गोकुळष्टमीच्या दिवशी दहीहंडीच्या उत्सवात, भाजपचे आमदार राम कदम यांनी उत्साहाच्या भरात महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, यांच्यावर भाजपा प्रदेश कार्यालयाकडून येत्या दोन दिवसांत कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या शिस्तभंग समितीकडून सुरूवातीला कदम यांना त्यांचे म्हणने मांडण्यासाठी नोटीस देण्यात येईल. त्या नोटीशीच्या खुलाशाने समाधान न झाल्यास कदम यांना स्वतः त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात येईल. तरीही समितीचे समाधान झाले नाही आणि त्यांचे वक्तव्य गंभीर स्वरूपाचे असल्याचे समितीच्या लक्षात आल्यास कदम यांच्यावर निलंबनाची अथवा पक्षातून काढून टाकण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. असे एका भाजपाच्या जेष्ठ नेत्याकडूनच शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातचबरोबर राम कदम यांनी या विषयावर माफी मागितल्याचा हि विडिओ आज समोर आला आहे.

त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर विधानसभेचे आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान आज इंदापूर येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राम कदम यांच्यावर टीकास्त्र झोडले. ते म्हणाले की, राम कदम यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्येंत विधानसभेचे कामकाज न चालू देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.