नुकतेच केंद्र सरकार तर्फे एक निवेदन देण्यात आले आहे, कि उत्तर प्रदेश हे राज्य सध्या एक नंबर वर आहे , हे राज्य एक नंबर वर आहे माध्यान्ह भोजन म्हणजेच पोषण आहार या योजनेमध्ये  भ्रष्टाचार करण्यामध्ये. हे निवेदन येऊन काहीच तास झाले असतील तोच या निवेदनातील माहिती खरी असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोनभद्र येथील एका शाळेमध्ये एका बादलीत एक लिटर दुधात पाणी मिसळून ते ८५ विद्यार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत चौकशी सुरु असून स्थानिक प्रशासनाने तात्काळ दोन शिक्षा मित्रांना निलंबित केले आहे.

काही दिवसांपूर्वी मिर्झापूर येथील शाळेमध्ये माध्यान्ह भोजन अंतर्गत मुलांना मीठ आणि चपाती दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

याबाबत सगळीकडे चर्चा होत असतानाच सोनभद्र येथील एक नवा कारनामा समोर आला आहे. सलाईबनवा या परिसरातील शाळेमध्ये एक लिटर दुधात पाणी मिसळून तब्बल ८५ विद्यार्थ्यांना ते माध्यान्ह भोजन अंतर्गत देण्यात आले. जेवण तयार करणाऱ्या एका स्त्रीने दुधात पाणी मिसळले, याचा व्हिडीओ शाळेतील एका कर्मचाऱ्याने व्हायरल केला आहे.

पाणी मिसळणाऱ्या स्त्रीचे म्हणणे आहे कि तिला दुधामध्ये पाणी मिसळायला शिक्षा मित्रने सांगितले होते.

सलाईबनवा येथील प्राथमिक शाळेत पोषण आहार योजनेचे जेवण तयार करणाऱ्या फुलवंती या महिलेस जेव्हा विचारण्यात आले कि एक लिटर दुधात किती पाणी मिसळले, त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्यच होईल. तिने सांगितलं कि एक पूर्ण मोठी बादली भरून पाण्यात ते दूध मिसळलं. आणि किती मुलांना ते दूध प्यायला दिलं असं विचारल्यावर फुलवंती म्हणाली ८५ मुलांना ते दूध प्यायला दिलं. जिल्हा शिक्षण अधिकारी यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि, एक लिटर दूध एका बादलीत मिसळून ८५ मुलांना ते प्यायला दिलं, ही गोष्ट खरी आहे.

शाळेकडून ही चूक झाली असून या चुकीबद्दल त्यांच्या लक्षात येताच शाळेने अडीच तासानंतर त्या मुलांना चांगले दूध प्यायला देऊन त्यांची चूक सुधारली आहे. 

शिक्षण अधिकारी मुकेश कुमार यांनी सांगितले कि, शाळेमध्ये दोन वेगवेगळ्या पॅकेट मध्ये दूध देण्यात आले होते. त्यातले एका पॅकेट मधील दूध बादलीत मिसळले होते. शाळेला त्यांची चूक लक्षात आल्यावर त्यांनी दुसऱ्या पॅकेट मधील दूध मुलांना प्यायला दिले. चांगले दूध मुलांना प्यायला देऊन एक प्रकारे शाळेने आधी केलेल्या चुकीचे प्रायश्चित घेतले, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये.

तिकडे लोकसभे मध्ये भाजप च्या खासदार भरती प्रवीण पवार याची विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरयाल यांनी सांगितले कि, गेल्या तीन वर्षांच्या काळात माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झाल्याच्या ५२ तक्रारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश राज्यात १४, बिहार मध्ये ११, पश्चिम बंगाल मध्ये ६, महाराष्ट्रात ५, राजस्थान राज्यात ४, आसाम, दिल्ली हरियाणा राज्यात प्रत्येकी २ आणि छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, पंजाब, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यांची एक-एक तक्रार आली आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीवर सगळीकडून खूप तिखट आणि संतापजनक अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांनी ट्विट करून म्हंटले आहे कि, एमएचआरडी मंत्रालयाच्या अहवालानुसार माध्यान्ह भोजन मध्ये भ्रष्टाचार करण्यात उत्तर प्रदेश हे राज्य नंबर एक वर आहे. उत्तर प्रदेशचे कारभारी दररोज अक्षरशः ढील वाजवून सांगताहेत कि यार ही ऍक्शन घेतली, यावर ती कारवाई केली. पण प्रत्यक्षात ते हे केवळ दिखावा म्हणून करत आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या डोळ्यांसमोर हा सर्व भ्रष्टाचार होत आहे.

बहुजन समाज पक्षाचे खासदार मळून नगर यांनी तात्काळ या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी लोकसभेत केली आहे. पण यावर भारतीय जनता पक्षाच्या खासदार रिता बहुगुणा जोशी यांचं वेगळंच म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेश हे राज्य खूप मोठे आहे. त्यासमोर हा भष्टाचार अत्यंत छोटा आहे.

रिता बहुगुणा जोशी म्हणतात,” लखनऊ सारख्या ठिकाणी माध्यान्ह भोजन सारखी योजना एक आदर्श योजना बनते. त्या ठिकाणी कोणत्याच अडचणी येत नाहीत. लखनऊ शहरात मध्यवर्ती किचन म्हणजेच सेंट्रलाइज किचन तयार करण्यात आले आहे. परंतु राज्यात ज्या ठिकाणी सेंट्रल किचन ची व्यवस्था नाहीये, अशा ठिकाणांहून भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतात. यामुळे आमचा हाच प्रयत्न आहे की सेंट्रल किचन ची व्यवस्था जास्तीत जास्त ठिकाणी उभारावी. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”