“भैया जी, एक पाणीपुरी बनाओ तो, तिखा थोडा जादा ही रखो हा!” रस्त्याच्या कडेने चालताना ही अशी वाक्यं कानावर पडली नाहीत तर नवलच! नाही का? आपल्याकडे सर्वांना तिखट खायला आवडतं. लहानपणापासूनच तिखट खाण्याची सवय असल्यामुळे, कोणताही पदार्थ खा, तिखट थोडं जास्तच हवं लागतं. म्हणूनच आपल्याला जेवणात हे सतत हवं लागणारं तिखट आपल्या आयुष्यासाठी कितपत फायदेशीर किंवा धोकादायक आहे हे जाणून घेणं ही तितकंच महत्वाचं आहे.
साधारण लोकांना अतितिखट खाण्याची सवय असेल तर त्या सवयीला आवर घालण्याचा सल्ला देताना आपण पाहिलं आहे. अनेक जणांना तिखट भाज्या आणि मसालेदार खाण्यास आवडतं. इतकंच नव्हे तर अनेक जण जेवताना वरून तिखट घेऊन खातात. गोड खाण्यापेक्षा तिखट खाणं हे अनेकांना आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर वाटतं. कारण इतरांचं ऐकण्यापेक्षा कधीही मनाला जे वाटेल तेच अनेकजण करतात. परंतु हे तिखट आरोग्यासाठी खरंच किती फायदेशीर आहे, याचाही एक अभ्यास समोर आला आहे. चला तर मग जाणून घेऊया…
तिखट आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
मिरपूडांचे रासायनिक घटक असलेले कंपाऊसिनॉइड्स! ज्यात कंपाऊंड कॅप्सिसिनचा समावेश असतो. यामुळेच तिखट पदार्थांमध्ये मसालेदार चव निर्माण होण्यास मदत होते. यावरून अनेक संशोधकांनी केलेल्या अभ्यासावरून तिखट आणि मसालेदार पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, असे स्पष्ट झाले आहे.
रक्तदाब नियंत्रित राखण्यास तिखट उपयुक्त?
तिखटाबद्दल केलेल्या अभ्यासात अभ्यासकांना तिखट खाण्यामुळे वजनवाढ आटोक्यात राहाते, पचनक्रिया सुधारते आणि रक्तवाहिन्यांमध्ये समस्या निर्माण होण्यास तिखट प्रतिबंध करतं असं आढळून आलं. तिखटामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, असेही सांगण्यात आले आहे.
वजनवाढ रोखण्यास तिखट करते मदत!
स्वतःच्या स्वास्थ्याचा विचार करून अनेक जण डायटकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतात. तरुणांचे सर्वांत जास्त प्रमाण यात आपल्याला पाहायला मिळते. मग अट्टहास सुरु होतो तो म्हणजे फिट राहण्याचा! त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याची सर्वांची तयारी असते खरी, परंतु काही जण मनापासून ती कामगिरी पार पाडतात, तर काही जण अर्ध्यावरूनच माघार घेतात. काही जणांकडून बरीच पथ्यं पाळली जातात, तर काही जणांकडून पथ्यं पाळली जातात खरी, परंतु उलट पद्धतीची! या सर्व गोष्टींमुळे वजनवाढीवर आपले नियंत्रण राहत नाही. म्हणूनच तिखट वजनवाढीला आटोक्यात आणण्यासाठी खूप मदत करते.
‘कॅप्सिकीन’ हा मिरचीमधला महत्त्वाचा घटक असून हा चांगल्या प्रमाणात वजनवाढ रोखण्यास मदत करतो. तसेच जर तुम्ही खाण्याविषयी खुप विचार करता आणि नेहमी लो कॅलरी खाने पसंत करता तर मिरची एक चांगले ऑप्शन आहे. हिरव्या मिरचीमध्ये कॅलरी नसते. जर तुम्ही डायटींग करत असाल तर मिरची लठ्ठपणा कमी करण्यासाठी लाभदायक आहे. परंतु तरीही अतितिखट खाण्यामुळे तिखटाचे चांगले परिणाम झाकोळले जाऊ शकतात.
अल्सरसाठी तिखट पदार्थ धोकायदायक?
‘एच पायलोरी’ नावाच्या जंतूचा संसर्ग हे जठराच्या तसेच लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागाच्या अल्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. या जंतूंची लागण दूषित अन्न व पाण्यातून होते. अल्सरचे काही रुग्ण अगदीच गुंतागुंतीच्या गंभीर परिस्थितीत डॉक्टरांकडे येतात. अशा रुग्णांमध्ये अल्सर फुटून आतडय़ाला छिद्र पडलेले असू शकते. या रुग्णांना अचानक पोटात प्रचंड दुखू लागणे, उलटय़ा होणे आणि पोट गच्च होऊन फुगणे ही लक्षणे दिसतात. परंतु मग हे रुग्ण सरळपणे तिखट आणि मसालेदार खाण्याला कारणीभूत ठरवून मोकळे होतात. यामागील खरे कारण शोधण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. खरे तर अल्सरसाठी तिखट पदार्थ धोकायदायक नसून एच पायलोरी नावाच्या जंतूचा संसर्ग कारणीभूत असतो, असे स्पष्ट झाले आहे.
आजच्या काळात बाहेर जेवायला जायचे म्हंटले की सगळे एका पायावर तयार होतात, परंतु गेल्या काही वर्षांपासून या बाहेरच्या पदार्थांमध्ये चायनीजचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात तिखट पदार्थांचे प्रमाणही जास्त असल्यामुळे याचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरल्या जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आलं, तुळस, काळीमिरी हे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. याचसोबत मसालेदार पदार्थांमुळे अल्सर होऊ शकत नाही, परंतु आपणास इरिटिट बोवेल सिंड्रोम, डिस्पेपसिया किंवा दाहक आतड्यांचा रोग (आयबीडी) असल्यास सावधगिरी बाळगायाला हवी. मूलभूतपणे, जर मसालेदार पदार्थ आपल्याला पोटदुखी देत असतील तर खाण्यापूर्वी आपण नक्कीच विचार करायला हवा. मसालेदार पदार्थ आरोग्यदायी असतात. परंतु मसालेदार पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण किती असायला हवे हे आपले आपल्यालाच ठरवायला हवे. तिखट पदार्थ शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर नक्कीच ठरतात परंतु कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन करताना आपणही आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी.