निसर्ग ज्याप्रमाणे श्रावणात बहरून येतो अगदी त्याचप्रमाणे श्रावणातील पौर्णिमेने(राखी) भावा- बहिणीतील नाते सुद्धा खुलुन, बहरून, उमलून येतात. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या सणामुळे नात्यातील दृढता, विश्वास, आपुलकी वाढतंच जाते. हा सण भारतीय उपखंडात चांगलाच परिचयाचा आहे. राखी म्हणजे प्रतिक आहे ममतेच, प्रेमाचं आणि नात्यातील काळजीचं सुद्धा. बहीण भावाला राखी बांधते म्हणजे नेमकं काय करते; तर बहीण भावाच्या चांगल्या आरोग्या करीता, सुखसमृद्धी करीता आणि त्याच्या(भावाच्या) सुरक्षे करीता देवाकडे प्रार्थना करते. आणि बहिणीच्या या प्रेमाच्या बदल्यात भाऊ तिचं येणाऱ्या संकटापासून जीवनभर रक्षण करण्याचं वचन देतो, एकमेकांना गोड-धोड खाऊ घातलं जातं आणि आशीर्वाद दिला जातो. हा सण मनातून साजरा केला पाहिजे ना की एक औपचारिकता म्हणून.

कळी खुले, पाणी वाहे, उडे पक्षी आकाशी;
जगात नाही कोणी नात्यांपासून उपाशी ।।
वाटले जर तुला कोणी नाही तुज पाशी;
परी राखीने होईल नातं मनाशी ।।

भारतवर्षात साजरा होणारा कोणताही सण हा कोण्या एका विशिष्ट धर्माचा नसुन येथील राहणाऱ्या भारतवासीयांचा, हिंदवासीयांचा आहे. कारण सण, उत्सव, हे संस्कृतीचे भाग आहेत. आणि संस्कृती ही कोणत्याही धर्माची नसते. राखी पौर्णिमेचं सुद्धा अगदी असच आहे, हा सण फक्त हिंदू धर्मीयांचा नाही तर हिंदू, मुसलमान, शिख, इसाई, पारशी, जैन, बौद्ध या सर्वांचा आहे.

भारतीय संस्कृतीतील सणांना धर्माच्या काटेरी कुंपणात मर्यादीत करता येत नाही. या सणाची महत्वता ही फक्त मानवी जीवनाच्या भरभराटीच्या स्वार्थी हेव्या पोटीचं नाही तर प्राणी-वनस्पती यांच्या कल्याणासाठी सुद्धा आहे.

आता बऱ्याच जणांना एक प्रश्न नक्कीच पडला असेल की राखी फक्त बहिणीच भावाला का बांधतात? याच उत्तर,

‘बहीण ही स्त्री असल्यामुळे ती स्वतःच संरक्षण करू शकत नाही आणि भाऊ हा पुरुष असल्यामुळे तो बलवान असतो आणि आपल्या बहिणीचं रक्षण करू शकतो,’ हे तर कदापिही असणार नाही आणि नाहीच. बहिणीची माया, तिचं प्रेम हे प्रगाढ असतं, ती लहान असो वा मोठी तिची ममता, माया ही भावाच्या ममते आणि मायेपेक्षा नेहमीच सर्रास ठरते. या गोष्टी आपल्या परंपरेमुळे, वागणुकीमुळे, आपल्या राहणीमानमुळे भावा-बहिणीत रुजल्या जातात. कोणाला वाटेल छे असच कुठं असतं का? भावाची पण माया, ममता प्रगाढ असते की, तर हो असते की, पण त्यात त्यागाची भावना थोडीशी कमी असते, एवढंच. आपण फक्त एकच करूयात जो पर्यंत आपल्या समाजात स्त्री-पुरुष समानता होणार नाही, तोपर्यंत आपण समानतेसाठी झटू यात. कारण जो पर्यंत समानता येणार नाही तो पर्यंत या सणांची सार्थकता होणार नाही.