मी छान लिहितो/लिहिते तरी पण माझ्या पोस्ट हिट का होत नाहीत? त्यावर जास्त लाईक किंवा कमेंट का येत नाहीत? हे प्रश्न अनेकांना पडतात. मग कधी कधी चिडचिड सुद्धा होते. ज्यांना ढिगाने लाईक मिळतात त्यांचा मत्सर वाटू लागतो. पण फेसबुक अल्गोरिदम हा प्रकार समजून घेतला तर काही गोष्टी करून आपले लाईक सुद्धा वाढवता येतील.

वापरकर्त्यांच्या एकंदरीत स्वभावानुसार फेसबुकने आपले स्वरूप वेळोवेळी बदलले आहे. फेसबुकची सुरुवात झाल्यापासून ते 2011 सालापर्यंत ‘एजरँक’ (EdgeRank) या अल्गोरिदम तंत्रावर फेसबुक चालत असे. वापरकर्त्यांच्या न्यूजफीड मध्ये कोणत्या पोस्ट दाखवायच्या ते ठरवणे म्हणजेच अल्गोरिदम. 2011 नंतर मात्र ‘मशीन लर्निंग’ (Machine Learning) हे तंत्र वापरात आणले गेले. त्यानंतर मागच्या वर्षी त्यात आणखी मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या गेल्या.

आपल्या न्यूजफीड मध्ये कुठल्या पोस्ट दाखवायच्या हे फेसबुक कसं ठरवतं? तर इथे आपण वावरतो त्याचे ऍनालिसिस करून. तुम्ही ज्यांना सी फर्स्ट केलं आहे त्यांच्या पोस्ट सर्वप्रथम दिसतील. नंतर तुमचे जास्तीत जास्त संभाषण ज्यांच्यासोबत होते त्यांच्या पोस्ट दिसतील आणि त्यानंतर स्पॉन्सर्ड पोस्ट दिसतील. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, किंबहुना तुम्ही ज्या लोकांना प्रायोरिटी देता त्याचा डेटा फेसबुक गोळा करतं. त्यावरून तुमच्या स्वभावाचे विश्लेषण केले जाते आणि तुम्हाला तश्याच पोस्ट दिसतील अशी व्यवस्था केली जाते. याला ‘क्वालिटी अँड मिनींगफुल इंटरॅक्शन्स’ असं संबोधलं जातं. उदाहरणार्थ : तुमच्या लिहिण्यात सतत मांजर हा शब्द येत असेल तर दुसऱ्यांनी मांजर शब्द लिहून टाकलेल्या पोस्ट तुम्हाला चटकन दिसतील. आता काहीजण “आवडलं तर लाईक करा” किंवा “आपल्या मित्रांना कमेंटमध्ये टॅग करा” या प्रकारच्या पोस्ट टाकताना दिसतात त्यामागे निव्वळ मनोरंजन हा हेतू नसतो तर त्यामागे अल्गोरिदम असते. तुम्ही त्या पोस्टवर लाईक कमेंट करत गेलात की पुढच्यावेळी तुमच्या न्यूजफीड मध्ये त्यांच्याच पोस्ट जास्त प्रमाणात दिसाव्या हे त्यामागचं लॉजिक आहे.

आता अल्गोरिदम म्हणजे काय याची थोडीशी कल्पना आली असेल तर याच अल्गोरिदमचा वापर करून आपल्या पोस्ट जास्तीतजास्त लोकांपर्यंत कश्या पोचवाव्या याच्या ट्रिक्स जाणून घेऊ.

1. कमेंट –

पोस्ट अशी लिहावी की तिथे लोक कमेंट करण्यास उद्युक्त झाले पाहिजे. त्यासाठी पोस्टचे कंटेंट दर्जेदार असावे लागते. लोकांना सल्ले देण्याची फार हौस असते त्याचा फायदा उचलू शकता. पोस्टमध्ये प्रश्न विचारल्यास कमेंट्स जास्त येतात. जास्त कमेंट आल्या की मशीन लर्निंगला ते समजते आणि अल्गोरिदम तंत्र तुमची पोस्ट जास्तीत जास्त लोकांना दिसेल अशी व्यवस्था करते.

2. कमेंट रिप्लाय –

नुसत्याच कमेंट महत्वाच्या नाहीत तर त्या कमेंटवर येणारे रिप्लाय सुद्धा महत्वाचे आहेत. जास्तीत जास्त ‘कम्युनिकेशन’ होत असेल तर पोस्टला व्हॅल्यू येते. म्हणून तुमच्या पोस्टवर आलेल्या कमेंट्सला कधीही दुर्लक्षित करू नका. पोस्टवर संभाषण सुरू राहील याची काळजी घ्या. किमान एखादी स्मायली किंवा एखाद्या शब्दाने रिप्लाय द्या. असे केले की पोस्ट दुप्पट लोकांना त्यांच्या न्यूजफीड मध्ये नक्की दिसेल.

3. रिऍक्शन्स –

पोस्टवर येणाऱ्या रिऍक्शन्स फार महत्वाच्या आहेत. आपली पोस्ट शून्य सेकंदात स्क्रोल केली जाते की काही वेळ लोक तिथे रेंगाळतात याचाही अभ्यास फेसबुक करत असते. पोस्टवर लोक किती वेळ थांबतात यावरून तुमच्या पोस्टला किती महत्व द्यायचे ते ठरवले जाते. पूर्वी फक्त लाईकचा अंगठा इतकीच रिऍक्शन होती. मात्र नंतर HAHA, WOW, LOVE, SAD, ANGRY हे उपलब्ध करून दिले गेले. नुसतंच लाईक केलं तर महत्व कमी, मात्र इतर काही रिऍक्ट होण्यासाठी पोस्टवर थांबावं लागतं, बटन दाबून धरून नंतर काय ऑप्शन सिलेक्ट करायचं हे ठरवावं लागतं. हाच एक सेकंद महत्वाचा असतो आणि तो मोजला जातो.

