राज्यात महाविकास आघाडीचे सरकार दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पासून सत्तेत आले आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून मुंबईतील शिवाजी पार्क येथे शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला सावळा गोंधळ अखेर संपला असून एक आशावादी असं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आहे.
महाविकास आघाडी हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून तयार केलेली आघाडी आहे. राज्याच्या विकासाकरिता हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. महा विकास आघाडी करताना या तीनही पक्षांचे किमान समान कार्यक्रमावर एकमत झाले आहे. या किमान समान कार्यक्रमानुसार राज्यातील सामान्य जनतेला १० रुपयात जेवण आणि ‘एक रुपयात क्लिनिक’ या योजनेअंतर्गत सर्व वैद्यकीय तपासण्या एका रुपयात अशा या दोन्ही योजना तालुका स्तरावर सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
किमान समान कार्यक्रमानुसार महाविकास आघाडीने राज्यातील जनतेला स्वस्त आणि पुरेसे जेवण दहा रुपयात देण्याची घोषणा केली आहे. हे जेवण देताना अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या नियमांचा भंग होणार नाही , याबाबत महाविकास आघाडीने खात्री दिली आहे. जर या १० रुपयांच्या जेवणात काही चुकीचे आढळल्यास त्या ठिकाणी असणाऱ्या प्रमुख व्यक्ती शिक्षेस पात्र असतील, असेही महा विकास आघाडी ने स्पष्ट केले आहे.
याशिवाय सर्व नागरिकांना चांगले आणि परवडणाऱ्या दरात आरोग्यविषयक चाचण्या करण्यासाठी ‘एक रुपयात सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याचेही किमान समान कार्यक्रमात म्हंटले आहे. तालुका स्तरावर अशा प्रकारचे एक रुपया क्लिनिक लवकरच सुरु होतील, अशी माहिती किमान समान कार्यक्रमात देण्यात आलेली आहे.
- प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि मेडिकल कॉलेजेस नव्याने सुरु करण्यात येतील आणि यासोबतच आम्ही प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा काढून देणार आहोत, ज्यामुळे भविष्यात नागरिकांना या विम्यामुळे मोफत औषधोपचार करता येतील, अशी माहितीही किमान समान कार्यक्रमात दिलेली आहे.
- बेरोजगारीच्या मुद्द्यावर किमान समान कार्यक्रमात विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. राज्यात रिक्त असलेल्या सर्व सरकारी जागा तात्काळ भरती कार्यक्रमाद्वारे भरण्यात येणार असल्याची माहिती किमान समान कार्यक्रमात देण्यात आलेली आहे.
- याशिवाय बेरोजगार सुशिक्षित तरुणाला फेलोशिप म्हणून काही रक्कम देण्यात येणार असून स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा सुद्धा किमान समान कार्यक्रमात करण्यात आलेली आहे.
महिला सुरक्षेचा मुद्दा हा महाविकास आघाडी करीत अत्यंत महत्वाचा आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलींना मोफत शिक्षण देण्यात येईल. काम करणाऱ्या महिलांसाठी शहर व जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी वसतिगृह तयार करण्यात येतील. आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्या यांचे मानधन वाढवले जाईल व त्यांना चांगल्या सोयी सुविधा पुरवल्या जातील. महिला सबलीकरणावर भर देताना महिला बचत गटांना आणखी बळ देण्यात येईल, अशी माहिती किमान समान कार्यक्रमात देण्यात आलेली आहे.
शिक्षण क्षेत्राला उभारी देण्यासाठी राज्यात विविध पातळ्यांवर शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मुलांना आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांना शून्य टक्के व्याज दराने शैक्षणिक कर्ज मिळेल, अशी माहिती सुद्धा किमान समान कार्यक्रमात देण्यात आलेली आहे. शहरी विकासावर किमान समान कार्यक्रमात विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. शहरी भागांमधील रस्त्यांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर नवीन योजना सुरु करण्याचा मानस असल्याचे किमान समान कार्यक्रमात सांगण्यात आले आहे.
नगर पंचायती, नगर परिषदा आणि महानगर पालिका यामधील रस्त्यांची सुधारणा व्हावी याकरिता विशेष निधीची तरतूद केली जाईल, अशी माहिती किमान समान कार्यक्रमात देण्यात आलेली आहे.
एकुणातच राज्यासमोर असणाऱ्या सर्वच महत्वाच्या प्रश्नांचा समावेश महाविकास आघाडीने त्यांच्या किमान समान कार्यक्रमात केला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे या किमान समान कार्यक्रमावर एकमत झालेले असल्यामुळे आता जनतेचे या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी कडे लक्ष लागून राहिलेले आहे.