जेष्ठ मराठी अभिनेते श्री विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने आज दुःखद निधन झालं आहे. मृत्यूच्या वेळी त्यांचं वय ६३ वर्ष होते, गेल्या 40 वर्षांपासून मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीत त्यांनी आपल्या कलेने स्वतःचा दबदबा कायम ठेवला होता. मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इ.स. 1985 साली ‘वहिनीची माया’ या मराठी चित्रपटात काम करत त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची अनेक नाटके सुद्धा प्रसिद्ध झाली त्यात ‘मोरूची मावशी’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘तू तू मी मी’ अशी गाजलेली नाटके त्यांनी केली होती. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी स्त्रीची (मावशी) भूमिका केली होती. या भूमिकेतूनच त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप सोडली. तर ‘तू तू मी मी’ या नाटकात त्यांनी स्वतः तब्बल 20 पात्र एकट्याने पार पाडली होती. आता पर्यंत त्यांनी 400 मराठी चित्रपटात काम केलं आहे, त्यांनी अनेक एकांकिका सुद्धा केल्या आहेत. त्यांनी ‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’, ‘जत्रा’ अशा सुप्रसिद्ध मराठी चित्रपटात काम केलंय. ‘रानफुल’, ‘लाईफ मेंबर’ या मालिकातही त्यांनी काम केलं आहे.

2018 साली म्हणजे याच वर्षी त्यांना मराठी चित्रपट सृष्टीतील बहुमूल्य अशा व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्काराने त्यांना महाराष्ट्र शासनाने गौरवले होते. अशा या प्रसिद्ध अभिनेत्याचे म्हणणे होते कि,

मला कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळालेली नाही, प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मी अथक प्रयत्न केले आहेत.

असा हा अभिनेता जाता जाता आपणास असा संदेश देऊन गेला की या जीवनात काही मिळवायचं असेल तर त्यासाठी अथक प्रयत्न, कष्ट करावेच लागतात, सहजासहजी काहीच मिळत नाही, असा हा अभिनेता मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात चिरायू होणार यात कुठली शंकांचं नाही.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण!