अगदी अनपेक्षितरित्या आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन झाल्याचे जाहीर केले. गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात चाललेल्या नाट्यमय घडामोडींचा असा शेवट होईल हे कुणाच्याही ध्यानी मनी नव्हते. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची अनेक समीकरणे तपासली गेली, कित्येक अंदाज बांधण्यात आले होते. महिनाभर बैठका, चर्चा आणि पत्रकार परिषदांचे सत्र अविरत सुरूच होते. त्यातून शेवटी महाविकास आघाडीचे सरकार येणार असे सुनिश्चित झाले असतानाच सर्व अंदाज खोटे ठरवत राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पाडून अजित पवार भाजप सोबत आले आणि राष्ट्रपती राजवट संपून एकदाचे सरकार स्थापन झाले!
पण या सर्व घडामोडी होत असताना सामान्य मतदारांच्या मनात आपण फसवलो गेल्याची भावना होती. पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक समाज माध्यमातून एकमेकांची खिल्ली उडवत होते. आरोप प्रत्यारोप चिखलफेक सुरूच होती. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकांचे निकाल लागल्यापासून ते आजपर्यंत काय काय घडामोडी झाल्या ते आम्ही वाचकांसमोर मांडत आहोत.
हे बघ भाऊ…
निवडणूक निकालापासून सत्तास्थापनेपर्यंत घडलेल्या घटनांचा हा आढावा…
दिनांक 23 ऑक्टोबर 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर. एकूण 288 पैकी भाजप 105 जागांवर विजयी. शिवसेना 56, काँग्रेस 44 तर राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांवर विजयी. 29 जागांवर इतरांचा विजय. अश्या पद्धतीने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला. यात भाजप-सेना युतीला एकत्रित 159 जागा मिळाल्या तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वाट्याला 98 जागा मिळाल्या. सत्तास्थापनेसाठी युतीने दावा करणे अपेक्षित होते.
24 ऑक्टोबर 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीतर्फे महाराष्ट्रातील जनतेचे जाहीर आभार मानले आणि लवकरच सत्ता स्थापन करू असे आश्वासन दिले. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही आभार मानले. त्याच दिवशी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आम्ही जनमताचा आदर करून पराभव मान्य करतो अशी ग्वाही दिली.
25 ऑक्टोबर 2019
शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी युती जिंकली, महाराष्ट्र जिंकला असे विधान केले. त्याच वेळी भाजपची अब की बार 220 पार ही घोषणा पूर्ण न झाल्याने भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता होती. त्यात छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा होऊ शकतो असे जाहीर विधान करून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले.
26 ऑक्टोबर 2019
भाजप आणि सेना हे दोन्ही पक्ष एकमेकांवर अवलंबून असल्याने युती तुटणार नाही आणि सतत स्थापन होण्यात काही अडचण येणार नाही असे रावसाहेब दानवे म्हणाले.
30 ऑक्टोबर 2019
भाजप 16 खाती ठेवत सेनेला 13 मंत्रीपदे देणार तसेच उपमुख्यमंत्री शिवसेनेचा असणार असे भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. त्यावर सेनेने विरोध दर्शविला आणि मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्याची मागणी केली.
1 नोव्हेंबर 2019
राज्यात युतीचे सरकार येणार असे गृहीत असताना अचानक सेना आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या चर्चेच्या बातम्या आल्या. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सेना राष्ट्रवादी एकत्र येऊन खलबते करू लागले. यामुळे युतीचे सरकार येण्याची शक्यता धूसर झाली.
2 नोव्हेंबर 2019
एकीकडे सेना राष्ट्रवादी यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे भाजपने मात्र वेट अँड वोच धोरण स्वीकारले. भाजपने जो खातेवाटपाचा आणि पदवाटपाचा प्रस्ताव सेनेला दिला होता त्याला सेनेकडून काहीही उत्तर आले नाही.
