पूर्वीच्या काळी वडीलधारी माणसे म्हणत असत की, चांगला शिकला अन पदवीधर झाला तरच चांगली नोकरी मिळेल. नाहीतर हॉटेलात कपबश्या विसळाव्या लागतील किंवा रस्त्यावर झाडू मारावा लागेल.
तेव्हाच्या काळात हे खरेही होते कारण पूर्वी एकदाचा पदवीधर झाला की याला नक्की चांगली नोकरी मिळणार असे समजले जाई. परंतु आता चांगले शिक्षण घेवूनही बेरोजगारी इतकी वाढली आहे की नोकरी मिळणेच कठीण झालेय, त्यातल्या त्यात एखाद्याला सरकारी नोकरी मिळणे म्हणजे लॉटरी लागण्यासारखे असते इतकी बिकट अवस्था झाली आहे. या सगळ्याला जबाबदार कोणालाच ठरवता येणार नाही कारण वाढत्या लोकसंख्येचाच हा अजून एक दुष्परिणाम समजायला हरकत नाही.
काय आहे संपूर्ण प्रकार?
पण आज एक धक्कादायक बातमी आम्ही सांगणार आहोत त्यावरून बेरोजगारीचा प्रश्न किती भयानक बनला आहे याची तुम्हाला कल्पना येऊ शकेल… कोइंबतूर महापालिकेच्या ७४९ सफाई कामगार पदासाठी महापालिकेने जाहिरात दिली आणि चक्क ७ हजार अभियंत्यांनी त्या नौकरीसाठी अर्ज केले आहेत!
या अर्ज केलेल्या अभियंत्यांपैकी काही जण सध्या खाजगी नोकरी करत आहेत परंतु सफाई कामगार पदाच्या सरकारी नोकरीत जास्त पगार आहे म्हणजे सुरवातीलाच १५,७०० रु. मिळणार आहेत म्हणून ही धडपड सुरुय. म्हणूनच एकूण ७ हजार पदवी आणी पदविका धारक अभियंत्यांनी ५४९ सफाई कामगारांच्या भरतीसाठी अर्ज केल्याची बाब समोर आली आहे.
महापालिकेने सफाई कामगारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले असता, मुलाखत व प्रमाणपत्रे पडताळणी दरम्यान तीन दिवस झालेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी ही गोष्ट लक्षात आल्याचे संबंधित अधिकार्यानी संगितले आहे. प्रमाणपत्रे पडताळणी करताना ७० टक्के लोकांनी किमान पात्रतेची अट पूर्ण केली असून त्यापैकी बहुतेक जण हे पदविका व पदवीधारक अभियंते आहेत, तर काही जण विविध शाखेचे पदवीधर अथवा द्विपदवीधारक आहेत असे अधिकार्यांचे म्हणणे आहे.
या पैकी काही जण सध्या खाजगी नोकरी करत असून त्यांना तेथे पगार कमी आहे व सफाई कामगाराच्या या सरकारी नोकरीत सुरवातच जास्त पगाराने म्हणजे रु. १५,७०० ने होणार आहे म्हणून आपण अर्ज केल्याचे त्या अर्जदारांनी सांगितले.
सध्या करार तत्वावर सफाई कामगार म्हणून कार्यरत असणार्या लोकांनी देखील या कायम असणार्या नोकरीसाठी अर्ज केल्याचे समजते .
अर्ज केलेल्या अनेक पदवीधारकांना शिक्षणाच्या पात्रतेनुसार नोकरी मिळत नाही व घरखर्च चालवण्यासाठी मिळेल ती खाजगी नोकरी करावी लागते ज्यात जेमतेम ६ ते ७ हजार रुपये पगार मिळतो व सुमारे १२ तास भरपूर श्रम करावे लागतात असे आढळले आहे. तर दुसरीकडे सफाई कामगाराच्या नोकरीत एकूण सुमारे २० हजार रुपये इतका भरघोस पगार मिळतो व काम देखील त्यामानाने कमी असते. सकाळी तीन तास व संध्याकाळी तीन तास इतकेच काम असते मधल्या काळात त्यांना त्यांची इतर किरकोळ कामे देखील करता येतात म्हणून या नोकरीला त्यांनी पसंती दिल्याचे समजते. सध्या या महापालिकेत २ हजार कायमस्वरूपी व ५०० करार तत्वावर असणारे कामगार काम करत आहेत.
टेबलवर्कच मिळायला हवे, चकाचक ऑफिस हवे, भरपूर पगार हवा अशी अपेक्षा ठेवणार्या तरुणांना हे उदाहरण एक चांगला धडा आहे. त्यामुळे आता पुन्हा करिअरचा नव्याने विचार करण्याची गरज आहे तुम्ही जे कोणते शिक्षण घ्याल त्यात नुसती पदवी घेवुन चालणार नसून तुम्ही त्यात सर्वोच्च मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच स्पर्धा परीक्षांची कसुन तयारी करायला हवी.
सध्या बहुतेक चांगल्या सरकारी नोक-यांची पदे व अधिका-यांची पदे स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मिळू शकतात म्हणून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला शिक्षण पूर्ण करत असतांनाच सुरुवात केली तर अधिक उत्तम.