तो आला, त्याने पाहिलं, आणि तो जिंकला! ही ओळ अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ या चित्रपटासाठी चोख बसते. बॉलिवूड बॉक्स ऑफीसचे बरेच विक्रम मोडणारा हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे ‘बाहुबली २’ या चित्रपटाला मागे टाकत ‘संजू’ने बक्कळ कमाई केली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याबद्दलची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ‘संजू’ने ‘बाहुबली २’च्या (हिंदी) कमाईचा विक्रम मोडला आहे. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने ऑस्ट्रेलियात सुमारे १२ कोटी २१ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ‘बाहुबली २’ने सुमारे १२ कोटी २० लाख रुपये कमावले होते.

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ आहे. तर दुसऱ्या स्थानावर आमिर खानचा ‘दंगल’ आहे. तिसऱ्या स्थानावर ‘संजू’, चौथ्या ‘बाहुबली २’ आणि पाचव्या स्थानावर ‘पीके’ आहे.