सलमान खानचं संपूर्ण कुटुंब विविध कारणांनी या कलाविश्वाशी जोडलं गेलं आहे. मग ते निर्मिती क्षेत्र असो किंवा आणखी कोणतं. आता याच कुटुंबातील आणखी एक व्यक्ती या कलाविश्वात पदार्पण करत आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे आयुष शर्मा. सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माचा पती आयुष शर्मा ‘लवरात्री’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. खुद्द सलमान खानच त्याच्या या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हातभार लावत आहे.

आयुषसाठी ‘लवरात्री’ Loveratri ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला, ज्याच्या माध्यमातून आयुषच्या अभिनयाची झलकही पाहायला मिळत आहे. पण, मुळात या चित्रपचासाठी निवड होण्यापूर्वी आयुषवर सलमान फार नाराज होता. कारण, या चित्रपटाला होकार देण्यापूर्वी त्याने जवळपास दहा चित्रपटांच्या स्क्रीप्ट नाकारल्या होत्या. खुद्द सलमानने ट्रेलर लाँच सोहळ्याच्या वेळी याविषयीची माहिती दिली.

‘ज्यावेळी अभिराज मिनावाला आणि आयुषने या चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा लगेचच त्यांनी चित्रपट करण्यास होकार दिला. पण, त्यापूर्वी मात्र मी त्याच्यावर बराच नाराज होतो. कारण, जवळपास ९ ते १० चित्रपटांच्या स्क्रीप्ट मी त्याच्याकडे पाठवल्या होत्या. पण, त्या त्याने नाकारल्या होत्या. पण, या चित्रपटाची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर मात्र त्याने लगेचच होकार दिला. या चित्रपटाच्या कथेमध्ये आपण स्वत:ला पाहतो, आधी कधीच मी त्या पात्रांमध्ये स्वत:ला भेटलो नव्हतो, असं म्हणत त्याने या क्षेत्रात पुढची वाटचाल केली’, असं सलमान म्हणाला.

‘सलमान खान फिल्म्स’ या निर्मिची संस्थेअंतर्गत ‘लवरात्री’ हा चित्रपट साकारण्यात येत असून, त्यातून आयुष शर्मासोबतच वरिना हुसैन बी- टाऊनमध्ये पदार्पण करत आहेत. ५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्या माध्यमातून सणोत्सवाच्या उत्साही वातावरणात खुलणाऱ्या एका सुरेख अशा प्रेमकहाणीचं चित्रण करण्यात येणार आहे