आज दिनांक 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी सात वाजता भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापली. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे दोघे महाराष्ट्राचे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले.

काल रात्री 12 वाजेपर्यंत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची बैठक सुरू होती. या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीने शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार यावर एकमत दाखवले होते परंतु शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार यावर अजून एकमत झाले नव्हते.

तसेच हे तीन पक्षाचं सरकार किती काळ टिकेल याची शाश्वतता नव्हती. कारण, हे तिन्ही पक्षांची वैचारिक भिन्नता आहे. शिवसेनेचा हिंदुत्ववादी बाणा आहे तर काँग्रेस अगदी त्याच्या विरुद्ध. परंतु तरी देखील शिवसेनेने काँग्रेस सोबत मनमिळवणी करण्यासाठी आपल्या विचारांची तिलांजली दिली. काँग्रेस सोबत Common Minimum Programme त्यांनी काढला आणि आपल्या संपूर्ण वाटचालीतील विचार बाजूला सारले.

मुख्यमंत्री पदासाठी एवढा हव्यास हा शिवसेनेला शोभणारा नव्हता

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आजची शिवसेना यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सत्तेला लाथ मारणारी ही शिवसेना आहे, सत्तेसाठी कधी शिवसेना झुकली नाही. परंतु मागच्या एक महिन्यात कित्तेक वेळा शिवसेना नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाताना दिसले.

ज्या राज्यातील जनतेनी भाजप-शिवसेना व इतर मित्रपक्षांना क्लिअर मॅनडेट दिला होता,

संपूर्ण बहुमत महायुतीला दिलं होतं आणि तरी शिवसेनेने भाजप सोबत सरकार स्थापण्यास नकार दिला आणि भाजपला मुख्यमंत्री पदासाठी कात्रीत धरण्याचा प्रयत्न केला. महायुतीत सर्वात जास्त 105 सीट्स भाजपच्या आहेत आणि शिवसेनेला 56 सीट्स आहेत, त्यामुळे ज्या पक्षाचे जेवढे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, हा नियम, ही परंपरा शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंनी आणि भाजपच्या नेत्यांनी घालून दिली होती. तरी देखील आज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आपलाच मुख्यमंत्री हा हट्ट सोडला नाही.

याचाच परिणाम आज त्यांना पाहायला मिळतोय. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच अतिवृष्टीमुळे खूप मोठे नुकसान झाले आहे, आशा परिस्थितीत महाराष्ट्राला स्थिर सरकारची आवश्यकता होती. परंतु शिवसेनेने सरकार स्थापण्यास नकार दिल्यामुळे भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापन करावे लागले.

जनतेच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच म्हणणं आहे.

तिकडे काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सत्ता स्थापण्याचे प्रयत्न चालू होते. परंतु काल रात्रीपर्यंत सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला बनत नव्हता, अनेक विषयांवर एकमत होत नव्हते त्यामुळेच अजितदादा पवार हे, ‘शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकत नाही.’ या निष्कर्षावर येऊन पोहचले आणि त्यामुळेच त्यांनी भाजपसोबत येऊन महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न केला.

अनेक मतभेद असताना हे तिन्ही पक्ष महाराष्ट्र सरकार चालवू शकत नाहीत, याच कारणामुळे भाजप सोबत जाण्याचा निर्णय अजितदादानी केला असावा.

परंतु भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन सरकार स्थापणार याची शरद पवार यांना सुद्धा कल्पना नसल्याचं स्पष्ट होतंय. शरद पवारांनी खालील ट्विट करून स्पष्ट केलंय की अजितदादा पवार यांनी याबाबत शरद पवार यांच्या सोबत कसलीही चर्चा केली नाही.

परंतु आज पर्यंतचा इतिहास सांगतो की शरद पवार दाखवतात एक आणि करतात एक, याचा अनुभव जवळपास सर्वच राजकीय पक्षांना असेल. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली होती. अंदाज असा वर्तवला जात आहे की याच बैठकीत सर्व काही ठरलं आहे आणि त्याप्रमाणेच हे सर्व सुरू आहे.

निडणुकीचे निकाल लागून एक महिना उलटला आणि तरी महाराष्ट्रात सरकार स्थापली गेली नाही, ही महाराष्ट्रासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट होती. तसेच महाराष्ट्राच्या जनतेला तातडीने एका स्थिर सरकारची गरज होती. म्हणूनच आज दोन वेगळ्या विचारांचे पक्ष राजकिय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी, त्यांच्या भल्यासाठी एकत्र आले आहेत.

शरद पवार यांचा पाठिंबा नसताना अजितदादा पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यात काही मतभेद आहेत का? तसेच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट निर्माण झालेत का? याकडे आता आपल्याला हे पाहावे लागेल.

सकाळी सुप्रियाताई सुळे यांनी व्हाट्सअप्प स्टेटस वर ‘Party and family split’ हा मेसेज टाकला होता. या निर्णयाचा परिवारांतर्गत काही पडसाद उटलेत का? सुप्रियाताई सुळेनी असा स्टेटस का ठेवला असावा? याकडे आपल्याला पाहावं लागेल. परंतु अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय हा ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते पदी असताना घेतलेला निर्णय आहे. आतापर्यंत विधिमंडळ गटनेत्याचा निर्णय हा संपूर्ण पक्षाचा निर्णय मानला जातो आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय आता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानेल का? की येथेही अजितदादा समर्थकांचा गट तयार होईल? आशा सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच आपल्याला देईल.