अभिनेत्री एली अवरामसोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळत नाही तोच, हार्दिकचं नाव ईशा गुप्तासोबत जोडलं गेलं.

कला आणि क्रीडा विश्वाचं असणारं नातं काही वेगळ्या भाषेत सांगण्याची गरज नाहीच. या दोन्ही क्षेत्रांना विविध कारणांनी आजवर समोरासमोर आणलं आहेत. त्यातच सेलिब्रिटींसोबत क्रीडापटूंचे सूत जुळण्याचं प्रमाण तुलनेने जास्त. या साऱ्यात सध्याच्या घडीला उदाहरण म्हणून आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव म्हणजे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणी अभिनेत्री ईशा गुप्ताचं.

अभिनेत्री एली अवरामसोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळत नाही तोच, हार्दिकचं नाव ईशा गुप्तासोबत जोडलं गेलं. त्यांच्यातील वाढती मैत्री हे त्यामागचं विशेष कारण ठरलं.हार्दिक सध्या ईशाला डेट करत असल्याचं अनेकांचच म्हणणं आहे. पण, खुद्द हार्दिक आणि ईशाने मात्र बराच काळ याविषयीच्या प्रश्नांवर मौन पाळलं आहे. आता मात्र पुन्हा एकदा त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांनी जोर धरला असून, या चर्चा थेट लग्नापर्यंत पोहोचल्या आहेत.

हार्दिक आणि ईशा लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचेच वारे सर्वत्र वाहत असून, ईशाने याविषयी मौन सोडत गोष्टी स्पष्ट केल्या. ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हल्लीच पार पडलेल्या एका कार्यक्रमात ज्यावेळी ईशाला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने या सर्व अफवा असल्याचं सांगितलं. ‘सद्याच्या येत्या काळात मी लग्न वगैरे करणार नाहीये. मी ज्यावेळी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेईन तेव्हा तुम्हा सर्वांना याविषयी नक्कीच माहिती देईन’, असं ती म्हणाली.

ईशाचं हे उत्तर पाहता निदान सध्यातरी हे बहुचर्चित सेलिब्रिटी कपल कोणत्याच नव्या प्रवासाची सुरुवात करणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. पण, आता यात पुढे नेमके काही बदल होणार का, हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, बॉलिवूड आणि क्रिकेट हे नातं फार जुनं आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्यात प्रेमाचं सूत जुळल्याचं हे काही पहिलं उदाहरण नाही. याआधी हरभजन सिंग- गीता बसरा, युवराज सिंग- हेजल कीच, विराट कोहली- अनुष्का शर्मा, सागरिका घाटगे- झहीर खान या जोड्या विवाहबंधनात अडकल्या. त्यामुळे आता हार्दिकदेखील याच पावलावर पाऊल ठेवताना दिसणार का, हाच प्रश्न आता चाहत्यांच्या मनात घर करत आहे.