मराठवाडा, विदर्भावर कृपा; पुढील काही दिवस हलक्या सरी

आजपर्यंत बरसलेल्या नेर्ऋत्य मोसमी पावसाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर कृपा केली असली, तरी मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदविला गेला आहे.

दरम्यान, सध्या पोषक स्थिती नसल्याने राज्यात जोरदार पावसात काहीसा खंड निर्माण झाला आहे. मात्र, पूर्ण विश्रांती घेतली असताना मागील दोन- तीन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याचे समाधान आहे. पुढील काही दिवसही हलक्या पावसावरच समाधान मानावे लागणार आहे.

मोसमी पावसाला सुरुवात होऊन सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. १ जून ते ५ ऑगस्ट या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भात पावसाची पीछेहाट झाली असल्याचे हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मराठवाडय़ात सरासरीपेक्षा तब्बल १५ टक्के पाऊस कमी झाला असून, विदर्भात सरासरीपेक्षा एक टक्क्य़ाने पाऊस कमी आहे. कोकणात मात्र वरुणराजाने नेहमीप्रमाणे कृपा केली आहे. कोकणात सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी दोन महिन्यांच्या कालावधीत चांगला पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा चार टक्क्य़ांनी अधिक आहे. संपूर्ण राज्याचा विचार केल्यास या कालावधीत पाच टक्के अधिक पाऊस बरसला आहे.

दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा अद्यापही कार्यरत नाही. त्यामुळे राज्यात कुठेही जोरदार पावसाची नोंद झालेली नाही. मात्र, गुजरातचा समुद्रकिनारा त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. या स्थितीमुळे राज्यात हलका पाऊस पडत आहे. उत्तरेकडील कमी दाबाचा पट्टा राज्याच्या दक्षिणेकडे सरकल्यासही पावसाचा जोर वाढेल. मागील चोवीस तासांत राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला असला, तरी पुढील काही दिवस बहुतांशी भागाला हलक्या सरींवरच समाधानी राहावे लागणार आहे.

मागील चोवीस तासांत राज्यातील प्रमुख ठिकाणी पडलेला पाऊस (मि. मी.) पुढीलप्रमाणे कोकणातील वैभववाडी ८०, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर- देवरुख ५०, कणकवली, कर्जत ४०, बेलापूर (ठाणे), चिपळूण, गुहागर, पनवेल, पेण, सावंतवाडी, उरण ३०. मध्य महाराष्ट्रातील सुरगणा १५०, राधानगरी ८०, गगनबावडा, महाबळेश्वर, पेठ ६०, लोणावळा (कृषी) ५०, कळवण, शाहूवाडी ४०. मराठवाडय़ातील अहमदपूर २०, हिमायतनगर, सेलू १०. विदर्भातील मेहकर १०.

कोकण, घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस

मागील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. पुढील ४८ तासांत कोकण, घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.