छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा मुघलांच्या तावडीतून निसटून आग्राहुन परत आले तेंव्हाचा हा काळ आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरच्या तहात म्हणजेच मिर्जाराजे जयसिंगासोबत झालेल्या तहात जेवढे किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यापैकी एक होता, किल्ले कोंढाणा. माँसाहेब जिजाऊंना सर्वात प्रिय असणारा हा गड होता. मिर्जाराजे जयसिंगा बरोबर झालेल्या तहामुळे हा किल्ला माँसाहेबांना सोडून यावा लागला. या तहात ठरल्यानुसार आणि मिर्जा राजे जयसिंग यांच्या खास आग्रहा खातर छत्रपती शिवाजी महाराज आग्राला बादशाहच्या भेटीस जाण्यास राजी झाले होते.

परंतु औरंगजेबाने दगा केला, राजाला कैद करण्याचा प्रयत्न केला. परंतु आग्राहुन बादशाहच्या हातावर तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज निसटले आणि स्वराज्यात परत आले.

कोंढाणा किल्ल्यावर आता मुघलांच्या फौजा होत्या, मिर्जाराजे जयसिंग यांनी नेमलेला त्यांचा सुभेदार उदयभान होता. हा मूळचा राजपूत, त्याचं मूळ नाव उदयसिंह राठोड. मुघलांची चाकरी करत असताना त्याने आपला हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता.

या उदयभान्यान कोंढाणा किल्ल्यावर जणान खाना सुरू केला होता. जिजाऊ माँसाहेबांना ही गोष्ट खपत नव्हती. त्यावेळी जिजाऊ माँसाहेब राजगडावर होत्या. राजे स्वराज्याच्या पहाणीवर गेले होते. जिजाऊ माँसाहेबांनी महादेव नावाच्या रामोशी मावळ्याला बोलावले आणि त्याला सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना ताबडतोब जिथे असाल तिथून राजगडावर येण्यास सांगावे.” असा संदेश द्या.

त्यावेळी महाराज रायगडावर होते. महादेवाचा संदेश मिळताच राजे जिजाऊ माँसाहेबाकडे आले. त्यावेळी माँसाहेबांनी आपली खंत शिवाजी महाराजांसमोर व्यक्त केली आणि शिवाजी राजाला सांगितलं की

आम्हाला कोंढाणा परत हवाय.

परंतु शिवाजी महाराजांना आताच मुघलांशी वैर घ्यायचं नव्हतं. परंतु जिजाऊ माँसाहेबांनी जेंव्हा कोंढाण्याची खरी परिस्थिती शिवाजी राजांना सांगितली तेंव्हा राजांची तळपायाची आग मस्तकात गेली. राजांनी कोंढाणा परत घेण्यात येईल, असं वचन माँसाहेबांना दिलं.

त्यावेळी तानाजी मालुसरे त्यांच्या मुलाच्या म्हणजेच रायबाच्या लग्नाच आमंत्रण घेऊन शिवाजी राजाकडे आले होते. त्यांना राजे कोंढाण्यावर चढाई करणार आहेत, ही गोष्ट कळली. त्यावेळी तानाजींनी आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवली आणि कोंढण्यावर चढाई करण्याची तयारी सुरु केली. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाशी बोलून तानाजी मालूसरे यांना कोंढण्याच्या चढाईला पाठवण्याचे निश्चित केले. त्यापद्धतीने शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे व अन्य मावळे यांच्यात बैठक झाली आणि छत्रपती शिवाजी राजांचा हा शूर मावळा मोहिमेच्या तयारीत जुटला.

जेंव्हा तानाजींना त्यांच्या घरच्यांनी मोहिमेबद्दल विचारलं तेंव्हा तानाजींनी “आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे.” असे उद्गार काढले.

तानाजी मालुसरे हे मूळचे कोंकणातील, महाड नजीक असलेल्या उमरठं या गावचे आहेत. संपूर्ण कोंकण परिसराची त्यांना चांगली जाण आहे. राजांनी वेळ ठरवली आणि त्यानुसार तानाजी मालुसरे आपल्या आठशे मावळ्यांसह कोंढाण्याच्या मोहिमेवर निघाले. चढाई करण्या अगोदर संपूर्ण किल्ला जाणून घेणे महत्त्वाचे होते. त्यासाठी त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या कोळ्यांचा सहारा घेतला. कोळ्यांनी ही गडाची संपूर्ण माहिती सुभेदारांना दिली, कारण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आम्ही आमचा जीवही अर्पण करू, अशी भावना त्यांच्यात होती. किल्ल्याचा भोरगिरी बाजूचा कडा तुटलेला आहे, त्या बाजूने काही मावळे घेऊन तानाजी मालुसरे यांनी चढाई करायची, किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर गडाचा कल्याण दरवाजा उघडायचा आणि मग बाकीचे मावळे गडामध्ये प्रवेश करतील आणि संपूर्ण शक्तीनिशी हल्ला करायचं, असे ठरले.

तानाजी मालुसरे 300 मावळ्यांसह तुटलेल्या कड्यावरून किल्ल्यावर चढाई करण्यास निघाले. त्यावेळी गडावर दोर टाकण्यासाठी घोरपडीचा उपयोग केला जायचा. मावळे त्या घोरपडीला यशवंती असे म्हणत. रात्री चढाई सुरू झाली, मावळे गडावर पोहोचले, त्यांनी कल्याण दरवाजा उघडला आणि बाकीचे पाचशे मावळे सुद्धा आत घुसले. या 500 मावळ्यांच नेतृत्व करत होते तानाजीचेच कनिष्ठ बंधू सूर्याजी मालुसरे. तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्या फौजेत लढाई सुरू झाली होती. या लढाईत तानाजींची ढाल तुटली परंतु त्यांनी आपल्या कमरेचा शेला आपल्या हाता भोवती गुंडाळला आणि लढाई चालू ठेवली.

अखेर लढाईत उदयभान मारला गेला आणि गडावर मावळ्यांनी कब्जा केला. परंतु लढाईत तानाजी मालुसरे सुद्धा गंभीर जखमी झाले होते आणि त्यांचा सुद्धा लढाईत मृत्यू झाला. शिवाजी महाराजांना कळवण्यात आलं की गड काबीज करण्यात आला आहे. शिवाजी महाराज गडावर पोहचले, परंतु आपल्या धारातीर्थी पडलेल्या सिंहाला बघून त्यांना खूप दुःख झालं. त्याच वेळी त्यांनी

गड आला पण माझा सिंह गेला..

हे ऐतिहासिक गौरवोद्गार तानाजी मालुसरे यांच्याबद्दल काढले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हळहळ व्यक्त केली आणि जाहीर केलं की आजपासून हा गड सिंहगड नावाने ओळखला जाईल. आणि तेंव्हापासून त्या गडाला सर्वजण सिंहगड नावाने ओळखतात. पुण्यातील हाच तो सिंहगड जिथे आपण आज सर्वजण जातो. याच किल्ल्यासाठी 4 फेब्रुवारी 1670 रोजी तानाजी मालुसरे यांनी आपला जीव अर्पण केला. अशा या शूरवीर मावळ्याला मानाचा मुजरा.

नुकतंच तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर ‘तानाजी‘ नावाचा चित्रपट येत आहे. त्यात अजय देवगण तानाजीची भूमिका बजावत आहेत. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर चित्रपट बनत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. परंतु या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा कशा प्रकारे रेखाटली आहे, ही पाहण्याची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला कसल्याही प्रकारे धक्का लागणार नाही, याची काळजी नक्कीच घेतली असेल, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र