“कचरा, सुखा और गिला… सबने मिलाके डाला”

व्हिडिओ यूट्यूब वर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

काय भाऊ? मूळ गाणं आठवलं का? आठवलं नसेल तर आम्ही सांगतो की राव! ते गाणं आहे,

“कजरा मुहोब्बत वाला… अंखीयोमें ऐसा डाला”

मग मूळ गाण्याचे शब्द बदलायचे काय कारण असे तुम्ही आम्हाला विचारू नका. कारण ते शब्द आम्ही बदलले नाहीत तर महादेव जाधव यांनी बदलले आहेत. जुन्या गाण्यांना नवीन शब्दात गुंफून ती गाणी म्हणणे हीच त्यांची खासियत आहे. आणि याच खासियत मुळे ते सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत! पण ते असे का करतात? कोण आहेत महादेव जाधव? जाणून घ्यायचंय? मग हे वाच भाऊ…

श्री. महादेव जाधव हे काही सेलिब्रिटी नाहीत बरं का. तर ते आहेत पुणे महानगरपालिकेचे सफाई कामगार! त्यांनी आपल्या कामामुळे सफाईची व्याख्याच बदलून टाकली आहे. गेली पंचवीस वर्षे सेवा बजावणारे महादेव जाधव नेमके आताच का गाणी म्हणू लागले याचेही एक कारण आहे.

कसं आहे भाऊ, लोकांना चांगल्या गोष्टीकडे आकर्षित करण्यासाठी काहीतरी आयडिया करावी लागते. प्रशासनाने कितीही आवाहन केले तरी आपण कचरा योग्य त्या ठिकाणी टाकत नाही हे प्रत्येकाला मान्य करावे लागेल. ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करावा आणि तो वेगवेगळ्या नेमून दिलेल्या ठिकाणी टाकावा ही अगदी साधी गोष्ट न पाळल्याने पुढे अनेक समस्या येऊ शकतात. याच गोष्टीचा विचार आपल्या महादेव जाधवांनी केला आणि एक जबरी आयडिया त्यांनी वापरात आणली… गाणी म्हणायची!

मला कुणी गाणी म्हणायला सांगितलं नव्हतं पण लोकांमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाकावा याची जाणीव यावी म्हणून मी गाणी म्हणायला सुरुवात केली

असं महादेव जाधव सांगतात. आणि त्यासाठी मुद्दाम बॉलिवूड गीत निवडले. बॉलिवूडची गाणी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. याच गाण्यांना नव्या स्वरूपात पेश करून जनजागृती करण्याची कल्पनाच भन्नाट म्हणावी लागेल. विशेष म्हणजे जाधवांनी हे सगळं स्वतःच्या मनाने सुरू केलं. त्यासाठी त्यांना वेगळं मानधन मिळावं अशी काही एक अपेक्षा नव्हती.

फक्त ओला आणि सुका कचराच नव्हे तर त्यांनी गाणी म्हणून प्लास्टिक कॅरीबॅगच्या प्रश्नांकडेही लोकांचं लक्ष वेधलं.

कॅरीबॅग ये प्लास्टिक वाला, इसको आदत कर डाला, इसने ले ली सबकी जान…

असं म्हटल्यावर कोण कॅरीबॅग वापरण्यास धजावेल? एकीकडे महाराष्ट्र सरकारने गेल्या एक वर्षापासून प्लास्टिक कॅरीबॅग आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घातली आहे आणि दुसरीकडे त्या बंदी घातलेल्या वस्तू सर्रासपणे नागरिक वापरत आहेत. हे चित्र खरंतर आपली पर्यावरणाविषयी असणारी अनास्था दाखवते. मग सरधोपटपणे सांगून त्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत हे ओळखून जाधवांना गाण्याची आयडिया सुचली. ही आयडिया अपेक्षेप्रमाणे काम करून गेली आणि नागरिकांनी तिला डोक्यावर उचलून घेतले. आज महादेव जाधव ज्या परिसरात कचरा गोळा करण्यास जातात तिकडे लोकांनी बरोबर ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून ठेवलेला दिसतो. प्लास्टिक व थर्माकोल वापरणेही नागरिकांनी कमी केले आहे. महादेव जाधव यांच्या सांगण्यानुसार पूर्वीपेक्षा आता 60 टक्के सुधारणा दिसत आहे. ही कामगिरी उत्कृष्टच म्हणावी लागेल. जी गोष्ट सरकारने कितीही आवाहन करूनही साध्य झाली नाही ती फक्त एका साध्या सफाई कर्मचाऱ्यामुळे शक्य झाली!

हे बघ भाऊ, आता आपणही यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे. विषय निघालाच आहे तर प्लास्टिक कॅरीबॅगचे दुष्परिणाम आपण समजून घेतले पाहिजेत. सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे निसर्गाचे नुकसान! एक कॅरीबॅग पूर्णपणे कुजायला हजार वर्षे लागतात हे माहीत का? म्हणजे आपल्या पंधरा पिढ्या गेल्या तरी एक प्लास्टिकचा तुकडा निसर्गाचे नुकसान करतच राहतो. बरं, इतकंच नाही तर यात असणाऱ्या अन्नाच्या आशेने मुक्ती बिचारी जनावरे या प्लास्टिक कॅरीबॅग गिळतात. त्यामुळे अर्थातच त्यांचा मृत्यू होतो. हे प्लास्टिक जाळले तरी यातून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वातावरण दूषित होते आणि त्याचा परिणाम लहान मुलांवर होतो. बघा, एक कॅरीबॅग टाळली तर आपण किती नुकसान टाळू शकतो!

त्यामुळे भाऊ, महादेव जाधव जे सांगत आहेत ते ऐकूया आणि आपणच आपला परिसर व आपल्या भावी पिढ्या सुरक्षित ठेऊया. या अभिनव मार्गाने समाजप्रबोधन करणाऱ्या सफाई कामगार महादेव जाधव यांना आमचा मानाचा मुजरा!