आजच्या पिढीतील प्रत्येक तरुण-तरुणीला वाटते कि आपण फिट असावे, परंतु त्यांना नेमका हाच प्रश्न पडतो कि त्याची सुरवात कशी करावी, चला तर मग ह्या बाबत काही गोष्टी आज आपण जाणून घेऊयात.

आपणास व्यायामातून कोणते ध्येय साध्य करावयाचे आहे हे ठरवणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक ध्येयानुसार व्यायामाचे नियोजन व त्याचे वेगवेगळे प्रकार ठरतात. ही विविध ध्येये म्हणजे चरबी कमी करणे, शरीराची लवचीकता वाढवणे, दैनंदिन कामातील स्फूर्ती वाढवणे, शारीरिक ताण कमी करणे असो वा वजन वाढवणे असो. यापैकी ध्येय ठरवून व्यायामाचे नियोजन करणे हे खूप महत्वाचे आहे.

ध्येय ठरवताना आणखी एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाची आहे आणि ती म्हणजे आपले ध्येय हे वास्तव व तुमच्याकडून ते साध्य होण्याजोगे असावे. उदा:एक महिन्यात दोन किलो वजन कमी करणे, एक महिन्यात दहा किलो वजन कमी करणे. असे ध्येय यशस्वी ठरणे तर शक्य नाही परंतु त्यासाठीच्या प्रयत्नांमुळे तुमच्या शरीराला हानी पोहचू शकते. त्यांचे दुष्परिणाम हे दीर्घकाळाने संभवण्याची शक्यता असते.

काय करणे फायद्याचे ठरेल ? : व्यायामाच्या नियोजनात दीर्घ काळासाठी चिकाटीने व्यायाम करणे हे महत्वाचे असते. तो टिकवून ठेवणे हि तितकेच महत्वाचे आहे. जर तुम्ही व्यायामशाळेत अथवा जिममध्ये व्यायामासाठी जात असाल तर तेथील सुविधा तुमच्यासाठी सर्वथा योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. तसे नसेल तर घरी व्यायाम करता येईल का?, त्यासाठी आपल्याकडे तशी साधने आहेत का?, सदर साधने आपणास हाताळण्याचे ज्ञान आहे का? किंवा मित्रगट वा ज्या जोडीदारांसोबत व्यायाम करणार आहात, त्यांचे ध्येय तुमच्या ध्येयाशी जुळते आहे का या सर्व गोष्टीची खात्री करून घ्यावी. पर्सनल ट्रेनरसह व्यायामाचे नियोजन करावयाचे असल्यास आपण पर्सनल ट्रेनर नेमावा.

पर्सनल ट्रेनर निवडताना कशी काळजी घ्याल? : तुमच्या ट्रेनरने  स्वतः योग्य व संपूर्ण प्रशिक्षण घेतले आहे काय?, ट्रेनरला आहारोपचार (न्यूट्रिशियन) व व्यायामाचे संपूर्ण ज्ञान आहे काय इत्यादींची खात्री करणे गरजेचे आहे. योग्य माहिती व ज्ञान असणारा ट्रेनर तुमचे ध्येय, आवडी व गरजांनुसार तुमच्या व्यायामाचे नियोजन करू शकतो. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व तुमच्या व्यायामाबाबत योग्य सल्ला तुम्हाला तो देऊ शकतो. त्याच्याकडून व्यायामाची विविध कौशल्ये ज्ञात होतील व तुम्हाला व्यायामाबद्दल प्रेरणा देत तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हास तो मदत करेल.

वेळेचे नियोजन कसे कराल: अनेकांचा असा गैरसमज आहे की, व्यायाम हा विशिष्ट वेळी व विशिष्ट ठिकाणीच केला जाणे महत्वाचे आहे. त्यामुळेच बरेच व्यक्ती आपल्या व्यायामाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करीत नाहीत. परंतु असे नसून व्यायाम हा कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी केला जाऊ शकतो. गरज आहे ती फक्त तुमच्या सोईनुसार वेळ काढण्याची. पहाटेचा व्यायाम हा तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करतो, ज्यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहून स्फूर्तीने आपली कामे करू शकाल. संध्याकाळच्या व्यायामाने दिवसभरचा शीण घालवण्यास मदत होते. व्यायामासाठी एक विशिष्ट वेळ ठरवल्यानंतर त्या वेळी नियमितपणे व्यायाम करणे व ती वेळ दररोज पाळणे आवश्यक ठरते. ही वेळ तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा महत्त्वाचा भाग ठरवून इतर महत्त्वाच्या कार्याप्रमाणेच पूर्ण करायचेच असे मनाशी ठाम करावे.

व्यायामासाठी वेळ काढणे अशक्य आहे, असे वाटत असले तरी व्यायामासाठी वेळ काढणे सोपे आहे. सलग वेळ काढणे बऱ्याचदा शक्य नसले तरी विविध कामांमधील फावल्या वेळात हलका व्यायाम करणे, लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करणे इ. गोष्टींमधून आपण व्यायामासाठी वेळ काढू शकाल. एकाच वेळी एक तासभर व्यायाम केल्याने व्यायाम होतो, असे नाही तर दहा-दहा मिनिटांचा व्यायाम दिवसातून चार-पाच वेळा केल्यानेही तेवढेच फायदे आपणास मिळतात जेवढे सलग एक तास व्यायाम केल्याने मिळतात.

व्यायाम हा उत्तम जीवनासाठी गरजेचा आहे त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानेच व्यायाम केला पाहिजे व इतरांनाही सल्ला द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here