अत्यंत गुप्तपणे शत्रूच्या गोटात प्रवेश करून, शत्रूच्या योजनांची माहिती काढून, आपल्या देशाच्या हजारो नागरिकांचे प्राण वाचवणारे व कोणतीही प्रसिद्धी न मिळवता प्राणाची बाजी लावून देशरक्षण करणारे गुप्तहेर अत्यंत मोलाचे काम करत असतात. परंतु आपल्याला त्यांची माहिती नसते कारण त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कामच गुप्तपणे चालते… पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अश्या काही गुप्तहेर गाथा… वाचा या धाडसी कथा!
1 ) अजित डोवाल – वर्तमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
आय.पी .एस. झालेले अजित डोवाल हे अतिशय हुशार असे राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी आहेत. आय.पी .एस अधिकारी सहसा प्रत्यक्ष फील्ड एजंट म्हणून नेमले जात नाहीत कारण सरकारला त्यांना एखाद्या मोहिमेत गमावणे परवडणारे नसते. परंतु अजित डोवाल हे फील्ड एजंट बनले आणि सात वर्षे पाकिस्तानात गुप्तपणे वास्तव्य करत त्यांनी देशसेवा केली.
कश्मीरप्रमाणेच अशांत मानल्या जाणार्या ईशान्य भारतात मिझोरम येथे त्यांना नेमले गेले तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष तेथील बंडखोरांच्या नेत्यांशीच मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला. सुमारे दोन वर्षे ते बंडखोरांमध्ये वावरले. त्यांच्या पत्नीने त्यांना या कामी मदत करून बंडखोर नेत्यांसाठी जेवण पुरवले. जंगलातून चीनमध्ये प्रवेश करून तेथील लिबरेशन आर्मीच्या प्रमुख नेत्यांशी बोलणी करून त्यांनी वरिष्ठांनाही चकित केले होते. अजित डोवाल यांनी दाऊद इब्राहीमला मारण्याचीही योजना तयार केली होती परंतु त्यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी त्यात अडथळा निर्माण केला व ती योजना फसली असे सांगितले जाते .
2) रामेश्वर नाथ काव –
NSG व RAW या सुरक्षा यंत्रणेच्या स्थापनेत मोलाचा वाटा असलेल्या व तात्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणार्या काव यांनी सार्वजनिक जीवनात फक्त दोनदा फोटो काढला आहे. यांनी गुप्तपणे अनेक योजना राबवल्या असल्याने त्यांची कागदोपत्री नोंद नाही.1971 च्या युद्धात भारताला विजय मिळवून देण्यात यांची मोठी भूमिका होती. आय.बी. चे प्रमुख असतांना त्यांनी आफ्रिकेत वर्णद्वेषाच्या विरुद्धच्या लढ्यात आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. काही काळ मिझोरम मध्ये असणारे काव हे अजित डोवाल यांचे गुरु असण्याची शक्यता आहे असे म्हटले जाते.
3) रवींद्र कौशिक – पाकिस्तानी सैन्यात घुसलेला शूर.
अत्यंत बुद्धिमान असलेल्या कौशिक यांना रॉ कडून प्रशिक्षण देण्यात येवून त्यांना पाकिस्तानी सैनिक बनवून पाकिस्तानात पेरले गेले होते. त्यासाठी त्यांनी उर्दू शिकून स्वत:ची सुंताही करून घेतली होती. एका पाकिस्तानी मुलीशी लग्न करून त्यांनी पाकिस्तानी सैन्यात मेजर पदापर्यंत बढती मिळवून अत्यंत गुप्त व मोलाची माहिती भारताला पुरवली. दुर्दैवाने त्यांचा एक कनिष्ठ सहकारी पकडला गेल्यावर त्यांच्यामार्फत कौशिक यांची माहिती मिळाल्यावर त्यांना पकडण्यात आले व दोन वर्षे त्यांचा छळ करून त्यांना फाशी दिले गेले .
