आसाम मधल्या शेतकऱ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण ते जे तांदूळ उत्पादन करतात त्या तांदळाला शिजवण्याची काहीच गरज नाही. या वैशिष्ट्ये पूर्ण तांदळाचे महत्व लक्षात घेऊन भारतीय सरकारने या तांदळाला भौगोलिक निर्देशक टॅग (Geographical Indication-GI Tag) देऊ केलं आहे. आसाम मध्ये या आधी फक्त मुगा रेशिम, जोहा तांदूळ, तेजपुर लिची या तीन पदार्थांनाच GI Tag मिळाला होता. या तिघानंतर बोका तांदूळ(mud rice) याला GI Tag मिळाला आहे. ‘आसाम विज्ञान-तंत्रज्ञान आणि पर्यावरण समितीने ‘ या तांदळाला GI Tag देण्यासाठी शिफारस केली होती.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता या बोका तांदळाला शिजवण्याची गरज नाही तर मग याचा भात करणार कसा आणि जर त्याचा भात करायचा नसेल तर मग तो खाणार कसा ?

तुमच्या प्रश्नाचं उत्तर फारच सोपं आहे. या तांदळाचा भात तर करावाच लागेल यात काही शंका नाही पण तो भात न शिजवता, न ऊर्जा वापरता करायला येतो. आणि तो म्हणजे तो जेवण करण्या आधी अर्धा-एक तास आधी या तांदळाला पाण्यात फक्त भिजवुन ठेवायचं आणि नंतर त्याचा भात होतो.

या तांदळाचा उपयोग पूरग्रस्त भागातील स्थलांतरित लोकांच्या व्यवस्थापनात, युद्ध काळात सैनिकांसाठी अशा वेगवेगळ्या परिस्थितीत वापर करता येतो. ह्या तांदळाचे उत्पादन जून ते डिसेंबर या दरम्यान घेतले जाते. पण हे तांदूळ फक्त ग्रामीण भागापूरते मर्यादित आहेत, शहरी भागातील लोकांनी याला म्हणावं तितक्या प्रमाणात स्वीकारलं नाही.

गुवाहाटी विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी प्रभागाने केलेल्या अभ्यासानुसार या तांदळात १०.७३% तंतुमय पदार्थ आणि ६.८% प्रथिने आहेत जे की आपल्या सामान्य तांदळा पेक्षा जास्त आहेत. याला शिजवण्यासाठी शून्य इंधनाची आवश्यकता आहे.