वाहतूक कायद्याच्या नियमात काही नवीन बदल करून सुधारित नियम लागू केल्यापासून या ना कारणाने हा कायदा सतत चर्चेत आहे. १ सप्टेंबर पासून लागू झालेल्या या कायद्यानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यासाठी दहापट दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे समजा गाडी चालवताना जर एखाद्या व्यक्तीने सीटबेल्ट लावला नाही तर पूर्वी १०० रुपये दंड केला जाई. आत्ता मात्र यासाठी १००० रुपये इतका दंड आकारण्यात येत आहे. पूर्वी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांना १०० रुपये दंड केला जाई, अत्तामात्र त्यासाठी १००० रुपये दंड आकारण्यात येत आहे. शिवाय, तीन महिन्यांसाठी वाहन परवाना देखील रद्द केला जातो.

या नव्या नियमामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झाली असली तरी, वाहतुकीला शिस्त लागून अपघातांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा केली जात आहे. दंडाच्या या रकमेचा सामान्य वाहनधारकांनी चांगलाच धसका घेतला आहे. काही ठिकाणी आवश्यक ती कागदपत्रे मिळवण्यासाठी आरटीओ ऑफिसबाहेर भल्या पहाटेपासून लोक रांगा लावत आहेत. दिवस दिवसभर रांगेत उभे राहून आवश्यक कागदपत्रे आणि परवान्याचे नुतनीकरण करून घेत आहेत. कारवाई आणि दंडाच्या रकमेला घाबरून सामान्य माणसाने आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे, हे नक्कीच वाहतूक शिस्तीच्या दृष्टिने आश्वासक चित्र आहे, असे मानायला हरकत नाही. पण, एकीकडे कायद्याच्या बडग्याला घाबरून लोकं सतर्क होत असतानाच, दुसरीकडे टोकाचा बेफिकिरीपणा आणि बेजबाबदारपणा देखील दिसून येत आहे.

काही लोक अजूनही कायदा आपलं काय बिघडवणार? आशा थाटातच वावरत आहेत. अलीकडेच गुजरात ट्रॅफिक पोलिसांनी एका कार मालकाकडून सर्वात महागडा दंड वसूल केला आहे. गुजरात ट्रॅफिक पोलिसांनी या पोर्शे कारच्या मालकाकडून एक नव्हे दोन, नव्हे तर, नऊ लाख ऐंशी हजाराचा दंड वसूल केला आहे. आत्ता पर्यंतचा हा सर्वाधिक दंड असल्याची माहिती गुजरात ट्रॅफिक पोलिसांनी दिली. नवीन मोटार वाहन नियम कायद्यानुसार संपूर्ण देशात दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याचे माहिती असूनही काही लोक मात्र कमालीच्या बेफिकीरीने वागतात. अशाच एका कार मालकाच्या बेफिकिरीमुळे त्यांना ही कारवाई करावी लागली.

अहमदाबादचे ट्रॅफिक डीसीपी अजित रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सिल्वर कलरची पोर्शे ९११ कार अडवून त्याच्या मालकावर ९.८० लाखाच्या दंड केला. ही कार थांबवून पोलिसांनी चौकशी सुरु केली तेंव्हा पोलिसांच्या लक्षात आले की, या कार मालकाकडे गाडीची कोणतीच कागदपत्रे नव्हती. अगदी गाडीचा रजिस्ट्रेशन नबंर देखील नव्हता. या कार चालकाकडे गाडी चालवण्याच्या परवाना देखील नव्हता आणि हद्द म्हणजे यापूर्वी देखील या कार मालकावर वाहतूक नियम मोडल्याबद्दल ९ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता, जो त्याने भरला देखील नव्हता. याच ९ लाख रुपयांच्या रकमेत काल अहमदाबाद पोलिसांनी आणखी ८० हजाराची रक्कम वाढवून एकूण ९ लाख ८० हजाराचे चलन केले. गाडी चालवण्याचा परवाना नसेल तर ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा दंड आणि तीन महिन्याच्या तुरुंगावासाची शिक्षा होऊ शकते. हाच गुन्हा जर पुन्हा झाला तर दंडाची रक्कम वाढवून ही १० हजार आणि एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. इतके कडक कायदे असताना देखील ही व्यक्ती इतकी बेफिकीर कशी राहू शकते, याचेच आश्चर्य आहे.

पोलिसांनी जेंव्हा ही पोर्शे कार अडवून तिची तपासणी केली तेंव्हा कार मालाकाजवळ कोणतीच कागदपत्रे नव्हती, तेंव्हा पोलिस त्याला आरटीओ ऑफिसमध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर पोलिसांना कळाले की, या महोदयांवर आधीच खूप मोठा दंड करण्यात आला आहे. इतकेच नाही तर, त्या गाडीचा विमा देखील करण्यात आला नव्हता. त्यात आणखी ८० हजार रुपयांची भर पडली. आत्ता, जोपर्यंत हे मालक दंडाची सर्व रक्कम भरत नाहीत तोपर्यंत ही कार पोलिसांच्याच ताब्यात राहील अशी माहिती पोलिसांनी दिली. दंडाची रक्कम भरताच कार त्यांच्या हवाली करण्यात येईल, असेही ते म्हणाले. गाडीला विमा संरक्षण नसल्यास दोन हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो. पुन्हा हाच गुन्हा केल्यास दंडाची रक्कम आणि शिक्षा दोन्हीत वाढ केली जाते.

मुळात पोर्शे ९११ कारची भारतातील मूळ किंमतच १. ८२ ते अडीच कोटी रुपयापर्यंत आहे. १.८२ कोटीची गाडी रोडवर २.१५ कोटी रुपयांन पडते. या गाडीचे आरटीओ रजिस्ट्रेशन करण्यासाठी देखील तब्बल २२.७५ लाख रुपये मोजावे लागतात. पोर्शे ९११ गाडीच्या विम्याची रक्कम ८,४३,३०५ इतकी होते.

जर्मनीतील स्टटगर्टमधील पोर्शे एजी कंपनीमार्फत ही कर बनवण्यात येते. ही एक स्पोर्ट कार असून या कारच्या क्वालिटी साठी ही कार खूपच प्रसिद्ध आहे. पण, गाडी जप्त केल्यानंतर या कार मालकाने ही सगळी दंडाची रक्कम एका झटक्यात जमा करून गाडी आपल्या ताब्यात घेतली. इथून पुढे तरी या महोदयांना गाडीची सर्व कागदपत्रे आणि परवाना काढून घेण्याची बुद्धी सुचेल अशी अशा करूया.

पण, देशात नवे वाहन नियम लागू करण्यात आल्यापासून वसूल करण्यात आलेली ही सर्वात जास्त रक्कम असल्याचे बोलले जात आहे. पण, या दंडाच्या रकमेत भारतीय बनावटीच्या कित्येक महागड्या कार विकत घेता येऊ शकतात. मारुतीच्या Vitara Brezza ची किंमत आहे, ७.६३ लाख रुपये. टाटाच्या Nexon ची किंमत आहे, ६.६९ लाख रुपये, तर महिंद्राच्या XUV300 ची किंमत आहे, ८.१ लाख रुपये.
अर्थात, दंडाची रक्कम वाढवून सामान्य माणसाच्या चुकांना तर चाप लावला जाऊ शकतो. पण, अशा निर्ढावलेल्या लोकांवर त्याचा कसा आणि कितपत परिणाम होतो? हे या एका उदाहराणावरूनच स्पष्ट होते.