4) रबिंदर सिंग – रॉ च्या तावडीतून सुटलेला डबल एजंट
काही गुप्तहेर हे डबल एजंट असू शकतात. रबिंदर हा अत्यंत हुशार व जिज्ञासू होता. त्याने गरजेपेक्षा जास्त माहिती गोळा केल्याचा वरिष्ठांना संशय येवून त्याच्यावर चोवीस तास पाळत ठेवण्यात आली. त्याला बहिणीच्या भेटीसाठी युएसला जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्यावर तो सावध झाला व एका महिन्यांनंतर गायब झाला. अगदी हवेत विरून गेल्यासारखा गायब झालेला रबिंदर पुढे पकडला गेला की नाही याची अद्यापही कुठे नोंद नाही.
5) सरस्वती राजमणी –पुरुषवेष धारण करून ब्रिटिशांना फसवणारी स्त्री
सोन्याच्या खाणींची मालकी असलेल्या श्रीमंत कुटुंबातील ही मुलगी वयाच्या सोळाव्या वर्षी घर सोडून सुभाषचंद्र बोस यांचे लढ्यात सामील झाली होती. सुभाषबाबूंच्या लढ्यासाठी त्यांनी अंगावरचे सर्व दागिने दान केले. त्यांच्यावर ब्रिटिश सैनिकांच्या छावणीत शिरून त्यांची माहिती काढण्याचे काम सोपवले गेले होते. अत्यंत धोक्याचे हे काम राजमणी व त्यांच्या पाच महिला सहकारी करत असत. पकडले गेले तर ताबडतोब स्वता:वर गोळ्या झाडून घेण्याचे आदेश त्यांना होते. त्यांची एक सहकारी महिला पकडली गेल्यावर राजमणी यांनी पुरुष वेषात ब्रिटिश छावणीत प्रवेश करून तेथील सैनिकाना गुंगीचे औषध देवून तिला सोडवण्याची मोहीम पार पाडली. दुर्दैवाने या मोहिमेत त्यांच्या पायाला गोळी लागून त्या जायबंदी झाल्या मात्र पळ काढण्यात यशस्वी झाल्या. पुढे त्यांची इतकी हलाखीची परिस्थिती झाली की त्यांना भारत सरकारकडून उदरनिर्वाहासाठी मदत घ्यावी लागली.
6) कश्मीर सिंग – 35 वर्षे पाकिस्तानी तुरुंगवास
सारेच गुप्तहेर यशस्वी ठरत नाहीत. काही शत्रूकडून पकडले जातात व त्यांचे अत्यंत हाल केले जातात. पाकिस्तानात कनिष्ठ सहकारी म्हणून कार्यरत असतांना कश्मीर सिंग पाकिस्तानी गुप्तहेरांकडुन पकडले गेले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून त्यांना सुमारे 35 वर्षे पाकिस्तानी तुरुंगात डांबले गेले. त्या पैकी सतरा वर्षे तर त्यांना अंधार कोठडीत साखळदंडानी जखडून ठेवले गेले होते. त्यातच ते भ्रमिष्ट झाले. पुढे परवेझ मुशर्रफ यांनी 2008 साली मानवतेच्या कारणावरून त्यांची सुटका केली व ते भारतात परतले.
आपण सारे नेहमीच जिवाची बाजी लावून देशाचे रक्षण करणार्या सैनिकांची प्रशंसा करत असतो परंतु गुप्तपणे प्राण पणाला लावणार्या गुप्तहेरांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते ते मात्र जीव धोक्यात घालून शत्रूच्या मुलखात जावून गुप्तपणे मिशन पार पाडत असतात. कोणत्याही मेडल अथवा बक्षिसाची अपेक्षा न ठेवता फक्त देशावरच्या प्रेमापोटी कर्तव्य बजावणाऱ्या साऱ्या गुप्तहेरांना आमचा सलाम!