राज्य सरकारने निर्भया निधीतील एक पैसाही खर्च केला नसल्याची माहिती समोर आली आहे.!

गेल्या आठवड्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचे महा विकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. मुख्यमंत्री पदी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे विराजमान झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची पुन्हा पडताळणी करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर काही तास होताच उद्धव ठाकरे यांनी निवडणुकी पूर्वी जनतेला दिलेला शब्द पाळला आहे. आरे येथे होणाऱ्या कारशेड वर तातडीने बंदी आणण्याचा आणि आरे येथील आंदोलकांवर झालेल्या केसेस मागे घेण्याचा महत्वपूर्ण असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला.

यादरम्यान फडणवीस सरकारच्या काळात झालेले काही ‘कारनामे’ सर्वांच्या समोर येत आहेत. कर्नाटक मधील भाजपचे नेते अनंत कुमार हेगडे यांनी केलेला गौफ्यस्फोट सगळ्यांना आश्चर्य चकित करणारा असाच होता. केंद्र सरकार कडे ४० हजार कोटी रुपयांचा निधी परत पाठविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती असा अनंत कुमार हेगडे यांचा दावा आहे.

हा धक्का पचवतानाच महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात राज्य सरकारे निर्भया निधी मधील एकही पैसा खर्च केला नाही. हैद्राबाद मध्ये नुकतेच एक निर्भया प्रकरण घडल्यानांतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळलेली असताना महाराष्ट्र राज्यातील मुली किती सुरक्षित आहेत, याबाबत या माहितीवरून प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे.

केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात पाठवलेला निर्भया निधी महाराष्ट्र सरकारने खर्च केला नसल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणावरुन आता पुढचे काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण तापलेले पाहायला मिळणार आहे. हैदराबादमध्ये डॉक्टरचा तरुणीचा बलात्कार आणि खून झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राज्यातही महिला आणि मुलींवरील अत्याचारांचे प्रकार कमी होताना दिसत नाहीत. ही वाढती प्रकरणे पाहता मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारच्या निर्भया योजने अंतर्गत महाराष्ट्राला १४ हजार ९४० कोटी निधी पाठवण्यात आला होता. त्यापैकी एकही पैसा खर्च न झाल्याचे वास्तव समोर आले आहे.

असे असताना दुसरीकडे दिल्ली, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश मध्ये सर्वाधिक निधी खर्च झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  दिल्लीत १९४१ कोटी, कर्नाटकात १३६२ कोटी, राजस्थानमध्ये १०११ कोटी, आंध्र प्रदेशमध्ये ८१४ कोटी इतका खर्च केंद्र सरकारच्या निधीतून करण्यात आला. पण महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्षांसाठी ही मोठी चपराक असणार आहे.

अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या वक्त्यव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वासमोर आली आहे. हेगडे यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे फडणवीस यांचे म्हणणे आहे. परंतु निर्भया निधी बाबत आता फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण निर्भया निधी खर्च न केल्याचे पुरावे आहेत. याशिवाय हा निधी केंद्राकडे परत गेल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे. यावरून हेगडे यांनी दिलेली माहिती सुद्धा खरी असल्याची शक्यता वाटते आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र या विषयी फडणवीस यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि सध्या महाराष्ट्रातील तरुणींमध्ये जी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याला फडणवीस सरकारच्या काळात निर्भया निधी खर्च न झाल्याने आणखीन खतपाणी मिळाल्या सारखे झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक चांगला मुद्दा मिळाला असून विरोधी पक्षनेते पदी निवड झालेले देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील अडचणी या सगळ्यांमुळे वाढणार असल्याचे दिसते आहे. आता पाहुयात आणखी कोणकोणते धक्के महाराष्ट्रातील जनतेला सहन करायचे आहेत ते. याशिवाय फडणवीस सरकारच्या काळात निर्भया निधी का खर्च केला नाही याबाबत महा विकास आघाडी कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाला टार्गेट करणार याची सर्वांमध्ये उत्सुकता आहे. कारण फडणवीस सरकार सोबत त्यावेळी शिवसेना सुद्धा सत्तेत सहभागी होते. त्यामुळे याबात शिवसेनेची एकूणच भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.