दोन वर्षांनंतर भारत बांधतोय अफगाणिस्तानमध्ये अजून एक धरण. साधारणतः 2016 मध्ये भारताने अफगाणिस्तानात ‘सलमा धरण’ त्यालाच पुढे ‘अफगाण-भारत मैत्री धरण’ म्हटलं जाऊ लागलं, हे धरण बांधून अफगाणिस्तानला हे धरण गिफ्ट केलं गेलं. हे सलमा धरण पश्चिम अफगाणिस्तानच्या हेरात राज्यातील चिश्ती शरीफ जिल्ह्यात बांधलं होतं. याचा उपयोग हायड्रोइलेक्ट्रिसिटी आणि सिंचनाकरिता केला जात आहे. हे धरण हरी नदी वर बांधलं गेलं आहे, ही नदी 1100 किमी लांब वाहते आणि तुर्कमणिस्तानात प्रवेश करते आणि काराकुम वाळवंटात अदृश्य होते. या धरणाच्या बांधकामात पाकिस्तानने काही अडथळा आणला नव्हता, इराणने सुरुवातीला विरोध केला खरा परंतु भारताने कुटणीती वापरून इराणला शांत केले. या भागात भारताचा दबदबा कायम ठेवत भारताने हे धरण बांधून पूर्ण केले.

त्यानंतर पुढे भारताने परत एकदा आणखी एक धरण अफगाणिस्तानात बांधण्याचं निश्चित केल आहे. या धरणासाठी सरकारने $300 मिलियन लागू केले आहेत. या धरणाचं नाव ‘शहतुट धरण’ असेल आणि हे धरण काबुल नदीवर बांधलं जाईल. ही काबुल नदी 700 किमी लांब वाहते आणि ती हिंदुकुश पर्वत रांगेतील संगलख रांगेत उगम पावते. अफगाणिस्तानातुन ती पाकिस्तानात प्रवेश करते आणि पुढे जाऊन सिंधू नदीला मिळते. यामुळेच पाकिस्तान अस्वस्थ असून तो या धोरणावर टीका करतोय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात पाण्यासाठी कसलेही द्विपक्षीय करार झालेले नसून सध्या पाकिस्तानची स्थिती नाजूक आहे. पाकिस्तानातील बरेचशे शहर उदा. पेशावर, या काबुल नदी वर अवलंबून असून जर अफगाणिस्तानाने गरजे पेक्षा जास्त पाणी वापरले किंवा अडवून ठेवले तर ते पाकिस्तानला धोक्याचं आहे. पाकिस्तानला नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताने खेळलेली ही खेळी आहे असं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात द्विपक्षीय करार होईल का? भारत हे धरण बांधू शकेल का? या प्रश्नांची उत्तरासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.