सध्या जकार्ता मध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू वेगवेगळ्या खेळांमधून आपले वर्चस्व दाखवत आहेत, परंतु कबड्डीच्या बाबतीत खेळाडूंच्या पदरी निराशा आली आहे. आशियाई खेळाच्या पाचव्या दिवशी आतापर्यंतच्या सर्वात धक्कादायक निकालाची नोंद करण्यात आलेली आहे. सात वेळा स्पर्धेचे विजेते पद भूषवणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य सामन्यात इराणने पराभवाचा धक्का दिला आहे. मजबूत बचावाच्या आधारावर इराणने भारतावर २७-१८ अशा ९ गुणांच्या फरकाने भारताला मात देऊन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे, त्यामुळे भारताचे हक्काचे सुवर्ण पदक हुकले.

भारतीय खेळाडूंनी खेळाच्या पहिल्या सत्रामधेच चांगल्या खेळाची सुरुवात केली होती. रिशांक देवाडीगाने सुरुवातीस केलेल्या आक्रमक चढायांमुळे भारताने ६-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती. मात्र आपल्या संघाची सुरुवातीला होत असलेली वाताहत पाहून इराणच्या प्रशिक्षकांनी अबुफजल मग्शदुलूला खेळात उतरविले. त्यानंतर इराणच्या खेळात अमुलाग्र बदल झालेला दिसून आला. अबुझार मेघानी, फैजल अत्राचली, मोहसीन मग्शदुलू यांनी आपल्या बचावात सुपर टॅकल करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. भारताच्या दिग्गज खेळाडू प्रदीप नरवाल, अजय ठाकूर यांना निशाणा करत इराणच्या बचावपटू आपल्या जाळ्यात अडकवत गेले. पहिल्या सत्राच्या अखेरीस दोन्ही संघ ९-९ अशा बरोबरीत होते.

परंतु दुसऱ्या सत्रात मात्र इराणच्या खेळाडूंचा आक्रमक पवित्रा पहायला मिळाला. इराणच्या खेळाडूंनी भारताच्या प्रत्येक चढाईपटूला बाद करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. इराणच्या या आक्रमक खेळापुढे भारताचे खेळाडू हताश होताना दिसून आले आणि त्याचाच प्रभाव त्यांच्या खेळावर दिसून आला. मोनू गोयत, प्रदीप नरवाल यासारख्या खेळाडूंनाही स्पर्धेत गुणांची कमाई करता आली नाही. त्यातच फैजल अत्राचली आणि अजय ठाकूरला यांच्यात झालेल्या झटापटी दरम्यान अजय ठाकूर जखमी झाला. या खेळा दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार बाहेर गेल्यामुळे संघाचं मनोधैर्य काहीसं खचलेलं पहायला मिळालं. संघात पसरलेल्या या गोंधळाचा फायदा घेत इराणने भारताला पहिल्यांदा सर्वबाद करत मोठी आघाडी घेतली. शेवटी इराणने  २७-१८ च्या फरकाने सामना जिंकत आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. शेवटी इराणच्या संघाने भरताला मात देऊन हा सामना जिंकला.