इंडियन चिनी भाई भाई फक्त म्हणण्यापुरतेच आहे. आता हेच बघा गोल गरगरीत हा दुधासारखा दिसणारा पांढराशुभ्र मोमो उकडीच्या मोदकाचा फक्त म्हणण्यापुरता भाऊच तर आहे! हे जरी एकसारखे दिसत असतील पण त्यांची चव व घटक फार वेगळे आहेत.

मोमोज मध्ये दोन प्रकार आहेत एक वेज मोमोज आणि चिकन मोमोज. आज आपण चटपटीत घरगुती चिकन मोमोज शिकणार आहोत.

  • मोमोज साठी लागणारे साहित्य :
  1. 250 ग्रॅम चिकन (उकडलेला चिकन खिमा)
  2. मैदा दोन वाट्या
  3. 2 चिरलेले कांदे
  4. 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, लसूण ७ ते ८ पाकळ्या
  5. तेल
  6. चवीनुसार मीठ
  • कृती :

प्रथम एका बाऊलमध्ये गरम पाण्यात एक चमचा तेल आणि मीठ टाकावे. ते पाणी मैद्यात टाकून घट्ट पीठ मळून घ्यावे. हे पीठ छान मळून अर्धा तास झाकून ठेवावे.

दुसऱ्या बाऊलमध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिरलेला कांदा, लसूण आणि आल्याची पेस्ट घालावी, त्यात उकडलेला चिकन खिमा मिक्स करून आवश्‍यकतेनुसार सोयासॉस ऍड करून त्याला सेट करायला ठेवावे.

मैद्याच्या पिठाचे छोटेसे गोळे करून ते मध्यम पातळ लाटावेत. त्यावर एक चमचा तयार सारण टाकावे. आता लाटलेल्या पारीची एकावर एक घडी घालून दुमडा, असे पुरेसे मोमो तयार झाल्यावर इडली पात्राला तेलाचा हात फिरवून ते १२ मिनिटे वाफवून घ्या. (टीप :उकडताना मोमो फाटत असतील तर मैदा एकसारखा मळून गोळा करावा.) बारा मिनिटे मोमोज वाफवून झाल्यावर गरमागरम चिकन मोमो शेजवान सॉस किंवा मेयॉनीजसोबत सर्व्ह करा.