राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो हे प्रसिद्ध विधान आज खरे ठरताना दिसत आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून अखेर भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या मार्गावर आल्याचं जवळपास निश्चित झालंय. ही अनेकांसाठी धक्कादायक बाब असली तरी इतिहासाकडे ज्यांचे लक्ष आहे त्यांना ही गोष्ट तितकीशी धक्का देणारी वाटत नाही.

आज शिवसेनेवर भाजप समर्थक आक्षेप घेत आहेत की तुम्ही नैसर्गिक मित्रता सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करणे योग्य आहे का? अर्थात, कुणासोबत जायचं ते सर्वस्वी शिवसेनेचा प्रश्न असल्याने ते त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतीलच. परंतु एक गोष्ट मात्र नक्कीच सिद्ध होते की आजही महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार साहेबांच्या भोवतीच फिरते ही गोष्ट मात्र कुणीही अमान्य करू शकणार नाही.

तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत खास माहिती… सेना राष्ट्रवादी इतकी वर्षे राजकारणात एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले असले तरी त्यांचे पक्षप्रमुख

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते?

जाणून घ्यायचंय? तर मग वाच भाऊ…

मराठी माणसाच्या मुद्द्यावर स्थापन झालेली शिवसेना कालांतराने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येऊन स्थिरावली. त्याचवेळी धर्मनिरपेक्षता हा मुद्दा घेऊन शरद पवार राजकारण करत होते. राजकीय विचारधारा वेगवेगळी असली तरी ठाकरे-पवार कुटुंबीयांनी आपल्या मैत्रीमध्ये त्याला आणले नाही. अनेकदा समोरासमोर येऊन संघर्ष केला मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनात कधीही कटुता आली नाही. सार्वजनिकरित्या बाळासाहेबांनी पवारांचा ‘मैद्याचे पोते’ असा उल्लेख केला होता. परंतु फार कमी लोक जाणतात की दिवसा अशी खिल्ली उडवून रात्री ते पवारांना जेवणासाठी सहकुटुंब बोलावत असत. आणि पवार साहेब सुद्धा कुठलाही राग मनात न ठेवता ठाकरे कुटुंबासोबत हसत खेळत जेवण करत आणि गप्पा मारत असत. मैत्रीचे हे उदाहरण अगदी दुर्मिळ म्हणावे लागेल.

सप्टेंबर 2006 मध्ये जेव्हा सुप्रिया सुळे यांनी प्रथम निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्वतः बाळासाहेबांनी पवार साहेबांना फोन करून विचारले, “सुप्रिया निवडणूक लढवत आहे हे तुम्ही मला का सांगितले नाही? अश्या बातम्या मला बाहेरून का समजतात?” तेव्हा पवार साहेब म्हणाले, “सेना-भाजपचे उमेदवार आधीच घोषित झाले आहेत त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट सांगून त्रास द्यावा वाटला नाही.” यावर बाळासाहेबांनी पवारांना शब्द दिला,

“सुप्रिया जशी तुमची मुलगी आहे तशी माझीही मुलगी आहे. तिला मी अगदी लहानपणापासून बघितले आहे. त्यामुळे तिच्या विरोधात आम्ही सेनेकडून कोणताही उमेदवार उभा करणार नाही. भाजपची चिंता करू नका. त्यांना मी बोलतो.”

पवार साहेब आपल्या आत्मचरित्रात लिहितात, एखाद्याशी मैत्री केली की ती जीवनभर निभावायची हे बाळासाहेब ठाकरे यांचे तत्व होते. ते त्यांनी खरोखर आयुष्यभर पाळले.

पण ही मैत्री जशी खरी होती तशीच काही वेळा ती राजकारणामुळे अडचणीत सुद्धा आली होती. सुदैवाने दोघांनीही त्याला वैयक्तिक स्वरूप न दिल्याने ती अबाधित राहिली. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे छगन भुजबळ हे होय.

एक वेळ अशी होती जेव्हा शरद पवार काँग्रेस पार्टीतर्फे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते. त्यावेळी विरोधी पक्षातून म्हणजे सेनेकडून छगन भुजबळांनी पवारांविरोधात रान पेटवले होते. भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप भुजबळांनी केले. त्यावेळी ते शिवसेनेचे वजनदार नेते असल्याने त्यांनी केलेल्या आरोपांना वर्तमानपत्रांमधून बरीच प्रसिद्धी लाभली. अश्यावेळी साहजिकच शरद पवार यांची अपेक्षा होती की बाळासाहेबांनी यात लक्ष घालून होणारे चारित्र्यहनन थांबवावे. परंतु बाळासाहेब ठाकरे गप्प बसले. काही वर्षांनी याच छगन भुजबळांनी जेव्हा सेनेमध्ये मोठी फूट पाडून काँग्रेस जवळ केली तेव्हा बाळासाहेबांची अपेक्षा होती की शरद पवारांनी हे रोखावे. परंतु आता गप्प बसण्याची वेळ पवारांची होती.

कालांतराने पवारांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. भुजबळ काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आणि निवडणूक जिंकून महाराष्ट्राचे गृहमंत्री या नात्याने काम करू लागले. जुन्या शत्रुत्वातून भुजबळांनी दहा वर्षांपूर्वीची एक केस परत उघडली आणि थेट बाळासाहेबांना अटक करण्यासाठी सूत्रे हलवली. यावेळी शरद पवार मनात आणते तर ही अटक रोखू शकले असते पण त्यांनी ते केले नाही. वैयक्तिक मैत्री आपल्या जागी आणि राजकारण आपल्या जागी हे तत्व दोघांनीही पाळले.

राष्ट्रवादी आणि सेनेचे संबंध जसे लव्ह-हेट रिलेशनचे राहिले आहेत तसेच सेना-काँग्रेसचे सुद्धा आहेत.

2007 साली एनडीए तर्फे भैरोसिंग शेखावत आणि यूपीए तर्फे प्रतिभाताई पाटील हे राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून थांबले होते. त्यावेळी मराठी मुद्द्यावर सेनेने प्रतिभाताई पाटलांना पाठिंबा दिला. 2012 मध्येही पी ए संगमा यांच्याऐवजी काँग्रेसप्रणित उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला. त्यापूर्वीचा इतिहास बघितला तर देशातल्या आणीबाणी प्रसंगी सगळे विरोधी पक्ष इंदिरा गांधी यांच्या विरोधात होते पण फक्त एकमेव बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिराजींचे समर्थन केले होते. 1978 मध्ये इंदिराजींना जनता पक्षाने अटक केली तेव्हाही बाळासाहेब त्या निर्णयाच्या विरोधात होते. असं म्हणतात, शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात कम्युनिस्टांना मुंबई आणि महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी काँग्रेसने सेना वाढावी यासाठी भरपूर प्रयत्न केले.

तर यावरून सर्वांच्या लक्षात यायला हरकत नसावी की ठाकरे-पवार यांचे सौहार्दाचे संबंध आणि सेना-काँग्रेस यांचा इतिहास पाहता ‘महाशिवआघाडी’ हे सूत्र नैसर्गिकच म्हणावे लागेल. त्यात आश्चर्यजनक असे काहीच नाही. आता या वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात का व सत्ता स्थापन केली तर महाराष्ट्राचे राजकारण कुठल्या दिशेने जाते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे…

लेख आवडला असेल तर कमेंटबॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया द्या… आणि शेअर करायला विसरू नका.