सध्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर येऊ घातलेल्या पानिपत सिनेमाची मोठी चर्चा सुरू आहे.

आपल्या इतिहासातील घटनांवर सिनेमे निघणे ही चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे जगाला आपला दैदिप्यमान इतिहास समजतो. परंतु काही गोष्टी अश्या असतात ज्या महत्वाच्या असूनही त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही.

पानिपतची लढाई सर्वांनाच माहीत असते पण त्या लढाईनंतर नेमकं काय झालं याची माहिती फार कमी जणांना असते. पानिपत लढाईनंतर घडलेली अशीच एक महत्वाची आणि तितकीच इंटरेस्टिंग घटना म्हणजे तोतयाचे बंड!

मागे भवाल संन्यासी हा लेख लिहिताना असं लक्षात आलं की इतिहासातील मोठ्या व्यक्तींचे जेव्हा अपघाती निधन होते तेव्हा बऱ्याच वेळा त्यांचे तोतये (डुप्लिकेट) अचानक प्रगट होतात.

आपल्या मराठा इतिहासातही अनेक तोतये निर्माण झाले होते. पानिपत युद्धानंतर जनकोजी शिंदे, छत्रपती रामराजे, यशोदाबाई पेशवे आणि सदाशिवरावभाऊ यांच्या तोतयांची विशेष चर्चा झाली. त्यातही सदाशिवरावभाऊ प्रकरण फारच गाजले. पेशवे असतील, भवाल संन्यासी असेल किंवा अगदी सुभाषचंद्र बोस यांचा डुप्लिकेट असेल… यांना समर्थन का मिळायचे?

लोकांचा त्यांच्यावर विश्वास का बसायचा?

तर कारण उघड आहे. एकतर खऱ्या व्यक्तीविषयी वाटणारी आपुलकी आणि आदर व त्या काळात ओळख पटवण्याऱ्या आधुनिक साधनांची कमतरता. या सर्व प्रकरणामधील एक प्रकरण म्हणजे सदाशिवरावभाऊ यांच्या तोतयावर आपण पानिपत सिनेमा निमित्ताने लक्ष केंद्रित करू.

पानिपतचे युद्ध हा मराठा साम्राज्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा प्रसंग ठरला. या युद्धात अहमदशहा अब्दालीने मराठ्यांचा जो पराभव केला त्याच्या जखमा आजही मराठी माणूस उराशी बाळगून आहे. हा पराभव का आणि कसा झाला, त्यात किती नुकसान झाले हे तर जाहीरच आहे… पण या युद्धानंतर काही वर्षांनी असा एक पेचप्रसंग उभा राहिला की तो निस्तारणे कठीण गेले होते.

पानिपत युद्धात असंख्य मराठा सरदार मृत्युमुखी पडले. मराठ्यांचे सेनापती सदाशिवरावभाऊ यांचेही निधन झाले. मृत्यनंतर दोन दिवसांनी त्यांचे शिरावेगळे धड सापडले आणि दुसऱ्या दिवशी शीर सापडले. त्यांच्या कलेवरावरती 20 जानेवारी 1761 मध्ये अग्निसंस्कार झाल्याची नोंद इतिहासात नमूद आहे.

आपल्याला इतिहासातील बऱ्याच घटना सांगोवांगी माहीत असतात. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी केलेल्या विधानावर विश्वास ठेवून पुढे चालायचं असतं. त्या काळी ओळख पटवणारी अत्याधुनिक साधने उपलब्ध नसल्या कारणाने तोंडी माहिती, चित्रे वगैरेवर ओळख पटवली जायची. त्याच पद्धतीने मृत शरीर हे सदाशिवराव यांचेच आहे अशी ओळख पटवून त्यावर अंत्यसंस्कार केले गेले आणि एक अध्याय तिथेच संपला.

मात्र, आणखी दोन वर्षांनी सदाशिवराव परत जिवंत होऊन धुमाकूळ घालणार आहेत याची कल्पना कोणालाही नव्हती.

बुंदेलखंडात कनोल नावाच्या गावी सुखलाल हा एक साधारण मनुष्य वास्तव्यास होता. त्याच्या घरात नेहमी भाऊबंदकीची भांडणे चालत असत. त्या भांडणांना कंटाळून त्याने कनोल सोडले व नरवर गावी येऊन एका वाण्याच्या दुकानात नौकरी पत्करली. एके दिवशी असाच दुकानात पुड्या बांधत असताना तिथे महाराष्ट्रातील काही लोक फिरत फिरत आले. त्यांनी सुखलालला बघून आश्चर्यचकित होऊन सांगितलं की तू हुबेहुब सदाशिवरावभाऊ पेशव्यांसारखा दिसतोस.

झालं! धूर्त स्वभावाच्या सुखलालने ही संधी पुरेपूर ओळखली! या साम्याचा फायदा घेऊन आपण अख्खी पेशवाई वेठीस धरू शकतो हे त्याच्या महत्वकांक्षी मनाने ओळखले आणि त्याने त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली.

सर्वप्रथम त्याने भटक्या साधू गोसाव्यांना हाताशी धरले. त्यांच्यामार्फत सगळीकडे पसरवले गेले की सदाशिवराव जिवंत आहे. मग यावर विश्वास ठेवून उत्तर भागातले पेशव्यांचे काही सरदार लोक सुद्धा सुखलालला जाऊन मिळाले. आता सुखलालला सामील होणारे लोक खरंच विश्वास ठेवून आले होते की स्वार्थ साधण्यासाठी आले होते हे सांगणे कठीण आहे, मात्र त्याचे समर्थन करणारी संख्या वाढू लागली हे मात्र खरे! हळू हळू सुखलालने स्वतःची फौज पण तयार केली आणि पेशवाई ताब्यात घेण्याची स्वप्ने बघू लागला.

