“अमुक अमुक एका मुलाचे १०० पर्यंत पाढे पाठ आहेत”, “मामाच्या गावाला ४ वर्षांच्या चिमुरडीचा सबंधं इतिहास तोंडपाठ आहे” अशा बऱ्यच गोष्टी तुम्ही आजवर ऐकल्या आहेत, बरोबर??
अगदी काल्पनिक चमत्कारांच्या नावाखाली का होईना, ऐकल्या तर असतीलच…
छोट्या छोट्या शहरांत असे मोठे मोठे चमत्कार होतच असतात, नाही का? आता म्हणाल चमत्कार वगैरे असे शब्द वापरून हा विषय अध्यात्माकडे तर वळत नाहीये ना?? तर नाही…
विज्ञानातही असे चमत्कर होऊच शकतात की…असाच एक चमत्कार हैदराबादमध्ये घडला आहे…
सातवीत शिकणाऱ्या एका १२ वर्षांच्या मुलाला चक्क एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे. काय आहे की नाही चकित करणारी गोष्ट?
मूळचा सिकंदराबादचा रहिवासी असलेला १२ वर्षांचा हा सिद्धार्थ श्रीवास्तव पील्ली! सध्या सिटी बेस्ड असणाऱ्या स्मार्ट बिझनेस सोल्युशन मध्ये Data Scientist म्हणून काम करीत आहे. यात अजून भर घालणारी गोष्ट म्हणजे या मुलाच्या LinkedIn अकाउंटचे स्पष्टीकरण…
पील्ली म्हणतो,
“मी १२ वर्षांचा असून, कोडींग करणं मला खूपच आवडतं. अगदी लहान असल्यापासून मला कोडींग करायला आवडतं. माझ्या कोडींगचा प्रारंभ JAVA पासून सुरु झाला असून आता सध्या मी Master Data-Science वर काम करीत आहे.”
कोडींग करण्याची आवड तुला कशी निर्माण झाली असं विचारल्यावर,
मला गेम खेळायला खूपच जास्त आवडत असून, हे गेम तयार कसे होतात?, ते कोण तयार करतं?, याबद्दल बरीच कुतुहलता मनात बाळगून मी कोडिंगकडे वळलो.
मित्रांनो, कोडींग शिकल्यानंतर त्याने एक त्याचा स्वतःचा गेम तयार केला असून तो स्वतःच्याच Youtube Channel वरून त्याचं लोकार्पण केलं. केवढासा तो जीव, आणि केवढं ते कार्य! ते आपण म्हणतो ना, “मूर्ती लहान पण किर्ती महान!” हे वाक्य पील्लीच्या कार्याला अगदीच शोभून दिसतं…
पिल्लीसारखी आजच्या पिढीतील मुले ही आईच्या गर्भात असतानाच सारं काही शिकून येतात, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. आताचे पालकही आपल्या पाल्याने लहानापासून काय करावे, काय करू नये, अगदी साऱ्याच गोष्टींवर पालकांकडून बरंच लक्ष ठेवलं जातं. तसेच आताच्या आवडीनिवडी पुढच्या पिढीपर्यंत कशा पोहोचवता येतील याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
सध्याची मुलं जन्माला येतात तीच मुळात या स्मार्टफोन, टॅबलेटच्या जगात! अशावेळी पुस्तकांशी त्यांची ओळख करुन देण्यापासून ते विविध गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही पालकांची असून, पालकांनीच ती सांभाळायला हवी…
पिल्लीच्या वडिलांनीच त्याला या गेममागची कुतुहलता समजावून दिल्यानंतर पील्लीला आपणही हे करू शकतो. आणि आपण हे करून पाहायलाच हवं, असा विश्वास निर्माण करून दिला.
आता लहान मुलांना खूप छान आणि निरनिराळ्या गोष्टी पाहायला मिळतात, वाचायला मिळतात, याने फक्त मनोरंजन होत नाही, तर लहान मुलांच्या मनावर चांगले परिणाम होण्यास मदत होते तसेच बुद्धीचा विकास होण्यासही मदत होते.
कधी कधी लहान मुलं जे पाहतात तसंच वागण्याची जिद्द त्यांना पुढे जाऊन असे काहीतरी थक्क करून सोडणारे चमत्कार घडू द्यायला मदत करतात. पिल्लीच्या आयुष्यातील त्याचा आदर्श ठरलेल्या तन्मय बक्षीला पाहूनच त्याला जीवनात असं काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली.
आज पील्ली Data Scientist म्हणून या चांगल्या पदावर काम करीत असून, पील्लीच्या सांगण्यावरून, त्याच्या वडिलांनी त्याला या कार्यात बरीच मदत केल्यामुळे तरी त्याने त्याच्या या कार्याचं श्रेय आपल्या वडिलांना बहाल केलं आहे. एवढंच करून पील्ली थांबला नाही तर त्याने त्याचे हे काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्याच्या सक्षम सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला.
YouTub, facebook सारख्या माध्यमांद्वारे आपण या क्षेत्रात कसे उतरलो, कसा अभ्यास केला, सारं काही YouTube व्लॉग्सच्या माध्यमातून कोडिंगची भाषा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पील्लीने केला आहे. जेणेकरून त्याच्यासारख्याच लहान वयातल्या मुलांनी त्याचा आदर्श घेऊन असेच काहीतरी भन्नाट करावे, अशी त्याची इच्छा आहे. लहान वयात महान काम करणाऱ्या या छोट्या पॅकेटमधल्या मोठ्या धमाक्याला हे बघ भाऊच्या पेजकडून खूप खूप शुभेच्छा!