरिक्त त्यांच्या हाती काही लागत नव्हते. अखेर या पित्याने स्वतः तपासकार्यात सहभाग घेतला. दोन वेळा ट्रॅप लावून अपहरणकर्त्याला पैसे घेण्यासाठी बोलावले. मात्र पोलिसांसमक्ष अपहरणकर्ता पैसे घेऊन फरार झाले. त्याच दरम्यान पुण्यामध्ये आणखी एक अपहरणाची घटना घडली. या दोन्ही घटनांमधील साम्य पाहून पाटील यांनी त्या दिशेने तपास सुरु केला आणि तब्बल आठ महिन्यांच्या तपासानंतर अपहरणकर्त्यापर्यंत पोहचण्यात भांडेपाटील यशस्वी झाले. संकेत बेपत्ता झाला त्यादिवशी बंगल्याबाहेर घरातील फर्निचरला पॉलीश करणाऱ्या कामगारानेच घात केल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र आता खूप उशिर झाला होता. अपहरणकर्त्यांनी संकेतची हत्या केली होती.

या घटनेने पाटील कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी अशा घटनांमध्ये लोकांना मदत करायचं ठरवलं. भांडेपाटील यांनी स्पाय संकेत नावाची डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली. या अंतर्गत ते अपहरणाच्या घटनांमध्ये आरोपीपर्यंत पोहोचण्यास पोलीस आणि पीडित कुटुंबीयांना मदत करतात. विशेष म्हणजे त्यासाठी ते एकही पैसा घेत नाहीत. आजपर्यंत त्यांनी अशाप्रकारच्या अपहरणाची तब्बल १२० प्रकरणं सोडवल्या आहेत.