त्याचवेळी इकडे महाराष्ट्रात काय परिस्थिती होती?

पतीनिधनाने पार्वतीबाई सैरभैर झालेल्या होत्या. त्यांनी आपले पती सदाशिवराव निधन पावले आहेत हे मान्यच केलेलं नव्हतं. इतकंच काय, त्यांनी आपले सौभाग्यालंकार सुद्धा उतरवले नव्हते. जेव्हा त्यांना बातमी मिळाली की सदाशिवराव पेशवे जिवंत आहेत तेव्हा ते खरेच वाटावे यात नवल काय? त्याचसोबत माधवराव पेशवे, नाना फडणवीस यांनाही उत्तरेतून बातम्या आणि पत्रे मिळू लागली की सेनापती अद्याप जिवंत आहेत. या बातमीची शहानिशा करण्यासाठी त्यांनी मल्हारराव होळकरांना सांगितले.

तोतया सदाशिवरावने तोपर्यंत महाराष्ट्राकडे येण्यास मोर्चा वळवला होता. वाटेल लागणाऱ्या गावांना लुटत, एक एक किल्ले हस्तगत करत स्वारी पेशवाई मुलखात दाखल झाली. मध्यंतरी मल्हारराव होळकर यांनी तोतयाची चौकशी करून हा खरा सदाशिव पेशवा नाही असा निरोप पाठवला होताच… त्यामुळे थोरल्या माधवरावांच्या सूचनेवरून महादजी शिंदे यांनी या तोतयाला कैद केले आणि तुरुंगात टाकले.

त्याला एका तुरुंगात कायम न ठेवता नगर, दौलताबाद, मिरज, रत्नागिरी वगैरे तुरुंगात वेळोवेळी बदली करत असत. मात्र रत्नागिरी येथे कैदेत असताना तिथला सुभेदार रामचंद्र परांजपे याने फितुरी केली आणि तोतयाला सोडून दिले. पुढे या खोट्या सदाशिवरावभाऊने चक्क पेशव्यांचे सर्व आरमार ताब्यात घेतले आणि कोकणात थैमान घातले.

इतकंच नव्हे, तर राजमाची हस्तगत करून सिंहगड ताब्यात घेण्याचे प्रयत्न करू लागला. या बंडात त्याला साथ मिळाली ती इचलकरंजीकर घोरपडे, हैदर आणि अर्थातच इंग्रजांची!

आता मात्र थोरले माधवराव पेशवे यांचा संयम संपला होता…

त्यांनी आणि नाना फडणवीसांनी शिंदे, होळकर आणि पानसे यांना हे बंड मोडीस काढण्याची सूचना दिली. महादजी शिंद्यांनी सिंहगड सुरक्षित केला. पानश्यांनी तोतयावर हल्ला चढवला. तोतया राजमाची सोडून परत कोकणात पळून गेला. त्याच्यामागे होळकरांनी आपले दिवाण बाळाराव यांना पाठवले. बाळारावांनी त्याला पळता भुई थोडी केली. शेवटचा उपाय म्हणून तोतयाने बेलापूर गाठले आणि गलबतात बसून इंग्रजांच्या भेटीला मुंबईला निघाला. मात्र, ही बातमी मिळताच राघोजी आंग्रे यांनी भर समुद्रात त्याचे गलबत अडवले आणि त्याला अटक केली व पुण्याला पाठवले.

पुण्यात परत एकदा सर्वांसमोर पंच बसवून त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी सर्वानुमते हा खरा नसून खोटा सदाशिवराव आहे हाच निष्कर्ष निघाला. तोतयाने देखील कबूल केले की त्याचे खरे नाव सुखलाल आहे.

शेवटी त्याची पुणे शहरात सर्व नागरिकांसमोर धिंड काढण्यात आली आणि त्याचे मेखसूने डोके फोडून देहांत शासन दिले गेले. ही घटना 18 डिसेंबर 1776 साली घडली.

बघा, एका डुप्लिकेटने संपूर्ण पेशवा साम्राज्याला 1763 ते 1776 म्हणजे जवळपास तेरा चौदा वर्षे सळो की पळो करून सोडलं होतं. आता काही जणांच्या मतानुसार तो खोटा सदाशिव होता की खरा यात संभ्रम आहे. काहीजण म्हणतात तो खराच होता. पण विचारात घेण्यासारखी गोष्ट अशी की इंग्रजांसारख्या कपटी लोकांनी खऱ्या सदाशिवास मदत का केली असती? उलट तोतयाला आपल्या हातचे प्यादे बनवून पेशवाई हस्तगत करणे त्यांना आणखी सोपे होते म्हणून त्यांनी तोतयाची मदत केली असाही निष्कर्ष निघू शकतो. पण काही का असेना, जर त्या काळी ओळख पटवणारी साधने असती तर इतका त्रास आणि जीवित, वित्तहानी सहन करावी लागली नसती.

इतिहासातल्या अश्याच घटना भविष्यातील तंत्रज्ञानाला जन्म देत असतात.

(टीप : लेखातील संदर्भ हे अनेक ठिकाणांवरून गोळा केलेले आहेत आणि मुख्य आधार केतकर ज्ञानकोषाचा घेतला आहे. यातील सर्वच माहिती शंभर टक्के खरी आहे असा दावा आमचा नाही.)