सध्या दिल्लीच्या प्रदूषित वातावरणाची चर्चा सुरुय भाऊ. दिल्ली दिलवालोंकी म्हणता म्हणता दिल्ली पोल्युशनकी कधी झाली हे समजलंच नाही. भारतात अनेक शहरांमध्ये प्रदूषणाने चिंताजनक पातळी गाठली असली तरी दिल्ली ही भारताची राजधानी असल्याने एकूणच लोकसंख्या आणि राजधानीचे महत्व लक्षात घेता दिल्लीची जास्त चर्चा होणे स्वाभाविक आहे.

पण भाऊ, आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत चिंताजनक गोष्ट सांगणार आहोत…

आमच्याकडे आलीय जगातल्या सर्वात जास्त प्रदूषित 20 शहरांची यादी. आता या 20 शहरात भारतातील किती शहरांचा समावेश असेल असे तुम्हाला वाटते? पाच? सात? जास्तीत जास्त दहा? नाही… जगातल्या सर्वात जास्त वीस प्रदूषित शहरात फक्त एकट्या भारतातील तब्बल तेरा शहरे आहेत!

विश्वास बसत नाही? मग हे वाच भाऊ…

20. उलनबातार (मंगोलिया)

उलनबातार ही मंगोलिया देशाची राजधानी आहे. या वर्षी प्रदूषणामुळे लहान मुले आणि म्हाताऱ्या माणसांना या शहरातून बाहेर काढून ग्रामीण भागात नेण्यात आले आहे. विषारी वायूमुळे मुले आणि जेष्ठ नागरिक मृत्युमुखी पडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली.

19. बाओडिंग (चीन)

बाओडिंग मध्ये प्रदूषणाचे कारण आहे कोळसा कारखाने. संपूर्ण शहराला कोळसा निर्मित विजेचा पुरवठा होतो. या वीजनिर्मिती कारखान्यांचे उंचच उंच धुराडे अखंड वातावरण प्रदूषित करत राहतात. यामुळे फक्त शहराचेच नाही तर आसपासच्या कित्येक किलोमीटरवरील खेडेगावांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

18. नारायणगोन्ग (बांगलादेश)

नारायणगोन्ग शहराच्या आसपास कित्येक विटांचे कारखाने आहेत. इथून वाहणाऱ्या शितलाख्या नदीमध्ये कारखान्याचे सांडपाणी सोडले जाते. विटांच्या कारखान्यांचे हवेत उडणारे धुळीचे कण इथल्या नागरिकांसाठी मोठी समस्या बनले आहेत.

17. जोधपूर (भारत)

सतराव्या क्रमांकावर जोधपूरचा नंबर लागतो. ब्लु सिटी नावाने ओळखले जाणारे हे शहर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. परंतु हे शहर वाळवंटात वसले असल्याने इथे रेती तसेच धुळीचे प्रमाणही प्रचंड आहे. त्यात इथे पाऊस पडत नसल्याने ही धूळ वातावरणातच फिरत राहिल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

16. पटियाला (भारत)

पंजाबचे हे सुंदर शहर सध्या प्रदूषणाच्या विळख्याने ग्रस्त आहे. इथले प्रमुख उत्पादन गहू आहे. या गव्हावर प्रक्रिया करणाऱ्या असंख्य कारखान्यामधून वातावरणात छोटे छोटे कण सोडले जातात. त्यामुळे इथली हवा श्वासोच्छ्वास घेण्यासाठी दूषित बनली आहे.

15. कम्पाला (युगांडा)

कम्पाला येथील प्रदूषणाचे मुख्य कारण आहे इथल्या वाहनांमधून सोडला जाणारा विषारी धूर. इथले वाहनचालक प्रदूषणाचे नियम पाळत नसल्याने ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. अश्या वाहनांना रस्त्यावरून प्रवास करणे रोखण्यासाठी खास सैनिकी पथके तैनात करण्याची वेळ इथल्या प्रशासनावर आली.

14. जयपूर (भारत)

जयपूरचे प्रदूषण मानवनिर्मित नाही तर निसर्गनिर्मित आहे. इथे मोठ्या प्रमाणात धुके पडते. त्यात या शहरात माकडांची संख्याही प्रचंड प्रमाणात आहे. धुक्यामुळे कमी होणारी दृश्यमानता आणि माकडांनी केलेले उत्सर्जन यामुळे इथले नागरिक सध्या त्रस्त आहेत.