3 नोव्हेंबर 2019
या सर्व घडामोडींवर अजित पवार पत्रकारपरिषद घेत असताना अचानक त्यांना सेना नेते संजय राऊत यांचा मेसेज आला. इथून संजय राऊत यांनी या सत्तास्थापनेच्या खेळात एंट्री घेतली.
4 नोव्हेंबर 2019
संजय राऊत यांनी मिडियासमोर येऊन भाजपने दिलेल्या प्रस्तावाबाबत उघड नाराजी व्यक्त केली. तसेच भाजप समोर काही प्रस्ताव मांडले. या प्रस्तावांवर सहमती असेल तरच चर्चा करू अशी भूमिका घेतली.
5 नोव्हेंबर 2019
या सगळ्या सत्ताकारणात काँग्रेस पक्षानेही उडी घेतली. 8 नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते या कारणामुळे सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे एकत्रित सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, या निर्णयाला सोनिया गांधी यांचा विरोध असल्याची बातमीही पाठोपाठ आली.
6 नोव्हेंबर 2019
भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी आणि काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अहमद पटेल या दोन दिग्गजांची दिल्लीत भेट झाली. या भेटीत नेमके काय बोलणे झाले याबाबत मात्र संदिग्धता कायम राहिली. त्याचवेळी शरद पवार यांनी जनतेचा कौल युतीला आहे आणि त्यांनीच सरकार स्थापन करावं असे विधान करून सस्पेन्स आणखी वाढवला. मात्र याच दिवशी पवार-राऊत आणि फडणवीस-मोहन भागवत या महत्त्वाच्या भेटीही झाल्या.
7 नोव्हेंबर 2019
कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार नाही असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच भाजप एकट्याने सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असेही सांगितले गेले. इकडे उद्धव ठाकरे मात्र सेनेला मुख्यमंत्रीपद हवेच यावर ठाम राहिले. जर भाजपने यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे ते म्हणाले.
8 नोव्हेंबर 2019
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला.
9 व 10 नोव्हेंबर 2019
राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले. मात्र भाजपने ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत हे कारण देऊन नाकारले.
11 नोव्हेंबर 2019
भाजपनंतर शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले. सेनेने ते स्वीकारले. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या समर्थनाचे पत्र सादर करू न शकल्यामुळे त्यांनाही सत्तेवर दावा करता आला नाही. आतापर्यंत सत्ता स्थापनेच्या खेळात महत्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत छातीत दुखत असल्याच्या कारणावरून लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. याच दिवशी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपला राजीनामा सादर करून एनडीए मधून बाहेर पडण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले.
12 नोव्हेंबर 2019
दिलेल्या मुदतीमध्ये कुठलाही पक्ष सत्ता स्थापन करू न शकल्याने अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली!
बारा नोव्हेंबर पासून भाजपने या सगळ्या घडामोडीमध्ये कुठेही सहभाग घेतला नाही. एकीकडे सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात एकामागोमाग एक बैठका होत होत्या. त्यांच्या नेत्यांनी रोज पत्रकारपरिषद घेण्याचा सपाटा लावला होता. या तीन पक्षांच्या एकत्र येण्याला ‘महाविकासआघाडी‘ असं अधिकृत नाव देण्यात आले होते.
तसेच पाच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच अडीच वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असे ठरत होते. हे सर्व सुरू असताना मात्र भाजपचे नेते मिडियासमोर येणे टाळत होते. परंतु आज या घटनाक्रमाचा नाट्यमय शेवट बघायला मिळाला.
23 नोव्हेंबर 2019
निकाल लागल्यानंतर बरोबर एक महिन्याने सर्व शक्यतांना धक्का देत अजित पवार यांच्या समर्थनाने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली!
बघितलं ना भाऊ, हे असं असतं राजकारण! इथे केव्हा काय होईल ते सांगता येत नाही. आता स्थापन झालेले सरकार बहुमत सिद्ध करते का आणि पाच वर्षे स्थिर शासन देते का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे…
तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की लिहा.