धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ‘सत्यमेव जयते’विरोधात गुन्हा दाखल

अभिनेता जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असणारा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटामुळे शिया मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं जात आहे.

चित्रपटात दाखवलेल्या मातमच्या सिन मुळे शिया मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत ‘सत्यमेव जयते’च्या मार्गात हा अडथळा आल्याचं कळत आहे. भाजपाच्या सय्यद अली जाफरी यांनी याविषयी दाबीपुरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सत्यमेव जयतेविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय दंडसंविधानातील कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं वृत्त ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलं.

जॉन अब्राहम, मनोज बाजपेयी, अमृता खानविलकर, आएशा शर्मा यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. मिलाप झवेरी लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय ठरत आहे. भूषण कुमार, क्रृष्णा कुमार, मोनिषा अडवाणी, मधू भोजवानी आणि निखील अडवाणी यांची निर्मिती असणारा हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांच्यासमोर अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’चं मोठा आव्हान असणार आहे.