दसरा म्हणजे भारतातील काही महत्वाच्या सणांपैकी एक सण. दसरा हा सण विजय उत्सव साजरा करण्याचा सण आहे, वाईटावर विजय मिळवण्याचा, अहंकारावर मात करण्याचा आणि जगभरात सत्य, प्रेम आणि करुणा पसरविण्याचा सण आहे. भारतातील प्रत्येक सण हा आपल्या सर्वांसाठी काही न काही बोध घेण्यासारखा असतो, ‘दसरा‘ या सणाचं सुद्धा महत्व खूप आहे.

आपण आपल्याजवळील अहंकार, गर्व या सर्व गोष्टींवर मात करून पुढे जावं हेच या सणांमधून शिकायला मिळत. अहंकार रुपी रावणाच्या पुतळ्याचे दहन करणे म्हणजे रावणाला फक्त ठार मारणे एवढेच नसून आपल्यात असलेल्या अहंकाराला ठार मारणे हे होय. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. गर्वाचे घर खाली, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला रावणाच्या अपयशावरून समजतो हे मात्र तितकेच खरे आहे.

दसरा काही दिवसांवर आल्यापासूनच आपण या उत्सवाच्या तयारीला लागतो. दसऱ्या अगोदर आपण आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करतो, लहानातली लहान वस्तू सुद्धा धुवून पुसून स्वच्छ केली जाते. घरातील सर्व कपडे धुतले जातात. उद्देश दसऱ्याच्या निमित्ताने आपण आपल्या घरातील घाणी सोबतच मनातील आणि शारीरिक घाण दूर करून स्वच्छ राहावे असा आहे. आपले मन आणि शरीर जर स्वच्छ असेल तर आपण जगातील कुठल्याही आणि कितीही मोठ्या संकटाला सामोरं जाऊन त्यावर विजय मिळवू शकतो आणि म्हणूनच दसऱ्याला ‘विजयादशमी’ असेही म्हणतात.

दसऱ्याच्या दिवशी आपण सजून-धजून नवीन कपडे घालून देवीच्या दर्शनाला जातो. तेथून धान आणि सोने-चांदी म्हणजेच आपट्याची पाने घेऊन येतो. नंतर आपल्या वडीलधाऱ्यांना, आपल्या गावातील इतर लोकांबरोबर पान रुपी सोन्या-चांदीची देवाण घेवाण करतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. या प्रथेमागील कारण असे कि आपल्यावर नेहमी मोठ्यांचे आशीर्वाद असावेत आणि समाजात सर्वांबरोबर मैत्रीचे, सलोख्याचे आणि आनंदाचे वातावरण राहावे. हे सोने-चांदी आनंदाचे, प्रेमाचे तसेच सुखाचे प्रतीक आहेत.

देवीचे दर्शन घेतल्यानंतर आपण सीमोल्लंणघन करतो, कारण सीमोल्लंणघन करणे म्हणजे आपण आपल्यावर असलेली बंधनं आणि मर्यादा ओलांडून जगण्याचा मार्ग शोधणे. थोडाक्यात तुम्ही तुमच्यातील त्रुटींवर मात करून जीवन आनंदात जगणे, हा साधा आणि स्पष्ट संदेश या विजयादशमीच्या सणातून आपल्याला घेता येतो.

सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here