आजच्या बॉलीवूड गायिकांमधील एक आघाडीचं नाव म्हणजे नेहा कक्कर.

तिचा ऋषीकेशपासून मुंबईपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिला खूप मेहनत करावी लागली. पण हा प्रवास खूप सुंदर होता, असं नेहा म्हणते. रिएलिटी शोमुळे तरुणाईला खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. हेही तितकंच खरं असल्याचं नेहाचं म्हणणं आहे. नेहा १७ वर्षांची असताना ‘इंडियन आयडॉल’च्या दुसऱ्या एपिसोड मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर तिचा बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला. म्हणूनच स्पर्धक ते परीक्षक या प्रवासाला तिच्या लेखी महत्त्व आहे. संगीताचं बाळकडू तिला घरातूनच मिळालं. तिची मोठी बहीण सोनू कक्कर गायिका होती. त्यामुळे लहानपणापासून ती बोलायला लागली तेव्हाच गाणं सुरू झालं. ती माता की चौकीमध्ये देवीचं जागरण, भजन अशी गाणी गात लहानाची मोठी झाली. त्यामुळे लहानपणापासूनच तिची गाणं हीच तिची आवड आहे.

आताच्या बॉलीवूड गीतांविषयी श्रोत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत, पण नेहाला वाटतं रसिकांना ज्या प्रकारची गाणी आवडतात, त्याच प्रकारची गाणी बनवली जातात. जर नेहाने गायलेल्या गाण्यांचा विचार केला तर ‘भांगरा ता सजदा’, ‘मिले हो तुम’, ‘लंडन ठुमकता’, ‘धतिंग नाच’, ‘आओ राजा’, ‘वेडिंग दा सीझन’, ‘लडकी ब्युटीफूल’, ‘काला चष्मा’ अशी वेगवेगळ्या मूडची गाणी म्हटली आहेत. सध्या तिचं ‘दिलबरो’ हे गाणं आणि ‘ओ हमसफर’ हा म्युझिक व्हिडीओ गाजतोय.

तिच्या करिअरमध्ये तिचा भाऊ टोनी कक्करचीही तिला वेळोवेळी साथ मिळाली आहे. तुम्ही खूप मेहनत करा. गाणं तुमची पहिली आवड असेल तर त्यातच तुमचं योग्य करिअर घडेल. फक्त जिद्द सोडू नका असं ती ‘इंडियन आयडॉल’मध्ये आलेल्या स्पर्धकांना स्वानुभवातून सांगत होती. गायनामध्ये आणि परीक्षक म्हणून लोकप्रियअसली तरी नेहा सोशल मीडियावरही तितकीच लोकप्रिय आहे. ती त्यासाठी खास वेळ काढते, कारण सोशल मीडियावर तिला प्रेक्षकांशी थेट संवाद साधता येतो. सध्या एकापेक्षा एक बॉलीवूड गाण्यांवर ठुमके लावणारी तितकीच हळूवार भावनिक साद घालणारी तरुण गायिका म्हणून नेहा सध्या भलतीच लोकप्रिय झाली आहे.