चोर कधी कशाची आणि कशी चोरी करतील सांगता येत नाही! अट्टल चोरांचे धाडस पाहून तर फारच थक्क व्हायला होतं. यांना स्थळ काळ आणि कायदा कशाचाच धाक वाटत नाही. दिल्ली आपली राजधानी म्हंटल्यावर हे शहर कितीतरी मोठे असले तरी सुरक्षित असेल असे आपल्याला वाटते. कारण इथून तर देशाच्या कारभाराची सूत्रे हलवली जातात. पण, दिल्ली तितकीच असुरक्षित आहे हे कित्येकदा तिथल्या घृणास्पद घटनांनी आपल्याला दाखवून दिलंच आहे.
काय आहे संपूर्ण प्रकार?
किमान दिल्लीतील राष्ट्रपती भवन म्हणजे काही औरच तब्बल ३२० एकरात पसरलेल्या या इमारतीत देशांच्या राष्ट्रपतींच्या सरकारी निवासस्थानासह, काही महत्वाची सरकारी कार्यालये देखील आहेत. अगदी छोट्या छोट्या शहरातील मॉल्सपासून ते अती महत्वाच्या ठिकाणीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने किती दक्षता घेतली जाते ते आपण पाहतोच. मग राष्ट्रपती भवनाची सुरक्षा तर अधिक काटेकोर. कडक आणि चोख असायला हवी. पण, इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या शासकीय इमारतीमध्ये अत्यंत विचित्र, हास्यास्पद आणि दिल्लीतील सुरक्षा यंत्रणेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होतील असा प्रकार नुकताच घडला.
चोरी झालीच कशी?
आलिशान स्विफ्टकार मधून आलेल्या चार चोरांनी राष्ट्रपती भवन परिसरातून पाण्याच्या पाईप्स चोरून नेल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांच्या सर्व सुरक्षा यंत्रणेला चुना लावून चक्क इतक्या सुरक्षित आणि कडेकोट पहाऱ्यातील परिसरात येऊन चोरी करणाऱ्या या चोरांच्या हिमतीलाही दाद दिली पाहिजे. या राष्ट्रपती भवनाच्या परिसरात राष्ट्रपतींच्या सरकारी निवासासोबतच या कार्यालयांत काम करणाऱ्या सरकारी कर्मचार्यांचे देखील निवास आहेत. या परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु होते, या कामासाठी आणलेल्या मोठमोठ्या आणि महागड्या पाईप्स या चोरांनी कंटेनरमध्ये टाकून पळवून नेल्या.
याबाबत नवी दिल्ली जिल्हा पोलिसांच्या उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
“अनेक दिवसापासून या परिसरात पाईपलाईनचे काम सुरु होते. यासाठी राष्ट्रपती भवनच्या गेट क्रं. २३ आणि गट क्रं. २४ वर एकाच वेळी अनेक पाईप आणून ठेवण्यात आल्या होत्या. ज्या ठेकेदाराला या पाईपलाईनचे कंत्राट देण्यात आले होते, त्याचा लक्षात आले की, आणून ठेवलेल्या पाईप्स मधून सुमारे २२ ते २३ पाईप्स गायब आहेत.”
मग या कंत्राटदाराच्या सांगण्यावरून चाणक्यपुरी पोलीसस्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
चाणक्यपुरी पोलीसस्टेशनच्या पोलिसांना देखील राष्ट्रपती भवन परिसरातून चोरी झाल्याच्या तक्रारीने धक्का बसला. ही बातमी कोणत्याही प्रकारे बाहेर पडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने या प्रकारचा फारसा गाजावाजा करण्यात आला नाही. पण, पंतप्रधानांच्या सुरक्षा मार्गावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या चोरीची संपूर्ण घटना कैद झाली आहे. या कॅमेरा फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी चोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु केला.
चार चोर स्वतः एका स्विफ्ट कार मधून राष्ट्रपती भवनाच्या या परिसरात आले, जिथे पाईप्स ठेवण्यात आल्या होत्या. त्यांनी अगदी निर्धोकपणे, जराही न घाबरता, यातील काही पाईप कंटेनर मध्ये टाकल्या आणि स्वतः पुन्हा त्या स्विफ्ट कार मध्येच बसून निघून गेले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्याने किमान चोरांचा माग काढणे तरी पोलिसांना शक्य झाले. या फुटेजच्या आधाराने ज्या स्विफ्ट कारची माहिती मिळणे सोपे झाले. या माहितीवरून माग काढत पोलीस आजमगढ (युपी) चे रहिवासी असलेला अजय (३१) पर्यंत पोचले. अजयने दिलेल्या माहितीवरून पोलीस बिहारच्या मिथलेश (३८) पर्यंत पोचले. त्यानंतर उबेर कॅबवर चालक म्हणून काम करणाऱ्या राकेश तिवारी आणि दिल्लीचाच रहिवासी असलेल्या गुड्डू खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या चोरांनी आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली. या पाईप त्यांनी अमेठीत नेऊन विकल्याची देखील माहिती दिली. ज्यापद्धतीने त्यांनी सफाईदारपणे राष्ट्रपती भवन सारख्या अतिसुरक्षित परिसरातून चोरी केली त्यावरून त्यांच्या टोळीने अजूनही काही गुन्हे केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याबबत अधिक माहिती मिळवण्यासाठी या टोळीचा म्होरक्या असलेला अजयला पोलिसांनी पोलीस कोठडीत घेतले आहे. उरलेल्या तिघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
सध्या तरी दिल्ली पोलीस, सुरक्षा यंत्रणा यांच्या कर्तबगारीवरच या चोरांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. यांच्या सुरक्षेचा आणि जबाबदार वर्तणुकीचा दर्जा असाच असेल तर, सामान्य नागरिकाची स्थिती तर राम भरोसे आहे असेच म्हणावे लागेल.