आरक्षणाबाबत निर्णय होईल, लोकांनी तोडफोड-जाळपोळ करू नका, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे. तसेच सरकारने कागदी घोडे नाचवणे थांबवावे अन्यथा आंदोलक कायदा हातात घेतील. त्वरीत तोडगा काढा, नाहीतर उद्रक होईल, असा म्हणत मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, असा इशाराही दिला. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज पुण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील १०० हून अधिक समन्वयकाच्या उपस्थितीत मराठा आरक्षण परिषद झाली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. समन्वयकांनी केलेल्या सूचनांचे निवदेन मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले, सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत अनेक बळी गेले आहेत. मुलभूत अधिकारांसाठी भिकाऱ्यासारखे फिरण्याची वेळ आली आहे. वेळीच आरक्षण दिले असते तर आयोगाची गरज भासली नसती. आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्याने आरक्षणाचा प्रश्न चिघळला असून, सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत आरक्षणासाठी बळी गेले, असा आरोप उदयनराजेंनी केला.

कायद्याचे कारण पुढे करत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवू नका. ८२ टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती पाहिली पाहिजे. मराठा समाजात मागासांची संख्या जास्त आहे. मागील ३० वर्षांपासून आरक्षणावर फक्त चर्चाच सुरू आहे. संपूर्ण एक पिढी ऐन उमेदीच्या काळात वंचित राहिली आणि संपूर्ण दिशाहीन झाली.

महाराजांचे नाव घेणाऱ्यांनो त्यांचे विचारही अमलात आना.आत्महत्या थांबवा, आरक्षण लवकर द्या.सर्व राज्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती, आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल, असे म्हणताना उदयनराजे पुढे म्हणाले, “आरक्षणावरुन सरकारची संगीत खुर्ची कधी थांबणार? मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही, ते एकदाचं सरकारने स्पष्ट सांगून टाकावं. आरक्षणासाठी सरकारने कागदी घोडे नाचवू नये. मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका. मराठा आरक्षणावर मार्ग काढा, अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here