मुंबई; देशाचं आर्थिक राजधानीच ठिकाण म्हणून ओळखलं जायचं, ते आता अनेक समस्यांना तोंड देत आहे. वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, पाणी, समुद्र पाणी पातळीतील वाढ, घटती जंगले, तोडले जात असलेले वृक्ष, हवा प्रदूषण, जमिनीचे काँक्रीटायझेशन, पूर समस्या, जल प्रदूषण, रस्ते, वाढती वाहनं, त्यामुळे होणारी ट्रॅफिकची समस्या अशी ही लिस्ट वाढत जाईल, परंतु समस्या मात्र कमी होत असताना आपल्याला दिसत नाहीत.
या सर्वांमध्ये सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर मुंबई पाण्याखाली जाणे, ही सगळ्यात मोठी समस्या आहे.
Organisation of Economic Cooperation and Development (OECD) या संघटनेने पुराव्यानिशी 2007 मध्ये एक रिपोर्ट जाहीर केली होती, त्यात मुंबई आणि कलकत्ता ही दोन शहरं कशाप्रकारे पाण्याखाली जात आहेत याबाबत माहिती छापली गेली होती.
मुंबई शहराचं ठिकाण –
- पश्चिम किनार पट्टीवरील नैसर्गिक बंदर असलेलं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे.
- मुंबईच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला सह्याद्री पर्वत रांग आहे.
- मुंबईला पावसाळ्यात मान्सून वारे थेट धडकत असल्याने मोठ्याप्रमाणात पाऊस पडतो.
- मँगरुव्ह जंगलावर मुंबई शहर वसलेलं आहे.
मुंबई पाण्याखाली जाण्याची कारणं –
मुंबई सारखं अतिप्रसिद्ध आणि अति लोकसंख्या असलेलं शहर पाण्याखाली जातंय, त्यासाठी मूलतः मानव ही एकच गोष्ट जबाबदार आहे, माणसाची हाव ही एकमेव गोष्ट जबाबदार आहे. परंतु समजण्यासाठी आपण त्या कारणांचे दोन भागात विभाजन करू.
1. मानव निर्मित
2. नैसर्गिक
1. मानव निर्मित कारणे –
- मुंबई शहराची वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकरण, वाहनांची वाढती संख्या आणि या सर्वांसाठी पायाभूत सोयीसुविधा पूवण्याच्या नावावर संपूर्ण शहराच्या भागावर झालेले काँक्रीटायझेशन.
- काँक्रीटायझेशनमुळे या भागात पडणाऱ्या पावसाचे पाणी आणि सांडपाणी आणि इतर कसल्याही प्रकारच्या पाण्याला जमिनीत मुरायला वावच नाही. पाणी जमिनीत मूरत नाही कारण सगळीकडे जमिनीवर सिमीटाचे आणि डांबराचे जाडच जाड थर आपल्याकडून तयार केले गेले आहेत.
- एकीकडे पाणी जमिनीत मुरत नाही, तर दुसरीकडे आपणच मोठ्याप्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा मात्र चालूच ठेवलाय. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी तर कमी होतेच, पण ती पाणी पातळी वाढाण्यासाठी लागणारे सर्व मार्ग आपणच बंद केलेत.
- परिणामी जमिनीत पाणी मुरत नसल्याने, जमिनीत आधीच्या ज्याठिकाणी पाणी होते त्याठिकाणी पोकळी निर्माण होते. आणि ती पोकळी पाण्याने भरत नसल्याने जमीन हळूहळू खाली धसु/सरकू लागते.
- जमीन खाली सरकू लागल्यामुळे आणि समुद्र किनारपट्टीवर शहर असल्यामुळे समुद्राचे पाणी शहरात यायला सुरुवात होते.
- मुंबई हे शहर मँगरुव्ह जंगलावर वसलेलं आहे. परंतु दिवसेंदिवस येथील मँगरुव्ह जंगलावर मोठ्याप्रमाणात बांधकाम होत आहे. जंगल नष्ट करण्याचं काम चालू आहे. या जंगलांना मानवी जमात ओरबडून खात आहे.
- मँगरुव्ह जंगल पावसाळ्यात आणि भरतीच्यावेळी पाणी साठवण्याच काम करतात आणि ते पाणी जमिनीत मुरवतात. तुम्ही या भागाचं काँक्रीटायझेशन करून पाणी मुरवण्याचा एक मार्ग बंद करता आणि दुसरीकडे पाणी मुरवण्याचा दुसरा मार्ग (मँगरुव्ह) सुद्धा बंद करताय. त्यामुळे जमितील ती पोकळी जास्त काळ टिकून राहू शकत नाही, त्यामुळे जमीन हळूहळू खाली सरकेल आणि समुद्राचे पाणी शहरात येईल आणि मुंबई पाण्याखाली जाईल.
2. नैसर्गिक/ हवामान बदल –
- खरं पाहायला गेलं तर हवामान बदलाला सुद्धा मानवच जबाबदार आहे आणि हवामान बदल हा मानव निर्मित आहे, परंतु हे एक वैश्विक कारण असल्यामुळे आपण याला एक वेगळा आणि विशेष मुद्दा मानतो.
- Climate Change मुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवावरील बर्फ मोठ्याप्रमाणात आणि खूप वेगाने वितळण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी बर्फ स्वरूपात असलेल्या एवढ्या अतिरिक्त पाण्याला साठवुन घेण्याची क्षमता आपल्या महासागरामध्ये सुद्धा नाहीये. परिणामी महासागराच्या पाणी पातळीत वाढ होणार आणि किनारपट्टीवरील सर्व भागांना हे पाणी बुडवणार, हे निश्चित.
- जागतिक तापमानवाढ मोठ्याप्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक जीवांचे, प्राण्यांचे, पक्षांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे जैवसंस्था बिघडत आहे. जैवसंस्था बिघडली कि तापमान वाढ होणार कारण अनेक जैवसंस्थेतील घटक तापमान नियंत्रणात मदत करतात हे आपल्याला सांगायची गरज नाही आणि तापमान वाढ झाली की समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होते आणि हे समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील शहरांना गिळून टाकणार, कारण गिळून टाकण्याशिवाय पाण्याजवळ दुसरा कोणता पर्याय उरत नाही.
आपल्याला निसर्ग अनेक संकेत देत आहे, व्हेनिस मधील सध्याची परिस्थिती, किर्तीबस हा बेटांचा समूह असलेला देश सुद्धा बुडत आहे, याचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे
इंडोनेशिया या देशाला आपली जकार्ता ही राजधानी सोडून नव्या राजधानीचा शोध घ्यावा लागतोय, कारण जकार्ता पाण्याखाली बुडत चाललंय. सध्या जकार्ता शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेलाय आणि तेथील लोकांना नवीन परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. किनारपट्टीवरील लोकांना घरी लहान जहाज ठेवावी लागत आहे.
जर आपण वेळेवर ठोस पाऊलं नाही उचलली तर मुंबईच जकार्ता होण्यास काही वेळ लागणार नाही.