मंडळी, आपल्या देशाच्या कायद्यांविषयी आणि नागरी अधिकारांविषयी आपण सगळेच चर्चा करतो. कायदे आणि अधिकार जाणून घेणे अगदी योग्य आहे. पण काही गोष्टी अश्या असतात की त्यांच्याबद्दल आपल्याला माहितीच नसते. त्यापैकी कुठल्या गोष्टीची कधी गरज पडू शकते हे सांगता येत नाही. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत खास आपल्यासाठी विशेष माहिती. तर मग हे बघ भाऊ…

1. सिलिंडरचा स्फोट झाल्यास मिळू शकतात चाळीस लाख!

आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे की प्रत्येक एलपीजी सिलिंडर वापरकर्त्याच्या नावे चाळीस लाखांचे विमा कवच असते. घरातल्या सिलिंडरचा अपघाताने स्फोट झाल्यास चाळीस लाखापर्यंत रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळू शकते. दुर्दैवाने कुणाचा मृत्यू झाला किंवा मालमत्तेचे नुकसान झाले तर तुम्ही भरपाई मिळवण्यासाठी विम्याचा दावा दाखल करू शकता.

2. गिफ्ट दिल्यास तो ठरू शकतो गुन्हा!

आजकाल कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये एकमेकांना गिफ्ट देण्याची फॅशन आली आहे. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने सहज गिफ्ट दिले घेतले जातात. पण सावधान… गिफ्ट देणे म्हणजे एकप्रकारे काम करून घेण्यासाठी लाच देणे आहे असे सरकार मानते. त्यामुळे जरा जपूनच! आपल्याला याविषयी अधिक माहिती ‘फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट 2010’ मध्ये वाचायला मिळेल.

3. महिलांना फक्त महिला पोलिसच अटक करू शकतात.

एखाद्या महिलेला संशयावरून किंवा पुराव्यावरून अटक करायची असेल अथवा पोलीस स्टेशनला न्यायचं असेल तर महिला पोलीसांनी ती कारवाई करणे अपेक्षित असते. इतकंच नव्हे तर संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत आरोपी महिला पोलीस स्टेशनला येण्यास नकार देऊ शकते. तो तिचा अधिकार आहे. समजा फारच गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल आणि महिला पोलीस उपलब्ध नसतील तरच मॅजिस्ट्रेटच्या स्पेशल परवानगीने पुरुष पोलीस एखाद्या महिलेला अटक करू शकतात.

4. कर वसुली अधिकाऱ्याकडे असतात अटक करण्याचे अधिकार.

अनेकांना हे माहीत नसते की कर चुकवल्यास किंवा कर संबंधी नियम तोडल्यास फक्त पोलिसच नाही तर कर वसुली अधिकारी सुद्धा समन्स पाठवून अटक करू शकतात. गुन्ह्याच्या स्वरूपावरून किती दिवस कोठडीत ठेवायचे आणि केव्हा सोडायचे याचेही अधिकार त्यांच्याकडे असतात.

5. वाहतुक कायदा या वाहनांना लागू नाही.

वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत हे मान्य करायलाच हवं. परंतु यातून काही वाहनांना सूट दिली गेली आहे. त्यांनी चुकून कायदा तोडलाच तर त्यांना शिक्षा होऊ शकत नाही. कोणती ती वाहने? तर ज्या वाहनात मोटर नसते, उदाहरणार्थ सायकल किंवा रिक्षा अश्यांना वाहतुकीचे नियमही लागू नसतात. कारण ही वाहने मोटार वेहीकल ऍक्ट मध्ये येत नाहीत.

6. महिला इमेल द्वारेही तक्रार दाखल करू शकतात.

दिल्ली पोलिसांच्या गाईडलाईन अनुसार समजा एखाद्या महिलेला पोलीस स्टेशन मध्ये जाण्यास अडचण असेल तर ती महिला सरळ इमेल वरून तक्रार दाखल करू शकते. इतकंच नव्हे तर सोशल मीडिया वर टाकलेली पोस्ट सुद्धा तक्रार म्हणून ग्राह्य धरता येते.

7. लिव्ह-इन कायदेशीर की बेकायदेशीर?

हा अनेकांच्या औत्सुक्याचा प्रश्न आहे. समजा सज्ञान स्त्री पुरुष लग्न न करता एकत्र राहत असतील तर ते कायदेशीर असेल का? हो. कायद्याची त्याला मान्यता आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे नाही. त्यातही जर एकमेकांची आर्थिक बाजू सांभाळून जोडपे एकत्र राहत असेल तर त्याला अधिकृत लग्नाएवढाच दर्जा दिला जातो. जर लिव्ह इन संबंधातून मुले जन्मली तर त्यांना कायद्याने पालकांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगता येतो.

8. एका दिवसात वाहतुक नियम तोडल्याचा किती वेळा दंड लागू शकतो?

समजा तुम्ही हेल्मेट न वापरता गाडी चालवत आहात आणि चौकात वाहतूक पोलिसांकडून पकडला गेलात तर अर्थातच तुमच्यावर दंड बसतो. मग पुढच्या चौकात गेल्यावर परत दंड बसेल का? नाही! तुम्ही दिवसातून फक्त एकदाच दंड भरून त्या पावतीवर मध्यरात्री 12 पर्यंत विना हेल्मेट गाडी चालवू शकता. लक्षात घ्या, कायदा जरी असा असला तरी आपली सुरक्षा तितकीच महत्वाची असते. त्यामुळे दंड बसला तरी वाहतूक नियम पाळा आणि हेल्मेट घालूनच गाडी चालवा.

9. सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे प्रदर्शन केल्यास तुरुंगवास.

सार्वजनिक ठिकाणी, बागेत, रस्त्यावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेली अनेक जोडपी आपण बघितली असतील. आजकाल हे दृश्य अगदी सहज वाटते पण ते कायद्याच्या दृष्टीने सहज नाही. जर सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे प्रदर्शन केले तर सरळ तीन महिने तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

10. दत्तक घेण्यासंबंधी नियम.

आपल्यापैकी अनेकांना एखादे मुल दत्तक घेण्याची इच्छा असते. ‘हिंदू अडॉप्टेशन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956’ अनुसार जर तुम्हाला आधीच एक मुलगा असेल तर तुम्ही दुसरा मुलगा दत्तक घेऊ शकत नाही. हे मुलींबाबत सुद्धा लागू आहे. जर एक मुलगी असेल तर दुसरी मुलगी दत्तक घेता येत नाही. तसेच पालक आणि दत्तक मुल यांच्यात कमीत कमी 21 वर्षांचे अंतर असणे गरजेचे आहे.

मग कशी वाटली ही माहिती? यापैकी किती गोष्टी तुम्हाला माहीत होत्या ते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा. आणि हे बघ भाऊ, लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नको!