13. रावळपिंडी (पाकिस्तान)

पाकिस्तानचा औद्योगिक परिसर म्हणून रावळपिंडीला ओळखले जाते. या परिसरात स्टील कारखाने, कातडी कमावण्याचे कारखाने, मार्बल कारखाने आणि तेल उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व उद्योग निर्माणातून होणारे विषारी वायू सरळ हवेत सोडले जातात.

12. पेशावर (पाकिस्तान)

विटांच्या कारखाण्यामुळे प्रदूषित होणारे हे आणखी एक शहर. इथल्या प्रचंड संख्येने असणाऱ्या विटांच्या कारखान्यामुळे शहरावर कायम काळे ढग पसरलेले असतात.

11. मुजफ्फरपूर (भारत)

ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या अभ्यासानुसार बिहार भागातील मुजफ्फरपूर आणि आसपासच्या परिसरातील होणाऱ्या मृत्यूंमध्ये तब्बल 33 टक्के मृत्यू हे फक्त दूषित वातावरणामुळे होत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

10. गुरुग्राम (भारत)

दिल्लीच्या अगदी जवळ असणारे हे शहर अनेक जागतिक कंपन्यांचे भारतातील हेडक्वार्टर आहे. गुगल, इंटेल सह 500 कंपन्यांचे ऑफिस गुरुग्राममध्ये स्थित आहे. परंतु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ठरवून दिलेल्या प्रदूषण स्तराच्या तब्बल 12 पटीने अधिक प्रमाणावर इथला प्रदूषण स्तर पोचलाय.

09. आग्रा (भारत)

आग्रा शहरात टायर पुनरप्रक्रिया उद्योग जास्त प्रमाणात असल्याने इथे मोठ्या संख्येने टायर जाळले जातात. यातून निर्माण होणाऱ्या विषारी वायूमुळे तसेच छोट्या कणांमुळे आग्रा जगात प्रदूषणग्रस्त शहरांच्या यादीत नवव्या क्रमांकावर जाऊन पोचले आहे.

08. बामेंडा (कॅमेरून)

गेल्या काही वर्षात इथे खूपच वृक्षतोड झाली. त्यामुळे इथल्या नैसर्गिक वातावरणात अनेक गंभीर बदल झाल्याने बामेंडा भारताबाहेरचे सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखले जाते.

07. लखनौ (भारत)

इथे कमी जागेत बेसुमार वाहने रस्त्यांवर धावत असल्याने लखनौचे वातावरण अत्यंत दूषित बनले आहे. त्यावर प्रशासनाने मेट्रो रेल्वेचा उपाय शोधलाय खरा, पण त्याचा कितपत फायदा होतो ते बघावे लागेल.

06. दिल्ली (भारत)

जगातल्या सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताची राजधानी दिल्ली सहाव्या क्रमांकावर यावी हे भारतीयांसाठी निश्चितच भूषणावह नाही. बेसुमार वाहने आणि कचरा जाळण्याचा प्रश्न तर आहेच, पण त्यासोबत इथले धुके हे विषारी वायू धरून ठेवते हा ही प्रश्न दिल्लीच्या नागरिकांना सतावत आहे.

05. पाटणा ( भारत)

पाटण्यात अनेक हिंदू भाविक छटपूजेच्या निमित्ताने येत असतात. त्यांची संख्या आणि धुके यामुळे इथले प्रदूषण वाढले आहे.

04. वाराणसी (भारत)

वाराणसीला भारताची धार्मिक राजधानी समजले जाते. पण सध्या इथे मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने वातावरणात धुळीचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. त्यामुळेच वाराणसी चौथ्या क्रमांकावर जाऊन पोचलंय.

03. गया (भारत)

इतर अनेक शहरांप्रमाणेच इथेही धुक्याचे प्रमाण जास्त आहे. धुके दूषित वायूंना धरून ठेवते. त्यामुळे गया सुद्धा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

02. फरिदाबाद (भारत)

असंख्य कारखाने, त्यातून सोडले जाणारे सांडपाणी, धुराड्यांमधून सोडला जाणारा विषारी वायू आणि या सर्वांना शहरातच धरून ठेवणारे धुके! फरिदाबादने अश्या पद्धतीने दुसरा क्रमांक पटकावलाय.

01. कानपूर (भारत)

जगात सर्वात जास्त प्रदूषित शहर हा मान कानपूरने मिळवलाय. कानपूरचा जनावरांच्या कातड्याचा उद्योग जगप्रसिध्द आहे. परंतु या उद्योगामुळे इथल्या नागरिकांचे जीवन मात्र धोक्यात आहे. कातड्यावर प्रक्रिया करताना क्रोमियम हा अत्यंत विषारी वायू वातावरणात सोडला जातो. हे क्रोमियम आरोग्याचे नुकसान करते.