4. लिंक –

पोस्टमध्ये लिंक देणे शक्यतो टाळा. लिंक देताय याचा अर्थ तुम्ही लोकांना फेसबुक सोडून बाहेरच्या प्लॅटफॉर्मवर नेताय. आणि असे केलेले फेसबुकला अजिबात आवडत नाही. पोस्टमध्ये लिंक दिली असेल तर तुमची पोस्ट फक्त 10% लोकांना दिसेल. त्याऐवजी कमेंटमध्ये लिंक देऊन पोस्टमध्ये तसे सूचित करू शकता. मेसेंजरमध्ये लिंक पाठवणे हा ही एक उत्तम उपाय आहे.

5. पोस्ट शेअर –

आपली पोस्ट गाजवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. पण हे थोडंसं कठीण सुद्धा आहे. लोकांनी पोस्ट शेअर करावी यासाठी पोस्टचा दर्जाही तसाच असावा लागतो. काहीजण “सहमत असाल तर शेअर करा” किंवा “माझी पोस्ट शेअर करण्यास हरकत नाही” वगैरे वाक्य पोस्टच्या शेवटी टाकत असतात ते यासाठीच. काहीजण तर मुद्दाम वादग्रस्त पोस्ट लिहीत असतात जेणेकरून ती अनेकांनी शेअर करावी. यामागे निगेटिव्ह का असेना, पण पब्लिसिटी मिळावी हाच हेतू असतो.

6. टायमिंग –

हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. पोस्ट कोणत्या वेळी टाकली तर ती गाजेल हा फॅक्टर अनेकजण विसरतात आणि मग लाईक का येत नाहीत म्हणून नाराज होतात. सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 6 ते 11 हा काळ सर्वाधिक ट्रॅफिकचा असतो. जास्तीत जास्त वापरकर्ते याच वेळी ऑनलाइन असतात. दुसरा एक उपमुद्दा असा की पोस्ट टाकल्यापासून ठराविक वेळेपर्यंत ती इतरांना न्यूजफीड मध्ये दाखवायची व्यवस्था फेसबुक करत असतं. काही तासांनी ती आपोआप मागे पडते आणि दुसऱ्या पोस्ट पुढे येतात. त्यामुळे योग्य वेळ साधून पोस्ट टाकणे कधीही सोयीस्कर.

7. स्टोरी टाईप –

साधं लिखाण आहे की फोटो आहे की व्हिडीओ आहे यावरून सुद्धा ठरतं की पोस्ट किती लोकांपर्यंत पोहोचेल. एक फोटो हजार शब्दांचं काम करतो म्हणतात ते अगदी खरं आहे. फोटो किंवा व्हिडीओ हे संभाषण सुरू करण्यास मदत करतात असे फेसबुक मानते. त्यामुळे फोटोला केव्हाही जास्त लाईक येतात. काहीजण दिवसातून चार वेळा डीपी बदलतात ते याच कारणासाठी. जर लाईव्ह व्हिडीओ किंवा वॉच पार्टी असेल तर फेसबुक स्वतःच लिस्टमधल्या सर्वांना नोटिफिकेशन पाठवतं हे आपल्याला माहीत आहेच.

8. प्रोफाइलची विश्वासार्हता –

जर प्रोफाइल मध्ये सगळी माहिती व्यवस्थित भरली असेल, प्रोफाइलला डीपी लावला असेल, तर अश्या लोकांना प्रायोरिटी मिळते. एखाद्या संशयास्पद प्रोफाइलने पोस्ट टाकली तर ती जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. सध्या फेसबुकने फेक कंटेंट तपासण्यासाठी गुगलची मदत घेऊन जबरदस्त फिल्टर लावले आहेत. खोटी माहिती पसरवणाऱ्या पोस्ट आपोआप फिल्टर होतात आणि लोकांना दिसत नाहीत.

हे काही ढोबळ मुद्दे आहेतच पण याशिवाय तुम्ही इतरांच्या पोस्टवर किती वेळा जाता, तुमचे इतरांशी कम्युनिकेशन कसे आहे या बाबी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. जर तुम्ही लोकांच्या पोस्टवर कमेंटच करत नसाल तर तुमचा मर्यादित वावर आहे आणि लोकात मिसळायला तुम्हाला आवडत नाही हे गृहीत धरलं जातं. मग तुम्ही कितीही चांगली पोस्ट टाकली तरी ती लोकांच्या न्यूजफीडमध्ये दिसत नाही. लक्षात घ्या, फेसबुकवर दिवसाला 500 कोटी (पाच बिलिअन) पोस्ट पडत असतात. त्यात 300 कोटी तर फक्त फोटो आणि व्हिडीओ असतात. एका मिनिटाला साडेपाच लाख कमेंट्स येतात आणि एका मिनिटात तीन लाख स्टेटस अपडेट होत असतात… या सर्वांमध्ये तुमच्या पोस्टलाही काही महत्व मिळवून द्यायचे असेल तर वरील मुद्द्यांचा जरूर विचार करा.