लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

अशी कविता होती इयत्ता ६ वीच्या मराठी-पाठ्यपुस्तकामध्ये.

या कवितेत मराठीबद्दल अगदी सुंदर स्वरुपात स्तुतिलेखन वर्णिले आले आहे आणि दैनंदिन जीवनात मराठी उपयोगात आणणार्याकरिता “मराठी-वार्तालाप” ही किती अभिमानाची बाब असू शकते याबद्दल सुद्धा सुसज्ज ओव्या मांडलेल्या आहेत.
ही कविता तर अगदी मुखोद्गत होती त्या काळी….मात्र केवळ परीक्षेत उच्च-गुण प्राप्तीसाठी तिचा उपयोग करुन जीवनापासून मात्र त्या काव्याला वंछितच ठेवण्यात आले.

आज लेखन मराठीबद्दल का? असा प्रश्न वाचकांच्या ह्रदयाचा दरवाजा ठोठावणे सहाजिकच आहे.
सांगतो.!

एकदा किराणा दुकानात वडील व्यस्त असल्याकारणाने मीच गेलो. किराणा-नोंदणी वही वर सर्व सामान मी माझ्या हातांनी पहिल्यांदाच लिहिले होते. माझी एक सवय आहे कि मराठी शब्दांसह मराठीच अंक आणि इंग्रजी शब्दांसह इंग्रजीच अंक. घालमेल नको.

त्या वहीत सामानांची आखणी जणु अशाप्रकारे करण्यात आली होती

– साखर-४ किलो
– शेंगदाणे-१×१/२ किलो
– शाबुदाणा-३/४ किलो
– चहा पावडर-१/४ किलो

हे कारस्थान मी जाणूनबुझून नव्हते केले मात्र यातून गंमतीच्या भागाला गवसणी मिळणार याचा अंदाज बांधून तयारीनेच मी दुकानात गेलो होतो. दुकानातील एका युवा कामगाराने वही हातात घेतली आणि डोक्यात दोन बोटे फिरवत माझ्याकडे बघून हसू लागला.
मला कारण कळाले आणि मी उद्गारलो..

हम्म्म्ममराठीत आहे बरं सगळं!”

त्याने पुर्ण वहीतील सामानांची यादी बघितली आणि एका वयस्कर कामगारांना आवाज दिला…
मामा.. गणू मामा! तुमचं काय काम चालंलय ते मी घेतो पण या कार्यकर्त्याचं काम तुम्हांलाच जमेल बुवा! “मला काय? कुणी किराणा भरुन द्या पण द्या!
त्या वयस्कर व्यक्तिने हसतच पण कसलीही तक्रार न करता मला हव्या असलेल्या सर्व वस्तू पुरवल्या ते ही योग्य प्रमाणात जसे कि माझ्यातर्फे लिहिण्यात आले होते! तेव्हा कळलं….जुनं ते सोनं का म्हणतात!

समाजात वावरतांना इंग्रजी किंवा कमीत कमी हिंदी तरी येणे गरजेचे पडत आहे.हिंदी यायलाच हवी…कारण ती राष्ट्रभाषा आहे परंतु आधी राज्यभाषेबद्दलचं ज्ञान अवगत करायला हवं ना!
रिक्षावाल्याला काय विचारायचं,भैया बाबा चलेंगे क्या!”
आपला महाराष्ट्र आहे,आपली माती आहे…सरळ-सरळ विचारा….भाऊ बाबा ला जाणार का!”
त्यांना पण मराठी कळतं पण आपणच फुशारक्या मारत अर्धवट फुटक्या भाषेत बोलत बसतो..भाडा क्या लेंगे?दस देऊंगाचलेगा क्या

अरे काय हे विदुषकी धंदे लावलेत?
आधी मातृभाषा यायला हवी मग मोर्चा राष्ट्रभाषेकडे वळायला हवा….इंग्रजी शिकता येईल हळूहळू….कुठे पळून नाही चालली ती!
या तारुण्यात ज्या गोष्टीकडे अधिक कल वाढतो त्याच गोष्टीबद्दल पुढे रुचि वाढत जाते तसं मराठीबद्दल व्हायला हवं…! इंग्रजी बोलणारे किंवा हिंदी बोलणारे मराठी शब्दांना त्यांच्या संवादात जागा सुद्धा देत नाहीत मग आपण मराठी लिहितांना द्वितीय आणि तृतीय भाषांना का आमंत्रण द्यावे? अशाने एकतर भाषा सरळ आणि अद्वैत राहत नाही तसेच भेसळीमुळे तीचा गोडवा नाहीसा होतो.

खरं म्हटलं तर लोकांना प्रोत्साहनाशिवाय उत्साह येत नाही आणि लोकांचे प्रोत्साहन कुणी असेल तर आपणच…युवा वर्ग!
तर महाराष्ट्रात राहून मराठी म्हणून लाज नाही तर माज उरी बाळगला तरच प्रतिसाद सुद्धा उत्स्फूर्त मिळेल जेणेेकरुन आज मी, उद्या तुम्ही आणि काही दिवसात अवघा महाराष्ट्र मराठीशी घट्टरित्या जोडला जाईल तेव्हाच म्हणू शकू,

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तीच्या संगाने जागल्या दर्याखोर्यातील शिळा!”

– अविनाश काथवटे