वैयक्तिक कारणामुळे अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटातून काढता पाय घेणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसापूर्वी प्रियांका आणि निक जोनास यांच्या नात्याविषयी चर्चा रंगत होत्या. मात्र आता प्रियांकाच्या करिअरविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. या चर्चा केवळ तिच्या चाहत्यांमध्येच नाही तर कलाविश्वातही रंगल्या आहेत.

‘भारत’ चित्रपटाला रामराम ठोकल्यानंतर प्रियांका चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येत होतं. विशेष म्हणजे हा चित्रपट गॅंगस्टर गंगूबाई कोठेवाली यांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र प्रियांकाने या चित्रपटासाठीही नकार दिल्याचं समोर आलं आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’नुसार, प्रियांका या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार होती. यापूर्वी भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्येही ती दिसून आली होती. त्यामुळे संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर ती दुसऱ्यांदा काम करणार होती. मात्र हॉलिवूडमधून पुन्हा एका चित्रपटाची ऑफर आल्यामुळे तीने हा चित्रपटही सोडल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, प्रियांकाने बॉलिवूडचे दोन चित्रपट जरी सोडलं असले तरी तिच्याकडे आणखी एक चित्रपट आहे. त्यामुळे ती या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असून ‘द स्काय इज पिंक’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर फरहान अख्तरही स्क्रिन शेअर करणार आहे.