ऍसिडिटी! भल्याभल्यांची झोप उडवणारा हा आजार… पोटातल्या गॅस्ट्रिक ग्रंथी मधून अधिक प्रमाणात ऍसिड उत्सर्जन होते तेव्हा ऍसिडिटी होते. यामुळे गॅस निर्माण होणे, श्वासाचा दुर्गंध येणे, पोट दुखणे आणि इतरही काही समस्या येऊ शकतात. ही ऍसिडिटी होण्याची कारणे काय? तर दोन जेवणामध्ये जास्त अंतर असणे, बराच वेळ पोट रिकामे राहणे, जास्त प्रमाणात चहा कॉफीचे सेवन आणि सिगारेट दारूचे व्यसन यामुळे हा आजार होऊ शकतो. एकदा का ऍसिडिटीने आपल्या शरीराचा ताबा घेतला की नंतर त्यावर औषध घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण आम्ही तुम्हाला आज यावर असे उपाय सांगणार आहोत जे पूर्णतः नैसर्गिक आणि घरगुती आहेत. सहज उपलब्ध असणारे हे पर्याय वापरून तुम्ही ऍसिडिटीला दूर ठेऊ शकता. मग वाचा आपले सहज सोपे उपचार…
तुळशीची पाने
तुळस प्रत्येकाच्या घरात असते. ही खूपच औषधी वनस्पती आहे. तुळशीची पाने चावून खाल्ल्यास ऍसिडिटी पटकन कमी होते. याशिवाय तुळशीच्या पानांचा काढाही करता येतो. कपभर पाण्यात चार-पाच पाने टाकून काही मिनिटे उकळून ते पाणी थोड्या थोड्या अंतराने पित गेल्यास ऍसिडिटी पळून जाते.
बडीशोप
जेवण झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी बडीशोप खावी असे सर्वच आहार तज्ज्ञांचे मत आहे. पण यामुळे फक्त मुखशुद्धीच होते असे नाही तर अन्नाचे पचनही चांगले होते. तसेच बडीशोपमुळे ऍसिडिटी होण्यास आळा बसतो. नुसती सोप चावून खाणे किंवा सोपचा चहा बनवून तो पिणे या दोन्ही प्रकारे ऍसिडिटी दूर ठेवता येते.
दालचिनी
भारतीय मसाल्यांचा हा महत्वाचा घटक आहे. प्रत्येक घरात दालचिनी असतेच. दालचिनीमध्ये पोषक तत्वांचा मोठा साठा असतो तसेच शरीराला आवश्यक असणारे घटकही यात मोठ्या प्रमाणात आढळतात. दालचिनीचा चहा करून पिल्यास आतड्यात असणारे इन्फेक्शन नष्ट होते व ऍसिडिटीला आळा बसतो.
ताक
आयुर्वेदात ताकाला सात्विक आहार असे संबोधले गेले आहे. जर अति तेलकट आणि उग्र अन्न खाण्यात आले तर वरून ताक प्यावे असे म्हणतात. तेलकट तिखट पदार्थांमुळे होणारी पोटाची जळजळ ताक थांबवू शकते. ताकात थोडी काळी मिरी पावडर किंवा कोथिंबिरीची काही पाने टाकून पिल्यास आणखी छान फायदा होतो.
गूळ
आपले पूर्वज नेहमी जेवण झाल्यावर गुळाचा खडा खात असत कारण गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. हे मॅग्नेशियम आतड्यांना मजबूत बनवते. गूळ सेवन केल्यास पचनशक्ती वाढते. शरीराचे तापमान योग्य प्रमाणात राखण्यासाठी आणि पोट थंड ठेवण्यासाठी गुळाचा वापर होतो. उन्हाळ्यात गुळाचे सरबत करून पिल्यास ऍसिडिटी त्वरित थांबते.
लवंग
भारतीय आयुर्वेदात आणि चायनीज औषधशास्त्रात लवंगेला पूर्वापार काळापासून खूप महत्व दिले गेले आहे. आतड्यात होणारा गॅस लवंग खाल्ल्यास कमी होतो. डाळ शिजवताना त्यात चार लवंगा टाकल्यास चव येते आणि ऍसिडिटी कमी होण्यासही मदत होते. समप्रमाणात लवंग आणि इलायची कुटून त्याची पावडर रोज सेवन केल्याने श्वासाचा दुर्गंध थांबतो.
जिरे
जिरे हे ऍसिडिटी थांबवण्यासाठी अत्यंत परिणामकारक औषध आहे. जिरे पाचक असून पचनशक्ती सुधारते. पोटदुखीवर जिऱ्याचा उपयोग केल्यास पोट दुखणे थांबते. थोडे जिरे तव्यावर भाजून किंचित चुरडुन ग्लासभर पाण्यात मिसळून ते पाणी पिता येते किंवा कपभर पाण्यात एक चमचा जिरे टाकून ते पाणी उकळून जेवण झाल्यानंतर पिल्यास चांगला फायदा होतो.
आलं
आले किंवा अद्रक हे अनेक व्याधींवर परिणामकारक औषध आहे. आल्यामध्ये प्रचंड औषधी गुणधर्म असल्याने त्याचा शरीराला मोठा फायदा होतो. जेवण झाल्यानंतर आल्याचा छोटा तुकडा चघळावा. त्याने पोटात अति प्रमाणात स्त्रावले जाणारे ऍसिडचे प्रमाण कमी होते. शिवाय रोज दोन चमचे आल्याचा रस पिणे किंवा आल्याचा तुकडा थोडा कुटून कपभर पाण्यात उकळून ते पाणी पिणे हे चांगले पर्याय ठरू शकतात.
थंड दूध
दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. हे कॅल्शिअम ऍसिडिटी रोखते. एक ग्लास थंड दूध रोज पिल्यास ऍसिडिटी होत नाही असा सल्ला डॉक्टर देतात. परंतु ज्यांना दुधाची ऍलर्जी आहे किंवा दूध पचत नाही त्यांनी हा उपाय करू नये.
नारळ पाणी
नारळ पाणी ऍसिडिटीवर फारच उत्तम उपाय आहे. नारळ पाणी पिल्यास शरीरातील ऍसिड कमी होऊन पीएच लेव्हल योग्य प्रमाणात राखली जाते. त्याचसोबत आतड्यातील अन्न योग्य प्रकारे पचवले जाऊ शकते. नारळ पाणी हे फायबरने समृद्ध असल्याने पचनशक्ती तर वाढवतेच, पण नेहमी होणारी ऍसिडिटी सुद्धा थांबवते.
तर मग आता ऍसिडिटीपासून होणाऱ्या त्रासातून वाचण्यासाठी हे सहज सोपे घरगुती उपाय करायला हरकत नाही. पण हे बघ भाऊ, जर जास्त त्रास होत असेल तर सरळ डॉक्टरांना दाखवलेले केव्हाही उत्तम असते.
लेख कसा वाटला ते कमेंटबॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेअर करायला विसरू नका भाऊ. तुमचा एक शेअर अनेकांची तब्येत सांभाळू शकतो.