आपल्या संविधानातील भाग-१८ मधील कलम 352 ते कलम 360 हे आणीबाणीशी संबंधित आहेत. तर सर्वप्रथम आपणाला या आर्टिकल मधून काय माहिती मिळणार आहे?

  1. राष्ट्रपती राजवट म्हणजे नक्की काय?
  2. या परिस्तिथी मध्ये नेमकं कोणाचं राज्य असतं?
  3. राष्ट्रपती राजवट बद्दलचे फॅक्टस
  4. कोणकोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू होते?
  5. राष्ट्रपती राजवट किती काळ राहू शकते?
  6. महाराष्ट्रात आतापर्यंत कितीवेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट किंवा देशात आणीबाणी केंव्हा लागू होते? आणीबाणीचे किती प्रकार संविधानात नमूद केले आहेत? याबद्दल आपण माहिती घेणार आहोत

तर आणीबाणीचे तीन प्रकार आहेत

१) राष्ट्रीय आणीबाणी
२) राष्ट्रपती राजवट
३) वित्तीय आणीबाणी

येथे आपण राष्ट्रपती राजवट बद्दल अधिक माहिती बघणार आहोत. कोणकोणत्या कारणासाठी राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यात लागू शकते, ती कोणत्या कलमानुसार लागते ते आपण पाहू.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

राष्ट्रपती राजवट हा एक राजकीय आणीबाणीचा प्रकार आहे. ती राजकीय आणीबाणी नक्की काय, तर एखाद्या राज्यात जेंव्हा विधानसभेत कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होत नाही किंवा युतीतून स्थापन झालेलं सरकार पडलं, तसेच सर्वच पक्ष बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ असतील तर आशा वेळेला त्या राज्याचा कार्यभार राष्ट्रपतींना हातात घ्यावा लागतो त्यालाच राष्ट्रपती राजवट म्हणतात.
राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींना सूचना देतात की राज्य सरकार, सरकार चालवण्यास असमर्थ आहे त्यामुळे राज्याचा कार्यभार राष्ट्रपतींनी सांभाळावा, त्यानंतर राष्ट्रपती आपल्या अधिकाराचा वापर करून त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतात.

थोडक्यात सांगायचं झालं तर राष्ट्रपती राजवट म्हणजे राज्यात केंद्र सरकारचे राज्य होय. राज्याच्या प्रत्येक गरजेसाठी या कार्यकाळात फक्त संसदच कायदा करू शकते. राष्ट्रपती राजवटीलाच राज्य आणीबाणी असं सुद्धा संबोधलं जातं.

राष्ट्रपती राजवट बद्दल काही महत्वाचे फॅक्टस –

  1. राष्ट्रपती राजवट ही संविधानातील कलम 356 नुसार लागू करण्यात येते.
  2. हे कलम संविधानाच्या भाग-१८ मध्ये स्थित आहे.
  3. जर राष्ट्रपतींना असं लक्षात आलं की एखाद्या राज्यातील कारभार संवैधानिकरित्या पार पाडलं जात नाही आणि राज्य सरकार राज्य चालवण्यास असमर्थ आहे तेंव्हा देशाचे राष्ट्रपती राज्यपालांच्या सांगण्यावरून त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतात.
  4. राष्ट्रपती राजवट जेंव्हा लागू होते आशा वेळेस राज्याचा संवैधानिक प्रमुख हा राज्यपाल असतो.

कोणकोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू होते ?

  1. राज्याचं विधिमंडळ जेंव्हा राज्यपालांनी दिलेल्या वेळेत मुख्यमंत्री निवडू शकत नाही, आशा वेळेस राज्यात राष्ट्रपती राजवट लागते.
  2. जेंव्हा युती सरकार तुटतं आणि असलेल्या मुख्यमंत्र्यांचा पक्ष अल्पमतात जातं आणि बाकीचे पक्ष बहुमत सिद्ध करू शकत नसतील तर तेंव्हा सुद्धा राज्यात राष्ट्रपती राजवट लागते.
  3. राज्याच्या विधिमंडळात जेंव्हा अविश्वासाचा ठराव मांडण्यात येतो तेंव्हा जर सत्ताधारी पक्ष जर बहुमत सिद्ध करू शकला नाही तरी राष्ट्रपती राजवट लागू होते.
  4. जर राज्यातील निवडणुका युद्ध, नैसर्गिक आपत्ती या कारणामुळे नियमित वेळेवर न होता पुढे ढकलाव्या लागत असतील तर अशा वेळेस ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.
  5. सर्वात महत्वाचं म्हणजे जेंव्हा राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींना आपल्या रिपोर्ट मध्ये असं कळवतात की राज्य सरकार संवैधानिक नियमावर खरं उतरू शकत नाहीये आणि दोन्ही सभागृहानी त्याला संमती दिली तर सहा महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू होते.

राष्ट्रपती राजवट किती काळ राहू शकते?

  1. संसदेच्या दोन्ही सभागृहानी जर राज्यपालांच्या रिपोर्टला मान्यता दिली तर राष्ट्रपती राजवट सहा महिन्यासाठी लागू करण्यात येते.
  2. राष्ट्रपती राजवटिचा कार्यकाळ 1978 मध्ये झालेल्या 44व्या घटनादुरुस्ती अनुसार १ वर्षापर्यंतच वाढवता येऊ शकतो, परंतु कार्यकाळ वाढवण्यासाठी देशात अथवा संपूर्ण राज्यात किंवा राज्याच्या काही भागात एकतर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर असावी लागते किंवा निवडणूक आयोगाने राज्यात निवडणूका होऊ शकत नाहीत असे सांगितल्यावरच राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ पुढच्या सहा महिन्यांकरिता वाढवु शकतात.
  3. राष्ट्रपती राजवट लागू असताना जर लोकसभाच बरखास्त झाली तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसापर्यंतच ती राष्ट्रपती राजवट लागू असते.(अट- राज्यसभेने संमती दिली असेल तरच)

राष्ट्रपती राजवट केंव्हाही बरखास्त केलं जाऊ शकतं, त्यासाठी संसदेची परवानगी आवश्यक नसते. राष्ट्रपतींना वाटलं की राष्ट्रपती राजवट काढून घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे, तर ते सहज नोटिफिकेशन जारी करून राष्ट्रपती राजवट काढून घेऊ शकतात.

महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे?

महाराष्ट्रात आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.

१) 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जुन 1980 या कार्यकाळात तब्बल 112 दिवसांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.

२) 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 मध्ये एकूण 33 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.

पहिल्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री हे शरद पवार होते, त्यावेळी त्यांना बहुमत असताना सुद्धा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. दुसऱ्या वेळेस राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. यावेळेस काँग्रेस आपल्या इतर मित्र पक्षापासून दूर गेली होती त्यामुळे सरकार पडलं आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली.