आज वीस नोव्हेंबर… आजचा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. कारण आजच्याच दिवशी भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळयात्री ‘Kalpana Chawla’ अवकाशात झेपावली होती. या तिच्या कामगिरीबद्दल फक्त भारतानेच नव्हे तर संपूर्ण जगाने टाळ्या वाजवल्या होत्या. नव्वदच्या दशकातील ही भारताची एक फार मोठी मान उंचावणारी कामगिरी ठरली होती. तर आज

20 नोव्हेंबर निमित्त जाणून घेऊया कल्पना चावलाचा प्रवास…

तो काळ होता नव्वदच्या दशकाचा. आजही नाइंटीज मध्ये वाढलेली पिढी तो काळ आठवून भावनिक होते. एकीकडे बॉलिवूडच्या सिनेमांची आणि त्याच्या रोमँटिक गाण्यांची चलती होती तर दुसरीकडे राजकीय उलथापालथीमुळे भारतात सातत्याने पंतप्रधान बदलत होते. जिकडे तिकडे सिनेमा आणि राजकारण याचीच चर्चा असताना अचानक एक बातमी येऊन धडकली आणि सर्वांचे लक्ष तिकडे वेधले गेले. अमेरिकेच्या कोलंबिया STS-87 या अवकाशयानातून एका भारतीय वंशाच्या महिलेने, कल्पना चावलाने थेट अंतराळात भरारी घेतली! भारतीयांसाठी ही निश्चितच अत्यंत अभिमानाची बाब होती. सगळीकडे कल्पना चावलाची चर्चा होऊ लागली.

कोण होती कल्पना?

एक काळ असा होता की, महिलांना घराच्या चार भिंतीच्या बाहेर येऊ दिले जात नसे. त्यांच्यावर अनेक बंधने होती. अश्या परिस्थितीत हरियाणाच्या कर्नाल गावात कल्पनाचा जन्म 17 मार्च 1962 रोजी झाला. ती चार भावंडात सर्वात लहान होती. घरचे तिला लाडाने ‘मोंटू’ अशी हाक मारत असत. लहानपणी कल्पनाला इंजिनिअर व्हायची इच्छा होती पण तिच्या वडिलांना तिने शिक्षक किंवा डॉक्टर बनावे असे वाटत असे.

त्यावेळी कुणाला कल्पना सुद्धा नव्हती की ही कल्पना पुढे चालून अंतराळवीर बनेल आणि पृथ्वीभोवती तब्बल 352 वेळा परिक्रमा करेल.

कल्पनाचे सुरुवातीचे शिक्षण कर्नालच्या टागोर बालनिकेतन येथे झाले.

हरियाणा हे राज्य तसे कर्मठ विचारांचे समजले जाते. तिथे महिलांवर अनेक बंधने असतात. अश्या वेळी कल्पना तिचे स्वप्न कसे पुरे करणार होती? मग तिने गाव सोडून चंदिगढच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. तिथे तिने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये बिटेक केले. आता तिला अंतरिक्ष खुणावू लागले होते. पण त्या वेळी अंतराळ क्षेत्रात भारत फार पिछाडीवर असल्याने कल्पनाला आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अमेरिका गाठावी लागली. तिला माहीत होते, तिचे स्वप्न फक्त नासा पूर्ण करू शकते. कल्पनाने टेक्सस युनिव्हर्सिटी मध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग हा विषय घेऊन एम टेक पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर मात्र कल्पना चावलाने सरळ नासा मध्ये प्रवेश केला.

1988 मध्ये नासाच्या रिसर्च सेंटर मध्ये तिची नियुक्ती झाली. आपल्या उत्कृष्ट कामगिरी मुळे कल्पना 1995 साली नासाच्या अंतराळवीरांच्या टीममध्ये निवडली गेली आणि इथून तिच्या स्वप्नांना खरोखर मार्ग मिळाला. अत्यंत खडतर असे प्रशिक्षण तिला पूर्ण करावे लागले आणि शेवटी काही मोजक्या लोकांसोबत अवकाशात जाण्याची संधी तिला प्राप्त झाली.

भारतातल्या एका साध्या गावातली महिला आपल्या महत्वकांक्षा आणि मेहनतीच्या बळावर एवढा मोठा पल्ला गाठू शकते हे तिने जगाला आजच्याच दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर 1997 रोजी दाखवून दिले. तिच्या या भरारीला सर्व जगाने मानवंदना दिली.

पहिली अवकाशयात्रा यशस्वीपणे पार पाडून कल्पना शांत बसली नाही… तिने परत आल्यानंतर लगेचच दुसऱ्या यात्रेची तयारीही सुरू केली.

1 फेब्रुवारी 2003 ही तारीख अंतराळ इतिहासातील काळा दिवस मानली जाते. याच दिवशी कल्पना चावला तिच्या सहकाऱ्यांसोबत आपली दुसरी यात्रा आटपून परत पृथ्वीवर परत येत होती. त्यांचे अंतराळ यान कोलंबिया STS-107 हे पृथ्वीपासून दोन लाख फुटांवर होते. त्याचा वेग ताशी वीस हजार किलोमीटर प्रति तास इतका होता. पुढच्या 16 मिनिटात ते यान धरतीवर पोचणार होते आणि त्याची प्रतीक्षा सगळे जग करत होते… पण…

यानाचा पृथ्वीसोबत संपर्क तुटल्याची बातमी आली आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला! नेमके काय घडते आहे हे समजण्याच्या आतच कोलंबिया यानाचे तुकडे तुकडे होऊन ते जमिनीवर विखुरले गेले. कल्पना सह आतल्या सर्व अंतराळ वीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला! आजही ही घटना आठवून हळहळ वाटते इतकी ती धक्कादायक होती. पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होऊन यानाची बाहेरचे सुरक्षा कव्हर फाटले असे याचे कारण सांगितले जाते.

पण आज 20 नोव्हेंबर रोजी हमखास कल्पना चावलाची आठवण येते आणि आपोआप तिला सलाम ठोकला जातो. कुठलाही भारतीय व्यक्ती कल्पना चावला आणि तिचे अंतराळ क्षेत्रासाठीचे योगदान कधीही विसरू शकत नाही.