मधुमेह हा वास्तवात श्रीमंतांचा म्हणून ओळखला जाणारा आजार. मात्र मागील तीस-चाळीस वर्षांमध्ये आपल्या समाजामध्ये झालल्या अनेक सामाजिक व आर्थिक बदलांमुळे या रोगाने विसाव्या शतकाच्या अंतिम दशकांमध्ये मध्यमवर्गाला आणि आता २१व्या शतकात समाजाच्या आर्थिक दृष्ट्या निम्न स्तरातील लोकांनासुद्धा आपल्या कचाट्यात घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय समाजातील निम्न स्तरातील लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. इतकंच नव्हे तर मधुमेहामुळे होणार्‍या लकवा मारणे, हार्ट अटॅक येणे, किडनी फेल होणे, डोळे अंधकू होणे, पाऊल कापावे लागणे आदी जीवनास घातक विकृतीचे प्रमाण त्यांच्यामध्ये वाढत चालले आहे. त्यामागची कारणे काय, हे कळले तर त्यांचा प्रतिबंध सुद्धा करता येईल.

* आपल्या आरोग्याविषयी दुर्लक्ष्यपणा.

* आजार झाला तरी दुर्लक्ष करण्याची वृत्ती.

* धूम्रपान, तंबाखु, गुटखा, मद्यपान अशा मादक पदार्थांचे न सुटणारे व्यसन व व्यसनाधीनतेमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष.

* शरीराला पोषक फळे न खाण्याची सवय किंवा इच्छा असली तरी फळे न परवडणे.

* जीवनसत्त्वे, खनिजे व चोथा पुरवणार्‍या आरोग्यदायी भाज्यांचे अल्प सेवन(वरील कारणांमुळे व वेळेअभावीसुद्धा).

* जेवण शिजवण्यासाठी अयोग्य खाद्यतेलाचा वापर.

* रोजच्या कष्टमय-व्यस्त दिनचर्येमध्ये बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याकडे कल.

* दिवसभरातून काही ना काही कारणाने चार ते पाच वेळा चहा व नकळत साखरेचे अतिसेवन!

* शिळ्या अन्नपदार्थांचे सतत सेवन.

* सहज उपलब्ध व स्वस्त अशा बेकरीच्या पदार्थांचे सतत सेवन

* एकंदरच रिफाइन्ड कार्बोहैड्रेट्स अतिसेवन

* शरीर मेहनतीला पूरक-पोषक आहाराचा दुर्लक्ष्यपणा, ज्यामुळे शरीर अंगांची होणारी झीज

* योग्य व्यायामाची कमतरता

* शरिरक्रिया व शरिररचनेने अज्ञान

* मधुमेह झाल्याचे कळले तरी अज्ञानामुळे थातूरमातूर-अयोग्य उपचार घेणे

* आजार झाल्यावर औषधांना व्यायाम व योग्य आहाराची जोड न देणे

* मधुमेहावर डॉक्टरांनी सुचवलेली औषधे पैशाअभावी खरेदी करु न शकणे.

* औषध-उपचार अर्धवट सोडून देणे.

(यातले काही मुद्दे तुम्हांला लागू होत नाहीत ना?)